शनिवार, जानेवारी 25, 2020
   
Text Size

सोन्यामारुति

वेदपुरुष : शाळेचें ऑफिस दिसतें.

वसंता : ते खुर्चीवर बसलेले शाळेचें मुख्य चालक दिसतात. शाळेसमोर हा कोण तरुण आहे ?

वेदपुरुष : हा तरूण शाळेंतील एक शिक्षक आहे.

वसंता : कां बरें तो असा उभा आहे ?

वेदपुरूष : त्यांच्या संवादावरून कळेल. तो संवादच ऐक.

शिक्षक
: माझा यांत काय बरें दोष ?

चालक : पुन्हा काय दोष म्हणून विचारतां ?

शिक्षक : मुलांनीं विचारलेल्या प्रश्नांचें उत्तर देणें म्हणजे का गुन्हा आहे ? मुलांची जिज्ञासा तृप्त करणें हें तर शिक्षकाचें पहिलें कर्तव्य आहे.

चालक : परंतु जिज्ञासेजिज्ञासेंतहि फरक करायला हवा.

शिक्षक : मुलांची जिज्ञासा ही सदैव निर्मळच असते असें गृहीत धरलें पाहिजे. सर्व जिज्ञासा पवित्र आहे. निदान प्रस्तुत प्रसंगाची तरी त्यांची जिज्ञासा मला सदोष वाटली नाहीं.

चालक : 'आपल्या देशांत एक एप्रिलला हरताळ कां पडणार आहे ?' असें त्यांना मुलांनीं विचारलें.

शिक्षक : होय. या हरताळाचें महत्त्व काय, तो कां पाडावा, पाडणें योग्य आहे कीं नाहीं वगैरे प्रश्न ते मला विचारीत होते. मी इतिहासशिक्षक आहें. हिंदुस्थानची राज्यपध्दति मला शिकवावी लागते. या प्रश्नांची उत्तरें माझ्यापासून मुलें नाहीं का अपेक्षिणार ? मीं त्यांना हरताळ पाडा असें सांगितलें नाहीं. हिंदुस्थानभर हरताळ कां पडणांर आहे तें मीं समजावून सांगितलें.

चालक : तुम्ही काँग्रस, जवाहीरलाल वगैरे शब्द उच्चारिलेत कीं नाहीं ? जवाहीरलालांची स्तुति केलीत कीं नाहीं ?

शिक्षक : त्यांची स्तुति कोण करणार नाहीं ? अणुरेणु त्यांची स्तुति करील.

चालक : तुम्हीं कोणचें वर्तमानपत्र वर्गांत नेलें होतें ?

शिक्षक : लोकशक्ति.

 

वसंता : तुमच्या घराचें भाडें ?

मुलगा : चार रुपयांची आहे खोली.

वसंता : तेथें उजेड आहे ?

मुलगा : तेथें ओल असते व अंधार असतो.

चसंता : उगी. रडूं नको.

वेदपुरुष : वसंता, चल.

वसंता : कोठें ?

वेदपुरुष : आपण खोलींत गुप्तरूपानें शिरूं. तें बघ दृश्य.

वसंता : कां मारताहेत मुलाला ?

वेदपुरुष : त्यानें दोन्ही बाजूंनीं लिहिलें म्हणून !

वसंता : तो गरीब मुलगा वह्या कोठून आणील ?

वेदपुरुष : इन्स्पेक्टर म्हणतात एका बाजूनें लिहा! विदेशी कागद जास्त खपतील !

वसंता : आणि त्या एका मुलाला कां बरें मारताहेत ?

वेदपुरुष : तो वहीवर कविता लिहीत बसला होता. मास्तरांच्या शिकवण्याकडे त्याचें लक्ष नव्हतें !

वसंता : काव्याची प्रतिभा मारली जात आहे! मोत्याची माती होत आहे!

वेदपुरुष : यालाच शिक्षण म्हणतात! सर्वांना तेंच तें शिक्षण! एका दाबांत घालून सर्वांचीं मनें एकाच प्रकारच्या गुणधर्मांचीं करण्याचा हा प्रयत्न आहे. त्रिकोण असो, गोल असो, सारे चौकोनांतून आंत घुसवले जात आहेत! मुलांच्या गुणधर्माकडे लक्ष नाहीं. मुलांचा वर्ण पाहिला जात नाहीं. त्यांच्या हृदयाचा, बुध्दीचा रंग कोण पाहतो ? विद्यापीठ ठरवील तो रंग; इन्स्पेक्टर सांगेल त्या नियमांनीं व त्या बंधनांत, शिक्षक मुलांच्या जीवनाला फळकूट समजून, माती समजून, तो रंग देत असतो! केवढा नाश, केवढी हत्या! भारतीय मुलांची केवढी कत्ताल! आणि तिकडे दगडी सोन्यामारूतीच्या समोर घंटा वाजवीत आहेत !

