शनिवार, जुलै 11, 2020
   
Text Size

गोप्या

मामाच्या घरी

गोपळचा बाप मरण पावला. सावित्री मुलाकडे पाहून दिवस कंठीत होती. पुन्हा ती एकटी झाली. आपण दुर्देवी आहोत, असे पुन्हा तिच्या मनात सारखे येऊ लागले. हा बाळ आपल्याजवळ राहिला तर त्याचेही बरेवाईट व्हायचे, असे तिच्या मनात राहून राहून येई. त्या मोठया घरात ती नि गोपाळ दोनच जीव. गोठयात गाय होती. परंतु तिने गाय विकून टाकली. तिला मजुरी करायला जावे लागे. एवढे मोठे घर असून काय उपयोग? मजुरीही रोज मिळत नसे. लोक तिची टिंगल करीत. कोणी वाटेल ते बोलत. ती सारे सहन करी.

परंतु ते राहते घरही गेले. त्या घरावर सावकरांच्या जप्त्या आल्या. घरातून सावित्री मुलाला घेऊन बाहेर पडली. आता कोठे राहायचे? तिला कोठे आधार दिसेना. शेवटी एके दिवशी मुलाला घेऊन ती गावाबाहेर पडली. त्या गुणगुणी नदीच्या तीराने ती जात होती. मध्येच बाळाला ती कडेवर उचलून घेई. थोडया वेळाने त्याला ती खाली उतरी. आईच्या पाठोपाठ बाळ दगडधोंडयातून दुडूदुडू धावे. आई जरा लांब गेली की लहानगा गोपाळ रडू लागे. सावित्री थांबे. ती त्याला उचलून घेई. घामाघूम झालेल्या बाळाचा मुका घेऊन ती म्हणे, 'अशा दुर्देवी आईच्या पोटी कशाला आलास बाळ?'

बाळ आईला घट्ट धरून ठेवी. जणू आई कोठे जाईल असे त्याला वाटे. जाता जाता देव मावळला. अंधार पडू लागला. गोपाळला उचलून घेऊन ती दु:खी माता जात होती. किती दूर जाणार, कोठे जाणार ती? ती आता थकली, दमली. पायांना फोड आले. परंतु अद्याप गाव दिसेना. किती लांब आहे गाव? कोणत्या गावी तिला जायचे आहे? रानात कोल्हे ओरडत होते. रातकिडे किर्र आवाज करीत होते. गोपाळ आईला चिकटून होता. चांदणेही आज नव्हते. परंतु निरभ्र आकाशातील तारे चमचम करीत होते. त्यांच्या उजेडात ती प्रेममूर्ती माता जात होती. गार वारा सुटला. बाळाला थंडी लागत होती. आपल्या पदराचे पांघरूण घालून माता गोपाळला सांभाळीत होती.

आता दूरचे दिवे दिसू लागले. गुरांच्या गळयांतील घंटाचे आवाज कानांवर येऊ लागले. कोणता तरी गाव आला. हाच का गाव सावित्रीला पाहिजे होता? ती झपझप पावले टाकीत जात होती. ती गावात शिरली. तो मोठा गाव होता. सर्वत्र गजबज होती. शेतांतून गाडया गावात येत होत्या. गुरांना शेतकरी दाणावैरण घालीत होते. कोठे दूध काढीत होते. कोठे मजूरांना मजुरी देण्यात येत होती. त्या मातेचे कशाकडेही लक्ष नव्हते. शेवटी ती एका मोठया घराजवळ थांबली. कोणाचे होते ते घर? कोण राहत होते तेथे? गडीमाणसांची तेथे ये-जा सुरू होती.

'कोण आहे तिथे उभे? चोर की काय?' कोणी विचारले.

'मी आहे.' सावित्री म्हणाली.

'मी म्हणजे कोण?'

'मी सावित्री. दादाकडे आले आहे.'

इतक्यात घराचा मालक तेथे आला. गडबड ऐकून तोच माडीवरून खाली आला.

'काय आहे रे गडबड?' त्याने विचारले.

'दादा, मी आले आहे.'

'कोण? सावित्री?'

'होय, दादा.'

'तू पुन्हा येथे कशाला आलीस? काही वर्षापूर्वी तू एकदा आली होतीस. तुझा पहिला नवरा तेव्हा मेला होता. परंतु मी तुला  घरात ठेवले नाही. तू पांढ-या पायांची अवदसा आहेस. जाशील तेथे नि:संतान करशील. तुला मी घालवून लावले होते. पुढे कळले की तू पुन्हा दुसरा नवरा केलास आणि तोही मेल्याचे परवा कळले. परंतु येथे कशाला आलीस? भावाचीच सत्वपरीक्षा घ्यायला आलीस वाटते? तू चालती हो. माझ्या भरल्या घरात दुर्देव नको.'

'दादा, आजची रात्र राहू दे. आजच्या रात्रीचा विसावा दे. उद्या ही बहीण येथे राहणार नाही. देव उगवायच्या आत मी निघून जाईन. राहू दे. नाही नको म्हणूस.'

'बरे तर. आजची रात्र राहा. या पडवीत झोप. सकाळ होण्यापूर्वी निघून जा. सकाळी तुझे तोंड दिसायला नको. समजलीस? आणी हा तुझा मुलगा वाटते?'

'होय. माझा गोपाळ.'

 

पुढे जाण्यासाठी .......

गोप्या