गुरुवार, मे 23, 2019
   
Text Size

त्यागातील वैभव

“ते रात्रंदिवस काम करतात. जराही विसावा घेत नाहीत. मी त्यांना सांगेन की चार महिने तरी माझ्याकडे येऊन राहत जा. संपूर्ण विश्रांती घेत जाच आठ महिने कष्ट करा. चार महिने विसावा घ्या.”

“परंतु ते ऐकतील का?”

“त्यांना सांगेन की, माझी मुलगी तुमच्या पदरी पडली. मुलीच्या सौभाग्याची पित्याला चिंता असते. तुम्ही रात्रंदिवस अविश्रांत श्रम करून प्रकृती बिघडून घ्याल. मग माझ्या मुलीच्या दु:खाला सीमा राहणार नाही. संसारात पडले म्हणजे जरा जपून वागावे लागते. मग केवळ आपलाच हेका चालविणे बरे नव्हे, असे त्यांना सांगेन. ते ऐकतील. हजारो हातांनी प्रणाम करून त्यांना प्रार्थीन. बाळे मग चार महिने येऊन राहशील? पावसाळ्यात चार महिने राहत जा. त्या चार महिन्यांत माझीही प्रकृती जरा बिघडते. पावसाळा असल्यामुळे बाळ चंद्र वर दिसत नाही. त्याला काळे काळे ढग आच्छादून टाकतात ते मला बघवत नाही. मी खवळतो, गर्जतो, प्रक्षुब्ध होतो. सारे विश्व ग्रासून टाकावे, असे मला वाटते. स्वत:ची मर्यादा सोडावी, असाही वेडा विचार मनात येतो. बाळ, ते चार महिने मी कसे दवडीत असेन माझे मला माहीत. सारखा अस्वस्थ व अशांत असतो. सारखे सुस्कारे साडीत असतो. धावत धावत जातो व दगडधोंड्यांवर डोके आपटू बघतो; परंतु शेवटचा धीर होत नाही. पुन्हा कष्टाने मागे येतो. लक्ष्मी, तूही तुझ्या पतीचे मन वळव. त्याला सांग की, बाबा वृद्ध झाले आहेत. पावसाळ्यात चार महिने त्यांना बरे नसते. त्यांच्याकडेच जाऊन राहू. ते ऐकतील. आणि माझ्याकडे राहूनही त्यांना विश्वाचा कारभार चालवता येईल; परंतु त्यांनी विसावा घेणेच बरे! मला आधार होईल व त्यांना विसावा होईल.”

“बाबा, त्यांना मी सांगेन. आता जाते. फार रडत जाऊ नका. उगीच आमची काळजी करू नका. तुमच्या आशीर्वादाने माझे व चंद्ररायाचे नीट चालले आहे. येते हं मी.”

 

पुढे जाण्यासाठी .......

त्यागातील वैभव