मंगळवार, जानेवारी 28, 2020
   
Text Size

सोन्यामारुति

दुसरा : आडवें आलें कीं कापून काढावे. बाकी तू ध्येयनिष्ठ खरा. भाऊ मरणारच होता आज ना उद्यां. परंतु बोर्ड म्हणजे सार्वजनिक संस्था. तेथें वाटेल ते लोक म्हणजे लाखों लोकांचें मरण! सार्वजनिक हित आधीं. समाज आधीं. मग कुटुंब. म्हटलेंच आहे आपल्या पूर्वजांनी कीं कुटुंबासाठीं स्वत:चा त्याग करावा; गांवासाठीं कुटुंबाचा त्याग करावा; देशासाठीं, देवासाठीं सर्वस्वाचा त्याग करावा.

तिसरा : मला वाटतें कीं आणखी अर्धापाऊण तास थांबावें. मुंबईची गाडी येऊन जाऊं दे.

पहिला : खरेंच शेवटचें दर्शन घेईल.

दुसरा : कांहीं नको थांबायला. मेल्याचें दर्शन घेण्यांत काय अर्थ ? अग्नि द्यायला कोणी हवें म्हणून याच्यासाठीं थांबलो. तिच्यासाठीं कशाला थांबायचें ?

पहिला : अहो, कोणी थोर मनुष्य मेला तर त्याचें दर्शन सर्वांना घडावें म्हणून प्रेत मुद्दाम ठेवतात !

दुसरा : हा काय कोणी महात्मा आहे कीं काय ?

तिसरा : पत्नीला तो महात्माच आहे. पत्नीचें सारें कांहीं तो आहे.

भाऊ : मला वाटतें उरकून टाकावें. प्रेताला ठेवण्यांत अर्थ नाहीं.

एकजण : उचला तर मग. लांकडे केव्हांचीं पुढें गेलीं आहेत वाट पहात आहेत.

वसंता : आणि आतां पत्नी आली तर ?

वेदपुरुष : ह्यांना काय त्याचें ? स्त्रियांच्या भावना कोण ओळखतो ? तुला एक मारवाडी लोकांतील चाल आहे का माहीत ?

वसंता : पडद्याची ना ? तोंडावरुन त्या लांब पदर घेतात.

वेदपुरुष : तें जाऊं दे. परंतु घरांत पतीजवळ वडील मंडळी आजूबाजूला असतां बोलायचें नसतें.

वसंता : ती पध्दत सर्वांतच पूर्वी रूढ होती.

 

तिसरा : चार वाजेपर्यंत का हें प्रेत ताटकळत ठेवायचें ?

पहिला : मग सहा वाजतां मुंबईकडील गाडी येते, त्या वेळेपर्यंत तरी ठेवावें. कदाचित् ह्याची बायको मुंबईहून येईल. तार दिली आहे.

दुसरा : प्रेत ठेवण्यांत काय अर्थ आहे ?

पहिला : भावासाठीं ठेवतां, मग पत्नीसाठीं कां नको ? भावाच्या प्राणांपेक्षां ज्याला बोर्डाची निवडणूक महत्वाची वाटते, त्याच्यासाठीं तुम्ही वाट पाहतां. मग जिंचे सर्वस्व म्हणजे पति, ती कदाचित् येईल, तिच्यासाठींहि थोडा वेळ थांबा. स्त्रियांच्या भावना म्हणजे का कचरा ?

दुसरा : अहो, त्यांना आत्मा नसतो असें उपासनी बाबा म्हणतात ?

तिसरा : आत्मा नसलेल्या स्त्रीच्या पोटांतून बाहेर येणार्‍याला तरी आत्मा आहे का ? यांचीं तोंडें आहेत कीं तोबरे आहेत ?

दुसरा : महान् संतांबद्दल असें बोलूं नये.

पहिला : हे असले संत नसून जंत आहेत झालें !

दुसरा : तुमच्या गांधींबद्दल असें म्हटलें तर ?

पहिला : तुमची मनोदेवता असें म्हणावयास सांगेल तर म्हणा. आम्ही म्हणतो म्हणून तुम्हीं म्हणायचें अशांत काय अर्थ आहे ? खर्‍या  संताला सारे वंदनच करितील .

एकजण : जाऊं द्या वाद. ते पहा बोर्डवाले भाऊ आले.

दुसरा : करा तयारी. आंवळा दोर्‍या. नीट करकचून बांधा.

पहिला : तिकडे गेलास नी भाऊ मेला.

भाऊ : यश येईलसें वाटत नाहीं. काँग्रेसचा फार जोर आहे. जेथें तेथें ही काँग्रेस आडवी येते.

 

सातवें दर्शन

वेदपुरुष : आजचा आपला शेवटचा दिवस !

वसंता : आणि मग मला सोडून तूं जाणार ?

वेदपुरुष : तुला दृष्टि आली असेल! अजूनहि आली नसेल तर ती केव्हां येणार ?

वसंता : तूं माझी खरी मुंज लाविलीस! मला द्विज केलंस. माझा पुनर्जन्म झाला! नवीन डोळे, नवीन कान, नवीन हदय, नवीन मन, नवीन बुध्दि, नवीन आत्मा! सारें नवीन झालें.

वेदपुरुष : जें आतां दिसेल त्याच्याशीं सत्य रहा. डोळ्यांवर पडदे बांधूं नकोस. चल आतां जाऊं.

वसंता : आज आकाश फारच खिन्न दिसत आहे. सृष्टि सुन्न वाटत आहे.

वेदपुरुष : तो घोळका तेथें कां जमला आहे ?

वसंता : कोणी तरी मेलें असेल! हिंदुस्थानांत कोणी तरी मेलें म्हणजे सारे जमतात! जिवंत असतांना महाग असतात !

