गुरुवार, मे 23, 2019
   
Text Size

त्यागातील वैभव

“मग करू वसंतपूजा? करू का हळदीकुंकू समारंभ?”

“कर. मी जरा बाजूला जाऊन बसेन. तेहेतीस कोटी देवांगना येणार. गलबला व्हायचाच. बायकांची तोंडे. बंद झाली तर एकदम बंद होतात. मग एक शब्द नाही बोलणार. तोंडे सुरू झाली तर मग आवरणे कठीण! खरे ना?”

“बायकाही शांत राहतात. मी सरस्वतीला बोलवीन. ती सुंदर गाणे म्हणेल. सा-या स्त्रिया स्तब्ध बसतील. उगीच स्त्रियांची निंदा नका करू. पुरुषांच्या सभांतून का गोंधळ नसतात? जाऊ दे. आताच भांडण नको. मग, ठरले हं!”

“ठरले.”

लक्ष्मीने तयारी चालविली. ती आधी माहेरी गेली. विष्णूला माळ घातल्यापासून ती पित्याकडे गेली नव्हती. पित्याला अपार आनंद झाला.

“किती दिवसांनी तू आलीस!” सागर म्हणाला.

“पतीचे प्रेम जिंकून घेईन, मग कोठे ती जाईन, असे मी मनात ठरविले होते. म्हणून आले नाही.” लक्ष्मी म्हणाली.

“तू व चंद्र दोघे मला फार आवडता. चंद्र वर दिसताच माझे हृदय उचंबळते. सहस्त्रावधी हातांनी त्याला जवळ घेऊन नाचवावे, खेळवावे असे वाटते; परंतु तो दूरच राहतो. माझे हात पोचत नाहीत. आणि तो लबाड आहे. आपले संपूर्ण तोंड मला कधी दाखवत नाही. कधी हळूच जरा डोकावतो व अदृश्य होतो. कधी थोडेसे तोंड दाखवितो, जरा हसतो व पळतो. कधी जरा डोळे मिचकावतो व जातो निघून. महिन्यातून फक्त एक दिवस संपूर्ण दर्शन मला देतो. चंद्राचे स्पर्शन नाही तर निदान असे दर्शन तरी होते; परंतु तुझे दर्शनही नाही. रात्रंदिवस मी तुम्हाला हाका मारीत असतो. तुम्हाला भेटण्यासाठी अधीर होत असतो. आज आलीस. पती हे तुझे सर्वस्व! ही गोष्ट जरी खरी असली तरी पित्याचीही आठवण ठेवावी, हो बाळ! आणि तू किती वाळलीस! लग्नाच्या आधी कशी होतीस?” असे म्हणून सागराने सहस्त्रावधी प्रेमळ हातांनी मुलीला पोटाशी धरले. डोळ्यांतून गळणा-या अश्रूंनी मुलीला स्नान घातले.

 

पुढे जाण्यासाठी .......

त्यागातील वैभव