शनिवार, जुन 06, 2020
   
Text Size

गोप्या

'आणि मामाने घालवले तर तू स्वतंत्र होशील. तू काही आता लहान नाहीस. वाटेल तेथे काम करशील. अशी बोलणी झाली आणि गोप्याने तो प्रयोग करण्याचे कबूल केले.'

एके दिवशी गोप्या उठला. त्याने आंघोळ केली. मामाचा मुलगा अद्याप झोपलेला होता. गोप्याने मामाच्या मुलाचे कपडे घातले. तो सुंदर धोतर नेसला, तो रेशमी सदरा त्याने घातला. केसांना तेल लावून त्याने सुंदर भांग पाडला. राडबिंडा दिसू लागला. दिवाणखान्यातील एका आराम खुर्चीत गोप्या पडून राहिला. हातात त्याने वर्तमानपत्र घेतले. जणू वाचनाचा शौकीन.

थोडया वेळाने मामाचा मुलगा उठला. त्याला स्वत:चे कपडे सापडेनात. तो आरडाओरडा करीत दिवाणखान्यात आला. तो तेथे गोप्या एखाद्या राजाप्रमाणे ऐटीत बसला होता.

'काय रे गोप्या, हा सदरा कोणाचा?'

'मी घातला आहे आज अंगात.'

'हा काय चावटपणा! दे माझा सदरा. आणि हे धोतरही माझेच. तुला गुराख्याला हे कपडे रे कशाला?'

'मी का नेहमीच गुराखी राहू वाटते? मीही माझ्या मामाचा भाचा आहे. मामाला शोभेशा रितीने मी वागले पाहिजे. नाही तर लोक मला हसतील. तू माझ्या मामाचा मुलगा तर मी माझ्या मामाचा भाचा आहे. आज गुरे घेऊन मी गेलो नाही. गुराखीपणा पुरे झाला. आता मी आरामखुर्चीत बसणार. तुझ्याप्रमाणे ऐट करणार, चैन करणारा, समजलास?'

'ब-या बोलाने माझे कपडे दे.'

'मी देणार नाही. अंगाला हात तर लावून बघ!'

मामाचा मुलगा काडीपेहेलवान होता. गोप्याने एक थप्पड दिली असती तर तो कोलमडून खाली पडता. तो गोप्याच्या वाटेस गेला नाही. त्याने आईला हाक मारली. गोप्याची मामी तणतणत वर आली.

'काय रे आहे भानगड?' आणि हा कोण, गोप्या का? चांगला आहे उद्योग! तू गुरे घेऊन गेला नाहीस वाटते? हे ढंग तुला सुचले आज? दे त्याचे कपडे. तू तुझी घोंगडी घेऊन रानात जा. ऊठ ब-या बोलाने. गोप्या, माजलास होय तू?'

'मामी, मी माझ्या मामांचा भाचा आहे. मी का भिका-यासारखा राहू? मामांचा तो अपमान आहे. मी गुराखी होणे यात मामांची काय प्रतिष्ठा, काय शोभा? मी आजपासून झकपक राहायचे ठरवले आहे. मला नवीन कपडे द्या. तोपर्यंत हे वापरू दे. आता गुराखीपणा नको. मामी, मी तुझा भाचा नाही का?'

'दुर्देवी आईच्या पोटी कशाला आलास?'

'माझी आई दुर्देवी असेल तर आईचा भाऊही दुर्देवी असला पाहिजे. एकाच आईबापाच्या पोटी दोघांचा जन्म. मामी जगात कोणी जन्मत: दुर्देवी नसतो. माझ्या आईला नावे ठेवू नका. तुमचा आधार मला देऊन ती गेली. तिने तुमच्यावर विश्वास ठेवून मला येथे ठेवले. तुम्ही का मला एखाद्या भिका-याप्रमाणे वागवणार? माझी आई रागवेल.'

'रागावू दे तुझी आई. कुठे भूत होऊन बसली असेल तर बसू दे आमच्या मानगुटीस. परंतु तू आणखी नकोस मानगुटीस बसायला. समजलास?'

इतक्यात मामा तेथे आले. गोप्याचा तो नवा अवतार पाहून ते चकित झाले!

'काय रे गोप्या, हे कोणते नाटक?'

'हे नाटक नाही मामा, आजपासून तुमच्या इतमामास शोभेशा रीतीने वागायचे मी ठरवले आहे. लोक मला म्हणतात, 'तुझा मामा श्रीमंत नि तू असा गुराखी काय होतोस? भिका-याप्रमाणे काय राहतोस?' मला आता नीट राहू दे. आज कसा दिसतो मी. मामा? खरे सांगा. एखाद्या राजपुत्राप्रमाणे मी दिसतो की नाही?'

'तू राजपुत्र! आणि आता कोणी राजा आपली मुलगी तुला देईल. खरे ना? आणि तुला गादीवर बसवील. खरे ना? भिकारडा पोर! म्हणे मी राजपुत्र शोभतो. ऊठ. त्याचे कपडे दे. तुझे तू अंगावर घाल. आज गुरे घेऊन गेला नाहीस वाटते?

'मी पहिल्यापासूनच तुम्हांस सांगत होते की याला घरात घेऊ नका घरात घेऊ नका. याचे हे थेर पाहा. हा उद्या तुमच्या डोक्यावर मिरी वाटील. तुम्हांला घरातून घालवील. मी सांगते, याला आजच घरातून घालवा. झाला आहे आता मोठा. कोठेही मोलमजुरी करील नि पोट भरील.' मामी संतापाने म्हणाली.

 

पुढे जाण्यासाठी .......

गोप्या