वसंता : ही इकडे कशाची खोली आहे ?

 

वेदपुरुष : संस्थेच्या चालकांबद्दल कांहीतरी चर्चा आहे. आपण ऐकूं ये.

एक : परंतु संमेलनाला जवाहीरलालांना कां बोलावलें जाऊं नये! आमच्या राष्ट्राच्या महान् पुरुषाला आमच्या संस्थेंत येण्याची कां बंदी व्हावी ?

दुसरा : जवाहीरलाल खुद्द इंग्लंडमधील विद्यार्थ्यांसमोर जाऊं शकतील. महात्माजी इटन येथील विद्यार्थ्यांसमोर संस्थेंत जाऊन बोलले. परंतु आमच्या देशांतल्या देशांत किती ही गळचेपी ?

तिसरा : हा विद्यार्थ्यांचा हक्क आहे, विद्यार्थी ठरवतील त्याला चालकांनी बोलावणें योग्य आहे.

चौथा : परंतु चालक तयार नाहींत. संमेलन नाहीं झालें तरी चालेल असें ते म्हणाले! विद्यार्थ्यांचा हा सर्व बाजूंनी कोंडमारा आहे. चालकांजवळ स्फूर्ति नाहीं. स्फूर्तिदाते संस्थेंत कधीं येऊं देणार नाहींत.

वसंता : वेदपुरूषा, किती लाजिरवाणी स्थिति आहे ही !

वेदपुरुष : हें कांहींच नाहीं. खोल दृष्टि देऊन पाहाशील तर सारा गुलामांचा व मिंध्या लाळघोट्यांचा सांवळागोंधळ या संस्थांतून दिसेल!

वसंता
: चल, दुसरीकडे चल. तो मुलगा रडत कां घरीं चालला आहे ? आपण त्याला विचारूं.

वेदपुरुष : चल.

वसंता : बाळ, कां रे रडतोस !

मुलगा : मास्तरांनीं मारलें व हांकून दिलें.

वसंता : तूं काय केलेंस ?

मुलगा : माझ्याजवळ पुस्तक नाहीं. बाबा रोज म्हणतात ''उद्यां घेऊं.'' परंतु ते देत नाहींत व मास्तर वर्गांत बसूं देत नाहींत. ते म्हणाले ''चालता हो.''

वसंता : तुझा बाप काय करतो ?

मुलगा : खानावळींत वाढतो.

वसंता : त्याला किती पगार आहे ?

मुलगा
: दहा रुपये. ते तेथेंच जेवतात.

वसंता
: तुला किती भावंडें आहेत ?

मुलगा : तीन आहेत.

वसंता : आई काय करते ?

मुलगा : अधून मधून स्वयंपाक करावयाला जाते. दुसरें काम करते.

   

वसंता : परवां कोणा प्रोफेसरानें जवाहरलालजीचें चरित्र लिहिलें म्हणून त्यांना हांकलून देण्यांत आलें!

वेदपुरुष : त्या कोणत्याशा शाळेंतील मुलें रस्त्यावरील मिरवणुकींत सामील झालीं म्हणून चालकांनी शाळेंत त्यांना मरेमरेतों मारिलें. कांहीं शाळांत दंड झाले. कांहीं संस्थांनीं मुलांना काढून टाकलें.

वसंता : मॅट्रिकच्या विद्यार्थ्यांस उद्देशून पत्रक काढणार्‍या निरपराध तरुणांची कांहीं संस्थांनीं खच्ची केली! ह्या शिक्षणसंस्था नाहींत. हीं थडगीं आहेत. मढीं मढींच निर्माण करणार! जीवनानें जीवन पटेल! मढ्यानें मढें तयार होईल !

वेदपुरुष : ह्या शिक्षणसंस्थांत ज्ञानाची धग नाहीं, ध्येयवादाची ऊब नाहीं, स्वाभिमानाचा किरण नाहीं, सहानुभूतीचा बिंदु नाहीं, मानसशास्त्राचें खरें दर्शन नाहीं, आसमंतांतल्या जगाचें भान नाही, उत्साह नाहीं, तेज नाहीं, प्रयोग नाहीं, प्रेम नाही, ओलावां नाही, आस्था नाहीं, उत्कटता नाहीं, कांहीं नाही! कांहीं नाहीं! या संस्थांतून एकच दिसेल! सरकारची व श्रीमंतांची हांजी हांजी करून पैसे मिळवायचे व दगडांवर दगड रचून टोलेजंग इमारती उभारावयाच्या! या टोलेजंग दगडांखालीं हजारों मुलांची जीवनें दडपलीं जातात! हजारों मुलांचे समुचित उत्साह, त्यांच्या आशा-आकांक्षा, त्यांच्या प्रतिभा, त्यांच्या स्फूर्ति, सारें सारें उध्वस्त केलें जाते. मुलांचा स्वाभिमान संस्थांना सहन होत नाहीं. 

