शुक्रवार, ऑक्टोबंर 30, 2020
   
Text Size

सती

'मैनेचा नवरा आजारी का आहे?' तिने पतीला विचारले.
'म्हातारी माणसे मरायचीच?' धोंडोपंत म्हणाले.
'असे काय म्हणता?'

'मैना मोकळी होईल. तिच्या गळयाला दावे बांधून मी ठेवले. दावे सुटेल गाय. जाईल रानोमाळ. तिला तिचे गोपाळ भेटतील. मिठया मारतील.  वाईट काय?'
'तिच्याकडे जाऊन या. कसा झाला तरी पोटचा गोळा.'

'आईबापांची नाचक्की करणारा पोटचा गोळा.'
'माझे ऐका. जाऊन या. केवळ तिलाच बोल लावू नका. समजा, बरेवाईट झाले. तर तिला इकडे आणा. म्हणजे पुढे आणखी खाली मान घालण्याचे प्रसंग येणार नाहीत. खरोखरच गेली गोपाळाबरोबर तर? आज दुरून पूजा करते आहे. उद्या जवळ जाईल. तिला इकडे घेऊन या. माझे ऐका.'

धोंडोपंताने जायचे ठरविले. मुलीकडे जायचे ठरविले.
'बाबा, मी येऊ तुमच्याबरोबर?' जयंताने विचारले.
'नको बाळ. तुझ्या ताईलाच इकडे आणतो.'

'माझी फुले ताईला द्याल? सोनटक्क्याची फुले.'
'ती वाटेत सुकून जातील.'

'सुकलेली नेऊन द्या. ताईच्या डोळयांतील पाणी वर पडले, म्हणजे ती टवटवीत होतील. मागे भाऊबीजेला मी फुले घातली, ती ताई घेऊन गेली. म्हणाली, 'हातात घेईन, त्याच्यावर डोळयांतील पाणी शिंपीन, म्हणजे पुन्हा फुलतील.' ताईजवळ मंत्र आहे, जादू आहे. न्याल ना फुले?'

'नेईन.'
मैना पतीच्या उशाशी बसली होती. त्याचे डोके मांडीवर घेऊन बसली होती. वासुदेवरावांची शेवटची घटका जवळ आली होती. मैना राम राम म्हणत होती. बाहेर मंडळी होती. दिवस मावळला. प्राण मावळण्याला अद्याप अवकाश होता. पाखरे घरटयात गेली; परंतु प्राणहंस देवाघरी जायला अजून थोडा वेळ होता.

सूर्य मावळला, परंतु चंद्र उगवला होता. पौर्णिमेच्या पूर्णचंद्र फुलला होता. लाल लाल पूर्वेकडे दिसत होता. गोपाळ खूण दिसते का बघत होता. तिकडे लाल लाल प्रकाश दिसला. गोपाळ चमकून उठला. मैनेची खूण! लाल लाल दिवा. मैना का आकाशातून दिवा दाखवीत होती? गोपाळ उभा राहिला. तो बाहेर पडला. लाल लाल फळे असलेल्या वटवृक्षाखाली येऊन तो उभा राहिला. चंद्राचा लालपणा कमी झाला. आता त्यात स्वच्छता, शुभ्रता आली. रजोगुण जाऊन सत्त्वगुण आला. रागातून अनुराग, अनुरागातून विराग, असा विकासाचा क्रम आहे.

'हा तर पौर्णिमेचा चंद्र. हा देवाच्या घरचा दिवा. ही मैनेची खूण नव्हे. केव्हा दाखवील मैना लाल लाल खूण? लाल प्रकाशाची खूण. नदीतीरी  जाऊन बसू नका? त्या टेकडीवर बसू? टेकडीवरच बसावे.'

गोपाळला कोठून शक्ती आली देव जाणे. तो टेकडीकडे वळला. चंद्राच्या प्रकाशात त्याला दिसत होते. त्याला खडे बोचत नव्हते, काटे टोचत नव्हते. सर्वत्र फुलेच फुलली होती. प्रेमाची फुले. गोपाळ टेकडीवर जाऊन बसला. तेथे गाणी म्हणत बसला.

'मैने!' वासुदेवरावांनी क्षीण स्वरात हाक मारली.
'काय?'
'मला क्षमा केलीस ना?'
'होय. क्षमा!'

 

पुढे जाण्यासाठी .......

सती