बुधवार, एप्रिल 21, 2021
   
Text Size

महात्मा गांधींचें दर्शन

कोणी शस्त्रबळाने युध्द करून नवीन जग निर्मूं पाहात आहेत. कोणी शस्त्रबळाने क्रांन्ति घडवून आणून जगाचा कायापालट करू पाहात आहेत. एखादे युध्द पुकारून त्यात मिळणा-या विजयातून नवीन दुनिया पैदा करू, नवे जग निर्मूं अशी आशा कोणी उराशी बाळगून आहेत. परंतु या मार्गांनी नवीन जग निर्माण होईल असे महात्मा गांधींना वाटत नाही. महात्मा गांधींचे जीवनाचे दर्शन या लोकांच्या दर्शनापेक्षा निराळे आहे. त्यांगी गेली २०/२५ वर्षे किंवा आफ्रिकेत असल्यापासून जो प्रयोग सुरू केला आहे, ज्या अनेक चळवळी त्यांनी केल्या व करीत आहेत, त्या सर्वांच्या बुडाशी असे एक तत्त्वज्ञान आहे, असे एक विशाल दर्शन आहे की त्याला इतिहासात दुसरा दाखला नाही. महात्मा गांधी क्रांन्तिकारी आहेत परंतु आजपर्यंत होऊन गेलेल्या सर्व क्रांन्तिकारकांहून ते निराळे आहेत. ते एक थोर धर्मपुरुष आहेत. परंतु आजपर्यंत होऊन गेलेल्या धर्मपुरुषांहूनही ते विभिन्न आहेत. ते एक थोर राजकीय नेते आहेत परंतु इतर सर्व राजकीय नेत्यांहून ते निराळे आहेत. त्यांची विभूति अशी सर्वाहून भिन्न असली तरी ते पुनःपुन्हा सांगत असतात की मी जे काही सांगत आहे, मी जी तत्त्वे सांगत आहे त्यांत नवीन असे काही नाही. मी पूर्वीचीच ती सनातन तत्त्वे सांगत आहे. महात्माजी जरी असे म्हणत असले तरी त्या जुन्या तत्त्वांच्या आचरणासंबंधी ते नवीन दृष्टि देत आहेत यात शंका नाही. महात्माजी जे सांगत आहेत ते जुनेही नाही व नवीनही नाही. ते जी तत्त्वे सांगतात ती जुनी म्हणजे शिळी या अर्थाने सांगत नाहीत. काही तरी नवीन अर्थ त्या जुन्या तत्त्वांत ते ओततात. आणि यामुळेच सर्व हिंदी जनतेचे चित्त त्यांनी ओढून घेतले आहे. नवीन हिंदी राष्ट्र निर्माण करण्यासाठी झगडणारी जी काँग्रेस संस्था तिचे चित्त त्यांनी ओढून घेतले आहे आणि काँग्रेसच्या नेतृत्वामुळे राजकीय पुढारी म्हणून आज जगापुढे ते आहेत. काँग्रेसमध्ये ते आले व राजकारण हा त्यांचा नित्याचा एक व्यवसाय झाला. परंतु त्यांचा संदेश राजकारणापुरताच नाही. राजकारण म्हणजे काही संपूर्ण जीवन नाही. राजकारणाच्या मर्यादा ते जितक्या समजतात तितक्या अन्य कोणासही समजलेल्या नाहीत.

महात्मा गांधींसारखी अलौकिक विभूति जनतेच्या संसारांत जेव्हा उतरते, एखादे नवीन तत्त्वज्ञान घेऊन जेव्हा ती जनतेसमोर येते, तेव्हा ती केवळ शब्दपांडित्याने पुढे येत नसते. अशी विभूति आपल्या आचरणाने जगासमोर येते; ही महत्त्वाची गोष्ट आहे. गीतेवर लिहिलेल्या अनासक्तियोगाच्या प्रस्तावनेत त्यांनी म्हटले आहे,''गीतेचा केवळ शास्त्रीय पांडित्याच्या दृष्टीने विचार करण्याची माझी पात्रता नाही. परंतु या तत्त्वांचे आमरण आचरण करण्याची खटपट करणारा या दृष्टीने माझी पात्रता आहे.'' अशा अर्थाचे त्यांचे शब्द आहेत. कोणत्याही तत्त्वज्ञानाचे रहस्य काय, त्या तत्त्वज्ञानाचे मर्म काय, असा जेव्हा प्रश्न समोर येतो, तेव्हा त्याचे अनुकरण करून पाहा हेच उत्तर असते. प्रत्यक्ष व्यवहार हीच त्या तत्त्वज्ञानाची कसोटी. ज्या व्यवहारांत आपणांस रहावयाचे असते त्या व्यवहारातच जर ते तत्त्वज्ञान आपण आणू लागलो तरच त्याचे रहस्य कळेल आणि याच दृष्टीने महात्माजींनी अनासक्तियोग पुस्तक लिहिले आणि भगवद्गीतेच्या अर्थासंबंधाने ज्या निरनिराळया मीमांसा आजपर्यंत झाल्या, त्याहून नवीन दृष्टि त्यांनी दिली आहे.

अनासक्तियोग हे छोटे पुस्तक आहे. भगवद्गीतेतून अहिंसा धर्म निघू शकतो असे त्यात महात्माजी सांगतात. भगवद्गीतेंत अहिंसा आहे. ही गोष्ट आपल्या जड बुध्दीला समजली नसती. असे कोणी पूर्वी सांगता तर आपण हसलो असतो; परंतु नव्या दृष्टीने पूर्वीच्या ग्रंथाकडे पाहण्याची दृष्टि आली म्हणजे मग वाटू लागते की महात्माजी म्हणतात ते बरोबर असू शकेल. ही नवी दृष्टि देणारा मनुष्य भेटला पाहिजे.

( पान ६ नाही)

 

पुढे जाण्यासाठी .......

महात्मा गांधींचें दर्शन