वसंता : एका मुलाच्या खिशांत राष्ट्राचा झेंडा सांपडला म्हणून म्हणे त्याला दहा रुपये दंड झाला !

वेदपुरुष : सरकार जुलूम करीत नाहीं, एवढा जुलूम या संस्था करीत असतात! एक प्रकारचाच नाहीं, हजारों प्रकारचा जुलूम असतो! विशेषत: लहान मुलांची फारच कींव येते. लहान मुलांना सर्वांत थोर शिक्षक हवा. जास्तींतजास्त विशाल दृष्टीचा व विशाल हृदयाचा शिक्षक अगदी लहानपणापासून हवा. परंतु आपापल्या जातींची तुणतुणीं वाजविणारे, आपापल्य शेंडयांचे व गंधांचे अभिमानी या लहान मुलांसमोर असतात. अत्यंत संकुचित वृत्तीचे, सनातनी दृष्टीचे, जड जरठ मतीचे शिक्षक लहान मुलांना मिळतात! दुर्दैव त्या मुलांचे.

वसंता
: कांहीं कांहीं संस्था तर केवळ जातीय असतात! शिक्षणसंस्था तरी जातीय नसाव्यात!

वेदपुरुष : त्या शिक्षणसंस्था नसून आपल्या जातीच्या लोकांना नोकर्‍या देणार्‍या संस्था असतात! शिक्षणाचें ध्येय तेथें नसतें, राष्ट्राची उभारणी हें ध्येय तेथें नसतें. आपापल्या जातींतील पढलेल्या निस्तेज उत्साहशून्य लोकांना पोटाला मिळावें म्हणून शाळा सुरू होतात! या संस्थेत कोंकणस्थांनाच नोकरी, या संस्थेंत देशस्थांना, या संस्थेंत क-हाड्यांना, या संस्थेंत मराठ्यांना, या संस्थेंत प्रभूंना-काय आहे सारी घाण ! तोंडानें सहनाववतु म्हणतात व डबकीं करून राहतात! ज्याच्या ज्याच्याबद्दल दुजाभाव वाटतो, त्याला त्याला जवळ घेऊन हा सहनाववतु मंत्र म्हणावयाचा असतो. केवळ आपापल्या जाती, आपापलीं नातीं-गोतीं जवळ करून म्हणावयाचा नसतो. परंतु आहे कोठें विचार ? सारा विकारांचा पसारा आहे!

वसंता : चला. आपण कांही संस्थातून डोकावूं या.

वेदपुरुष : चल. त्या मोठ्या संस्थेंत चल. थोरामोठ्यांनी ती संस्था स्थापन केली होती.

वसंता : त्या झाडाखालीं ती मुलें काय बोलत आहेत ?

 

वेदपुरुष : विचार तुमच्या राष्ट्रांत मेलेला आहे. वृत्तापत्रें, साप्ताहिकें या गोष्टीकडे कधीं लक्ष देत नसतात. चिवडे, चिरूट, चहा, चिमटे, चर्चा हेंच त्यांतून येत असतें. राष्ट्र धुळीस मिळत आहे इकडे त्यांचे लक्ष नसतें. एका वर्षांत पांच पांचदा परीक्षा घेऊन लाखों रुपये उकळण्याचें अमानुष काम विद्यापीठें करीत आहेत. परंतु कोण हांक फोडून उठतो! कोण पेटतो, कोण जळतो ?

वसंता : मुलांनीं तरी पुन:पुन्हा परीक्षेस कां बसावें ?

वेदपुरुष : अगतिक मुले काय करतील ? आशा कुणाला सुटली आहे का ? दारूचे गुत्तो घालून दारू बंद होत नसते. गुत्तो घातलेत कीं लोक यांवयाचेच! तुम्हीं परिक्षा पुन:पुन्हा ठेवलयात तर मुलें येणारच. परंतु चार चार पांच पांच वेळां नापांस होणार्‍या मुलाच्या जीवनांत शेवटीं किती निराशा, केवढा अंधार भरलेला असेल ?

