गुरुवार, एप्रिल 22, 2021
   
Text Size

प्रकरण १: अहमद नगरचा किल्ला

अशातच झेकोस्लोव्हाकिया प्रकरणातील आणीबाणीची वेळ आली; प्राग, सुडेटन लँड, लंडन, पॅरिस, राष्ट्रवाद्यांची बैठक ज्या ठिकाणी सुरू होती ते जिनेव्हा वगैरे सर्व ठिकाणी फ्रेंचांच्या नि ब्रिटिशांच्या मुस्तद्देगिरीचे स्वरूप मला दिसले त्याने तर चकितच झालो.  त्यांच्या त्या तसल्या मुत्सद्देगिरीचा मला तिटकारा आला, किळस वाटली.  त्यांच्या त्या धोरणाला शांततेचे धोरण, हृदयपरिवर्तनाचे धोरण म्हणणे म्हणजे फारच सौम्य वर्णन केल्यासारखे होईल.  त्यांच्या त्या धोरणामागे होती हिटलरची भीती, एवढेच नव्हे, तर हिटलरविषयीची चोरटी प्रीतीही.

आणि आता नशिबाचा असा काही विलक्षण फेरा आला की, नाझी आणि फॅसिस्टवादांविरुध्द जगात युध्द चालू असता मी व माझ्यासारखे इतर तुरुंगात खितपत पडलेलो आहोत; आणि हिटलर-मुसोलिनीला जे अदबीने कुर्निसात करीत, चीनवरील जपानच्या आक्रमणाची जे तारीफ करीत, ते आज स्वातंत्र्याचा, लोकशाहीचा, फॅसिस्ट विरोधाचा झेंडा उंच चढवीत आहेत !

हिंदुस्थानातही तितकाच लक्षात येण्याजोगा बदल घडून आला आहे.  येथेही इतरत्र असतात त्याचप्रमाणे सरकारजमा लोक आहेत.  सरकारच्या असापासच ते घिरट्या घालीत असतात.  सरकारी कृपेची अपेक्षा असल्याकारणाने सरकारमान्य मतांचा प्रतिध्वनी काढण्यातच ते सार्थक मानीत असतात.  फार लांबची गोष्ट नाही ही.  अगदी थोड्या— अगदी कालपरवाच हे लोक हिटलर, मुसोलिनी यांची स्तुतिस्तोत्रे गात होते, त्यांना आदर्श मानीत होते; त्यांचा कित्ता गिरवा असे सांगत होते आणि रशियाला भाषणांतून, लेखांतून, प्रवचनांतून शिव्याशाप देत होते.  परंतु आता वारा बदलला तशी त्यांनी पाठ फिरविली.  हे सारे बडे बडे सरकारी अधिकारी आता फॅसिस्टवाद नि नाझीवाद यांविरुध्द बोलत आहेत.  आपण त्यांचे शत्रू असून लोकशाहीचे खरे भक्त आहोत असे म्हणत आहेत.  अर्थात लोकशाहीचा उच्चार ते जरा जपूनच करतात.  लोकशाही चांगली असली तरी ती इतक्यात नको !  घटना निराळ्याच घडल्या असत्या, घडामोडींना वेगळेच स्वरूप आले असते तर या लोकांनी काय केले असते असे मनात येते; परंतु काय केले असते असा तर्क लढविण्यांत तरी बुध्दी कशाला राबवा !  कोणीही येवो.  ज्याच्या हातात सत्ता त्याच्या स्वागताला हातात हार घेऊन ते उभे राहिले असते.

या युध्दापूर्वी कित्येक वर्षे आधी केव्हातरी हे युध्द होणार या विचाराने माझे मन भरून गेले होते.  त्या युध्दाचा मी विचार करीत असे; त्याविषयी बोलत असे, लिहीत असे; मनाने त्याच्यासाठी स्वत:ची तयारी करीत असे.  जो प्रचंड लढा उद्भवेल त्यात हिंदुस्थानने भाग घ्यावा, अगदी मनापासून परिणामकारक भाग घ्यावा असेच मला वाटत असे.  कारण उच्च तत्त्वांसाठी तो लढा असेल असे मला वाटे.  हिंदुस्थानात आणि जगात बरेच मोठे क्रांतिकारक फेरबदल त्या लढ्यामुळे घडतील याची मला खात्री होती.  हिंदुस्थानवर एकदम संकट येईल, कोणी प्रत्यक्ष स्वारी करील असे त्या वेळेस मला वाटत नसे.  तरीही पण हिंदुस्थानने त्या युध्दात भाग घ्यावा असे मात्र वाटे.  अर्थात भाग घेता यावा म्हणून हिंदुस्थान पूर्णपणे स्वतंत्र असला पाहिजे.  इतर राष्ट्रांच्या तो बरोबरीचा असला पाहिजे, याचीही मला मनोमन खात्री पटली होती.

हिंदी राष्ट्रीय सभेचीही अशीच दृष्टी होती.  राष्ट्रीय सभा ही हिंदुस्थानातील एकमेव अशी थोर संस्था आहे.  तिने फॅसिस्टवाद आणि नाझीवाद यांना सतत विरोध केला आहे; तसेच ती साम्राज्यविरोधी आहे.  लोकसत्ताक स्पेन, झेकोस्लोव्हाकिया आणि चीन यांची नेहमीच तिने बाजू घेतली आहे.

आणि आता मात्र तीच राष्ट्रीय सभा गेली दोन वर्षे बेकायदा ठरविण्यात आली आहे.  तिला बंडखोर ठरविण्यात आले आहे.  कोणतेही कार्य करायला तिला मोकळीक नाही.  राष्ट्रीय सभा आज कारागृहात आहे.  प्रांतिक लोकसभेचे तिचे लोकनियुक्त सभासद, अध्यक्ष, तिचे माझी मंत्री, महापौर, नगरपालिकांचे अध्यक्ष हे सारे आज तुरुंगात आहेत. 

आणि इकडे लोकशाहीसाठी— अटलांटिक सनदेसाठी— चार स्वातंत्र्यांसाठी युध्द— जुंपले आहे !

 

पुढे जाण्यासाठी .......