बुधवार, एप्रिल 21, 2021
   
Text Size

ईश्वरचंद्र विद्यासागर

एक दिवस ठाकुरदासांच्या पोटात अन्नाचे एक शितसुद्धा गेले नाही. भुकेने पंचप्राण कंठात गोळा झाले. क्षुधेचे भीषण दुःख विसरावे या हेतूने ठाकुरदास घराच्या बाहेर पडले. लाह्या विकणार्‍या एका बाईच्या दुकानासमोर दमून गेलेला, निर्जीव झालेला, गलितगात्र झालेला ठाकुरदास उभा राहिला. बाईने ओळखले की, हा ब्राह्मण भुकेला आहे. “ठाकूर, आपणास काही पाहिजे का?” असे तिने गोड व सहानुभूतिपूर्वक स्वरात विचारले. “एक पेलाभर पाणी द्या!” असे ठाकुरदास म्हणाले. ब्राह्मणास नुसते पाणी कसे द्यावे, असा बाईस विचार पडला; म्हणून तिने काही लाह्या ब्राह्मणास दिल्या व वर एक पेलाभर पाणी दिले. त्या लाह्या ठाकुरदासाने एखाद्या दुष्काळात सापडलेल्या बुभुक्षिताप्रमाणे तेव्हाच मटकावल्या. तेव्हा बाईने ब्राह्मणास विचारले, “ठाकूर, तुम्ही जेवला नाही वाटते?” न बोलता संमतीपूर्वक उत्तर ठाकुरदासाने दिले. ती बाई पुत्रवत्सल होती. तिचे अंतःकरण द्रवले. ती कळवळली. ती एका गवळ्याच्या घरी गेली आणि दही घेऊन आली. नंतर लाह्या आणि दही तिने त्यास पोटभर खावयास दिले. नंतर ती त्यास म्हणाली, “कधी तुला जेवणखाण मिळाले नाही, ज्या दिवशी तुला उपाशी राहण्याची पाळी येईल, त्या दिवशी तू तत्काळ मजकडे येत जा आणि आपली क्षुधाशांती करीत जा.” त्या मुलापासून तिने होकारार्थी वचन घेतले.

विद्यासागर आपल्या वडिलांच्या आयुष्यातील ही मोठी करुणपूर्ण कहाणी ज्या ज्या वेळेस आपल्या मित्रांस सांगत त्या वेळेस त्यांच्या डोळ्यांत अश्रुबिंदू चमकल्याशिवाय राहत नसत. अशा प्रकारच्या बारीकसारीक गोष्टी पाहून एकंदर स्त्रीजातीसंबंधी त्यांचे हृदय कृतज्ञतेने व प्रेमाने भरून येई. आणि त्या प्रेमामुळेच या स्त्री जातीच्या समुन्नतीसाठी त्यांनी अनेक संकटे सुखाने सहन केली.

ठाकुरदास यांस महिना दोन रुपये मिळत. परंतु निरनिराळ्या उपायांनी तो आपले पैसे साठवी व ते घरी पाच पुत्रांसह गुजराण करणार्‍या आपल्या आईकडे पाठवून देई. मुलाकडून ही प्रेमाची व कष्टाची मदत अल्प का होईना जर आली तर त्या माऊलीच्या पोटात भडभडून येई व तिचे अंतःकरण किती तरी गहिवरे.

पुढे काही दिवसांनी ठाकुरदास यांची भगवच्चरणदास नावाच्या श्रीमंत गृहस्थाची गाठ पडली. भगवच्चरण यांची व ठाकुरदासांचे वडील यांची पूर्वीची ओळख होती. ठाकुरदास यांची सचोटी, सततोद्योग, चिकाटी हे पाहून भगवच्चरण संतुष्ट झाले व त्यांनी ठाकुरदास यांस आपल्या घरी येऊन राहण्यास व आपल्या बरोबर भोजन करीत जाण्यास सांगितले. त्यावेळेपासून विद्यासागरांच्या घरात सुख आणि समाधान नांदू लागले. गृहसौख्य मिळू लागले. काळजी दूर होऊ लागली.

ठाकुरदास यांचा पगार आता पाच रुपये झाला होता. त्या वेळेस देशात सर्वत्र स्वस्ताई असे. दोन-चार रुपयांत मोठ्या कुटुंबाचे पोषण करिता येत असे. माझ्या गावचे एक गृहस्थ खानदेशात मराठी शाळेत मास्तर होते. त्यांचा जास्तीत जास्त पगार वाढला तो ६।। रुपये होता. आमचे लहानपणी ते गावात पेन्शनर म्हणून असत व त्यांस ३। रुपये पेन्शन मिळे. त्यांस सहा मुलगे होते व या मोठ्या कुटुंबाचे पोषण ते त्या पगारात करू शकत. त्या वेळेस धान्यादि माल परदेशी जात नसे. देशात माल राहत असे. दुष्काळ पडला तरीसुद्धा गावात राखीव कोठारे, केणी असत व त्यामुळे कठीण काळ फारसा येत नसे. तेव्हा पाच रुपयांत ठाकुरदास हे आनंदाने घरसंसार कसे करीत याचे आपणास आश्चर्य वाटावयास नको.

 

पुढे जाण्यासाठी .......

ईश्वरचंद्र विद्यासागर