मंगळवार, एप्रिल 20, 2021
   
Text Size

सती

धोंडोपंत, सावित्रीबाई, जयंत सारी दु:खी झाली. कोणी नीट खाईना; पिईना, सावित्रीबाईंनी हाय घेतली. त्यांनी अंथरूण धरले. जयंता आईची सेवा करीत होता. मैनेने त्याला कर्तव्य शिकविले होते, परंतु आई बरी झाली नाही. ती देवाघरी गेली. पुढे धोंडोपंत आजारी पडले. तेही देवाघरी गेले.

जयंता एकटा राहिला. त्याने ते शंकराचे देऊळ नीट बांधले. त्याने आपले घरदार सारे विकले. शेत, मळा सारे विकले. शंकराच्या देवळात त्याने एक गुरव ठेवला. देवाला एक शेत त्याने लावून दिले.

'देवळाभोवती नेहमी फुले फुलवा, सुंदर बाग करा, जोपर्यंत येथे फुले फुलवाल, तोपर्यंत तुम्हाला कमी पडणार नाही.' जयंता गुरवाला म्हणाला.

एके दिवशी जयंताने सारंग गाव सोडले. तो शेगावला आला. त्याने शेगावच्या नदीकाठी गोपाळ व मैना यांच्या दोन समाध्या बांधल्या. समाध्या बांधून झाल्यावर तो तेथेच राही, तेथेच गाणी गाई. काही दिवस असे गेले.

परंतु जयंताला जगणे असह्य झाले, त्याने अनशन व्रत घेतले. तो ना खाई अन्न, ना घेई पाणी. तो त्या समाधीजवळ बसून राहिला, गुराखी येत, त्याला प्रणाम करून जात, गावातील स्त्रीपुरुष येत, त्याला प्रणाम करून जात, एके दिवशी जयंताचे प्राण देवाकडे गेले. तो मैनाताईला भेटायला गेला. शेगावच्या लोकांनी जयंताची तिसरी समाधी तेथे बांधली, त्या तीन समाध्या तेथे नदीकाठी होत्या. त्यांना नदी अखंड गाणी म्हणे, वारा त्यांना अखंड प्रदक्षिणा घाली. कधी कोणी येऊन त्यांच्यावर फुले वाही. प्रथम काही दिवस सतीचा उत्सव दरवर्षी होई. काहींनी तेथे बागही केली; परंतु पुढे उत्साहपूर ओसरला. सारे संपुष्टात आले. त्या समाध्यांकडे कोणाचे लक्ष जातनासे झाले. नदीला का त्याचा राग आला? एकदा त्या नदीला प्रचंड पूर आला. तिच्या तीरावरील संन्याशाची समाधी मागे एकदा  अशीच वाहून गेली होती. या तीन समाध्याही वाहून जाणार की काय? त्या समाध्यांची अवहेलना होण्याऐवजी त्यांना पोटात ठेवलेले काय वाईट? ते पवित्र दगड, ती पवित्र माती नदी स्वत:जवळ राखू इच्छित होती. तिच्या लाटा समाध्यांवर नाचत होत्या. काही दगड नदीने नेले; परंतु सारेच दगड गेले नाहीत. त्या पडक्या समाध्या तेथे अद्याप आहेत. त्यांच्याभोवती रान माजले आहे. काटे भरले आहेत. हिंदुस्थानची ही पुण्याई, तिचा सांभाळ काटे करीत असतात. हिंदुस्थानची ही जुनी संपत्ती तिचे रक्षण भुजंग करीत असतात. ती पुण्याई, ही पवित्रता, हा निस्सीम त्याग, ही ध्येयनिष्ठा, हिंदुस्थानाला माहीत असो वा नसो. भरतखंडातील मातीच्या कणाकणात ती भरून राहिली आहेत. भारतीय जीवनाला न कळत त्यांचा ओलावा  मिळत आहे. भारतीय जीवन नीरस निर्जीव निर्गंध असे वरून जरी वाटले, तरी त्याच्या आत चैतन्य आहे, सुगंध आहे, तेज आहे, मधुरता आहे, प्रेम आहे, त्याग आहे, वरून पाहून नावे नका ठेवू. निरुत्साह व निराश नका होऊ. पूर्वीचा हा त्याग फुकट जाणार नाही, नवीन ध्येयांना मिठी मारण्यासाठी नव भारताला तो स्फूर्ती देईल.

 

पुढे जाण्यासाठी .......

सती