वसंता : दहादहा हजार विद्यार्थ्यांतून दोन हजारहि मुलें पास होत नाहीत, याचा अर्थ काय ? हिदुस्थानांत बुध्दि उरलींच नाहीं का ?

वेदपुरुष : याला अनेक कारणें आहेत. पोटभर खायला मिळत नाहीं; स्मृति त्यामुळे तेजस्वी रहात नाहीं. परंतु मुख्य कारण म्हणजे इंग्रजींतून शिक्षण! आणि इंग्रजीला महत्त्व! इंग्रजीला म्हणें शेंकडा चाळीस मार्क पाहिजेत, मराठीमध्यें तीसपस्तीस पुरेत! असला चावटपणा जगांत कोठें असेल का ? शाळा तपासणारे येतात, ते मुलांना अमुक उच्चार चूक, तमुक उच्चार चूक असें म्हणून सतावतात. शाळेला शेरा देतात ''इंग्रजी नीट शिकविलें जात नाहीं !'' काय ही हमाली व गुलामी! परंतु तुम्हांला चीड येत नाही !

वसंता : मराठी विद्यापीठ स्थापण्यासाठीं प्रयत्न होत आहेत.

वेदपुरुष : या प्रयत्‍नांना कोण विचारतो ? दरवर्षी महाराष्ट्रांत हजारों मुंजी लागतात. परंतु मुलाला मायभाषेंतून ज्ञान मिळण्याची सोय आहे कीं नाहीं कोणी पहात नाहीं. मुलाची खरीखुरी मुंज करणारा आधीं मराठी विद्यापीठाला मदत करील. गायत्री मंत्र मुलाला देऊन बाकीचा सारा होणारा खर्च त्यानें त्या मराठी विद्यापीठास द्यावा. एखाद्या ज्ञानमंदिरात मुलाला उभें करावें. सभोंवतीं ज्ञानांत भर घालणार्‍या महर्षीचीं चित्रें असावींत. एखाद्या थोर आचार्याला बोलवावें. त्यानें मुलाला म्हणावें, ''बाळ, आजपासून या ज्ञानमंदिरांत तूं प्रवेश करीत आहेस. तूं ज्ञान मिळव, नवीन ज्ञान जगाला दे. ज्ञान जीवनांत आण !'' झाली मुंज, पित्यानें तेथें शक्तीप्रमाणें ज्ञानप्रसाराला देणगी द्यावी. हजारों मुंजी लागत आहेत, परंतु ज्ञान मरत आहे. कारण स्वभाषेचें विद्यापीठ नाहीं, त्याला मदत नाहीं, देणगी नाहीं !

वसंता : ते इंग्रजी शब्द घोकतां घोकतां मुलें कंटाळतात !

वेदपुरुष : अरे कंटाळून आत्महत्या करितात! इंग्रजींत मिळतात तीन मार्क! मग बाप रागावतो, मास्तर रागावतात, हुशार मुलें हंसतात, त्रस्त झालेला मुलगा विहिरींत उडी घेतो !

वसंता : किती शोकजनक स्थिति !

वेदपुरुष : मागें पुण्याला एक गृहस्थ होते. ते होते डॉक्टर. त्यांचा मुलगा पुस्तकी ज्ञानांत होता ढ. त्याला इंग्रजींत तीन मार्क मिळत. इंग्रजींतून घातलेल्या गणितांच्या प्रश्नांचा त्याला अर्थच समजत नसे. तो नेहमी नापास होई. शेवटीं त्यानें अफू खाऊन आत्महत्या केली! सोन्यामारुतींची अशी ही हत्या होत आहे! देहापेक्षां मनाचें मोल अधिक! भारतांतील लाखों मनें मारलीं जात आहेत.

वसंता
: शाळेंतील विषयांतहि प्रत्यक्ष जीवनाशीं कधींच संबंध येत नाहीं. जवळच्या नदीचें नांव माहीत नसतें, परंतु अमेरिकेंतील नद्यांची लांबीरूंदी पाठ!

वेदपुरुष : देशांतील जिवंत महापुरुषांचीं नांवें माहीत नसतात, परंतु तैमूरलंग व आठवा हेन्‍री यांची नावें मुलें विसरत नाहींत! अकबराची कारकीर्दं शिकवतात, परंतु महात्माजींची वा जवाहरलालजींची कारकीर्द शिकवण्यांत येत नसते. एवढेंच नव्हे तर यांची नांवे उच्चारण्याचीहि भीति असते. तीं नावें उच्चारली तर सार्‍या प्रचंड दगडी इमारती गडप होतील असें सर्वांस वाटतें!

   

पुढे जाण्यासाठी .......