वेदपुरुष
: जिवंत असतांना कांहीं द्यावें लागतें; मेल्यावर जाळायचें असतें! खांदे दिले कीं भागतें. लांकडे रचलीं कीं झाले.

वसंता : आंत प्रेत आहे. कां बरें खोळंबा ?

वेदपुरुष : जरा कान देऊं म्हणजे उलगडा पडेल.

एकजण : तरी याच्या भावाला सांगितलें होतें कीं तूं जाऊं नकोस. परंतु ऐकतो कोण ?

दुसरा : बोर्डांत निवडून यायचें आहे त्याला. जिवंत राहणा-यांनीं मरणार्‍याच्या भोंवतीं किती दिवस रहावयाचें ? भावाच्या निवडणुकीच्या वेळेसच यालाहि आजारी पडण्याला व मरण्याला फावलें. आज निवडणुकीची तारीख आणि ह्याच्या भावाची मरण्याची तारीख.

पहिला : कालपासून तीन निरोप पाठवले. येता तर ? मरणाराला बरें वाटलें असतें.

तिसरा : येतों येतों असें उत्तर आलें, परंतु अजून आले नाहींत. प्रेत किती वेळ ठेवायचें तरी ?

दुसरा : परंतु आतां एक मनुष्य आला, त्याच्याबरोबर काय आला निरोप ?

पहिला : आतां एवींतेवीं भाऊ मेलाच आहे तर काम आटोपूनच येतों. चारच्या सुमारास येतों !

   

वेदपुरुष : भीष्मांना मरणशय्येवर पाताळगंगेचें पाणी हवें होतें. दुर्योधनाच्या भरलेल्या पाण्याच्या झा-या त्यांनीं परत केल्या! हृदयांतील पाणी म्हणजे पाताळगंगेचें पाणी.

वसंता : हें हृदयपाताळांतील पाणी डोळ्यांच्या नळाबाहेर येत असतें व जीवाला समाधान होतें !

वेदपुरुष : परंतु अशा बिनवारशी लोकांसाठीं कोण रडेल ?

वसंता : ते पहा कांहीं विद्यार्थी येत आहेत. डॉक्टरहि आहेत बरोबर.

डॉक्टर : मेला वाटतें !

विद्यार्थी : सुटला बिचारा !

डॉक्टर : तें इंजेक्शन नसतें दिलें तर बरें.

विद्यार्थी : अनुभव आला.

डॉक्टर : दुसरे त्यामुळें वांचतील.

विद्यार्थी : चला.

डॉक्टर : खटारा येणार आहे. जाऊं दे.

वसंता : गेले हंसत हंसत !

वेदपुरुष : अति झालें नी हंसूं आलें.

वसंता : हिंदुस्थानांत मरणाचेंहि हंसें होत आहे !

वेदपुरुष : हिंदुस्थानचा मह्मत्युदेव हा खरा राजा आहे. वसंता! राष्ट्राचा सार्वत्रिक अध:पात झाला आहे. कोणत्याहि संस्था घ्या. तेथेंहि वशिले, गरीब-श्रीमंत, राव-रंक हे भेद आहेत. तेथेंहि सर्वासाठीं एक कर्तव्य नाहीं! सर्वत्र भेदांचा बुजबुजाट आहे. घाण आहे, दुर्गंधि आहे. तुम्हीं तरुणांनीं उठून ही घाण जाळली पाहिजे! सर्वत्र मंगल, समता व आनंद निर्माण करण्यासाठीं उठलें पाहिजे! हा तुमचा महान् धर्म! ही तुमची सोन्यामारुतीची पूजा!

 

वसंता : आणि तो पलीकडच्या खाटेवरचा उपडा वळून खोकत आहे.

बरदाशी : पुरे कर रे. खोकूं नको.

वेदपुरुष : हा कोण धांवत येत आहे ?

वसंता : भयंकरच बातमी त्यानें आणिली आहे !

वेदपुरुष : कोणी रोगी मेला. तिकडे असेल ठेवलेला आतां कोठें कळलें. चला आपण पाहूं.

वसंता : परंतु लगेच कळलें कसें नाहीं ?

वेदपुरुष : येथें शेकडों रोगी आहेत. एखादा निजलेला आहे असें वाटतें.

वसंता : परंतु ती शेवटची निद्रा ठरते.

वेदपुरुष : याला कोणी नाहीं का ? अनाथ असावा.

वसंता : याला मठमाती कोण देईल ?

वेदपुरुष : सर्वांची मायबाप म्युनिसिपालिटी.

वसंता : नाहीं तर विद्यार्थ्यांना शारीरशास्त्र शिकण्यासाठीं उपयोग होईल.

वेदपुरुष : मरतांना त्याच्याजवळ कोणी नव्हतें.

वसंता : अरेरे! शेवटचें पाणी कोणीं दिलें असेल ? शेवटचा शब्द कोण बोललें असेल ?

वेदपुरुष : पांखरांनीं गोड शब्द दिले असतील! वार्‍यानें चौकशी केली असेल !

वसंता
: मरतांना आपल्यासाठीं कोणी रडेल का असा विचार मनांत येत असेल नाहीं! मी आजारी पडलों म्हणजे माझ्या समाचाराला कोणी येईल का, माझ्या केंसावरुन, कपाळावरुन, प्रेमानें कोणी हात फिरवील असें मनांत येत असेल. मेल्यावर मृताम्याला पाणी देतात, परंतु शरीरांतून जाऊं पाहणार्‍या जिवाला डोळ्यांतील दोन थेंबांची तहान असते. दुसरें पाणी त्याला आवडत नाहीं.

   

पुढे जाण्यासाठी .......