रविवार, जानेवारी 19, 2020
   
Text Size

ईश्वरचंद्र विद्यासागर

१९ म्हणजे एकावर नऊ हे विद्यासागराने ओळखले आणि पहिला आकडा एकाचा व दुसरा नवाचा असला पाहिजे असा त्यांनी आपल्या मनाशी विचार केला! “बाबा, पहिला आकडा म्हणजे इंग्रजी एकाचा आकडा व दुसरा नवाचा, असे असावे नाही?” असे विद्यासागर म्हणाले. ‘होय’ एवढेच मोजके बोलणारे त्यांचे वडील म्हणाले.

अशा प्रकारची प्रश्नोत्तरे झाल्यावर ते निमूटपणे रस्त्याने चालले होते. रस्त्यातील सर्व मैलांचे दगड विद्यासागर नीट न्याहाळून पाहत व त्यात असलेला नवीन आकडा शिकत. कारण पाठीमागच्या आकड्यावरून हा आकडा कोणता हे त्यास कळे; व असे कळून आल्यावर त्यातील इंग्रजी आकडे कसे आहेत, कोणती आकृती कोणता अंक दाखविते हे सर्व लक्षपूर्वक ते शिकले. एकएक मैल कमी होत आला; कारण अंतर कमी होऊ लागले. १९, १८, १७ असे मैलांचे दगड गेले. आता मैलाचा १० वा दगड आला. विद्यासागर वडिलांस म्हणाले, “बाबा, मी सर्व इंग्रजी आकडे शिकलो; कोणताही आकडा मला इंग्रजीत मांडावयास सांगा. मी मांडून दाखवितो.”

विद्यासागराचे शब्द ऐकून त्याचे वडील आश्चर्यचकीत झाले. आपल्या मुलास खरोखर हे आकडे मांडण्याचे समजले आहे का याची त्यांनी परीक्षा घेतली; तो ते विद्यासागर यांनी बिनचूक लिहून दाखविले. थोड्या वेळाने आपला मुलगा हे विसरेल असे मनात धरून ठाकुरदास यांनी ईश्वरचंद्र याचे चित्त अन्य गोष्टीकडे वेधले; व बराच वेळ गेल्यावर जेव्हा एक मैलाचा दगड आला तेव्हा त्याच्यावरील आकडा मुलास विचारला. विद्यासागर यांनी बरोबर उत्तर दिले. बापास आनंदाचे भरते आले. ते मुलास थोपटून म्हणाले, “शाबास बाळ, तू पूर्णपणे इंग्रजी आकडे शिकलास, अशी माझी खात्री झाली आहे.” अशा प्रकारच्या गोष्टी जरी फार अलौकिक व अपूर्व नसल्या, तरी खेडेगावातील एका मुलाने, जो शहरातील मुलाप्रमाणे जरा चौकस व अनेक गोष्टी पाहणारा नसतो, त्याने लक्षपूर्वक ही गोष्ट केली, याचे आम्हास तरी फार कौतुक वाटते.

पिता-पुत्र आता कलकत्त्यास आले. दुसर्‍या दिवशी ठाकुरदास आपल्या कामांत दंग झाले. ते निरनिराळी ‘बिले’ नंबरवार लावत होते. जवळ विद्यासागर बसले होते. आपले वडील काम करीत आहेत हे तो लक्षपूर्वक पाहत होता. ठाकुरदास यांचे हल्लीचे नवीन मालकही (त्यांचे नाव जगददुर्लभ असे होते) तेथे त्यास मदत करीत होते. या बिलांचे वडील काय करतात, हे सर्व आता ईश्वरचंद्रांच्या ध्यानात आले; व “हे काम मलाही करता येईल” असे तो आपल्या वडिलांस म्हणाला. जगददुर्लभांस मुलाची इच्छा पाहून विस्मय वाटला. “तुला इंग्रजी आकडे समजतात का?” असा प्रश्न त्यांनी विचारला. “होय” असे विद्यासागराने उत्तर दिले. रस्त्यावर येताना घडलेली सर्व हकीकत ठाकुरदास यांनी आपल्या धन्यास निवेदन केली. आपल्या मुलाचा मोठेपणा दुसर्‍यांना सांगताना आई-बापास किती धन्य वाटत असते! “तर मग ही बिले लाव पाहू बाळ” असे जगददुर्लभांनी विद्यासागर यास सांगितले. विद्यासागर यांनी आपले काम चोख बजाविले हे पाहून ‘हिंदुमहाविद्यालयात तुम्ही तुमच्या या मुलास इंग्रजी शिक्षण, काही करा, पण द्याच!’ असे त्रयस्थ मंडळींनी ठाकुरदास यांस परोपरीने सांगितले. ‘ठाकुरदास सारख्या गरीब गृहस्थास या उच्च शिक्षणाचा खर्च झेपेल कसा?’ अशी शंका एकाने प्रदर्शित केली.

 

पुढे जाण्यासाठी .......

ईश्वरचंद्र विद्यासागर