मंगळवार, डिसेंबर 10, 2019
   
Text Size

प्रकरण ३ : शोध

भारताचा शोध

जुने ग्रंथ, जुने अवशेष, भूतकालीन संस्कृतीने विविध क्षेत्रांत निर्मिती करून मिळविलेले यश, ही सर्व विचारात घेऊनही हिंदुस्थानचे स्वरूप समजावून घ्यायला जरी मदत झाली तरी जे उत्तर मला पाहिजे होते ते मला मिळाले नाही, त्यामुळे माझे समाधान झाले नाही.  आणि या गोष्टी मला उत्तर देऊ शकतही नव्हत्या; कारणा त्या भूतकालासंबंधीच फक्त होत्या.  त्या भूतकालाचा व आजच्या वर्तमानकालाचा खरोखरी काही संबंध आहे का याचे उत्तर मला हवे होते.  हिंदुस्थानचा आजचा वर्तमानकाळ म्हणजे मध्ययुगीन सरंजामशाही, छाती दडपून टाकणारे दारिद्र्य व हालअपेष्टा आणि मध्यवर्गीयांचा थोडा फार उथळ अर्बाचीनपणा, या सर्वांचे एक विचित्र मिश्रण आहे.  माझ्यासारख्यांचा जो वर्ग आहे, जो एक प्रकार आहे त्याचा गुणगौरव करणारा मी नाही.  परंतु हिंदी स्वातंत्र्ययुध्दात याच वर्गातील लोकांकडे नेतृत्व जाणार असे दिसत होते.  ते अपरिहार्य आहे असे मला वाटे.  मध्यमवर्गाला स्वत:ला बांधून टाकल्याप्रमाणे, जखडून टाकल्याप्रमाणे वाटत होते; एका विवक्षित मर्यादेत त्यांना कोंडल्याप्रमाणे ठेवण्यात आले आहे अशी त्यांची समजूत होती.  या वर्गाला वाढण्याची, विकास करून घेण्याची इच्छा होती.  ब्रिटिश सत्तेच्या चौकटीत राहून त्याला तसे करता येईना.  म्हणून या सत्तेविरुध्द बंड करण्याची वृत्ती वाढली.  परंतु आम्हांला चिरडून टाकणार्‍या सामाजिक रचनेविरुध्द ही बंडखोर वृत्ती नव्हती.  फक्त ब्रिटिशांना हाकलून त्यांची जागा घ्यावी एवढेच त्यांच्या डोळ्यासमोर असे.  सामाजिक रचना आहे तशीच ते ठेवू इच्छित होते.  त्या रचनेतूनच ते जन्माला आले होते.  त्या विशिष्ट सामाजिक पध्दतीतच वाढले होते.  त्यामुळे तिची पाळेमुळे उखडून, फेकून देणे हे त्यांच्या शक्तीबाहेरचे, वृत्तीला न झेपण्यासारखे काम होते.

परंतु नवीन शक्ती उदयास आल्या.  त्यांनी आम्हांला खेड्यांतील बहुजनसमाजाकडे लोटले आणि एक नवीनच हिंदुस्थान-अजिबात निराळा हिंदुस्थान तरुणांच्या समोर उभा राहिला.  या बुध्दिमान तरुणांना या हिंदुस्थानची आठवणही नव्हती.  ते त्याला विसरून गेले होते किंवा आठवण असूनही या हिंदुस्थानकडे आजपर्यंत त्यांनी फारसे लक्ष दिले नव्हते.  या नवदर्शनाने नवतरुण अस्वस्थ झाले.  सर्वत्र अपार दारिद्र्य होते.  दु:ख-दैन्याला सीमा नव्हती.  तेथले प्रश्न गंभीर होते, अती महत्त्वाचे होते, आणि या बुध्दिमान तरुणांच्या मनात जी जीवनमूल्ये होती, जे काही सिध्दान्त होते, त्यांची एक उलथापालथच झाली.  यामुळेच हे तरुण विशेषकरून बेचैन झाले.  खरा हिंदुस्थान कोठे आहे, कसा आहे त्याचा आता शोध होऊ लागला.  त्यामुळे नवीन जाणीव येऊ लागली.  हिंदुस्थानचे खरे स्वरूप समजू लागले आणि मनात झगडा सुरू झाला.  आमच्यावर होणार्‍या प्रतिक्रिया सगळ्या एकच नव्हत्या.  पूर्वसंस्कारानुरूप ज्या वातावरणात जे जसे वाढले होते, ज्यांना जसे अनुभव आले होते, त्याप्रमाणे त्यांच्यावर त्या नवदर्शनाची प्रतिक्रिया झाली.  काहींचा खेड्यांतील जनतेशी आधीपासूनच परिचय होता, त्यांना तो काही नवीन अनुभव नव्हता.  त्यांना फारसे वेगळे काही वाटले नाही.  परंतु मला तरी ते नवदर्शन होते.  जलपर्यटन करून काही नवीन शोध लागावा तसे मला वाटले.  माझ्या लोकांतील काही दोष, काही चुका, काही दुर्बलता यामुळे जरी मला अपार दु:ख होत असे, तरी या बहुजनसमाजात मला असे काही एक आढळले की, ज्याचे वर्णन मी करू शकणार नाही.  वर्णनातील असे तेथे काहीतरी मला दिसले, आणि या जनतेकडे मी ओढला गेलो.  मध्यमवर्गीयांत हे काही तरी मला कधी दिसले नाही.

बहुजनसमाजाच्या कल्पनेची केवळ पूजा करणारा मी नाही.  नुसत्या तात्त्विक विचाराने बहुजनसमाज म्हणजे काहीएक वेगळा गट समजून चालण्याचे मी प्रयत्नाने टाळतो.  भारतीय जनतेचे इतके विविध प्रकार मला दिसत असले तरी त्याचा प्रकार कोणता हे माझ्या मनात न येता, ही एक चालतीबोलती जिवंत व्यक्ती आहे इतके माझे लक्ष जाते, व म्हणून भारतातल्या असंख्य जनतेकडे काल्पनिक, मोघम गटातल्या व्यक्ती म्हणून माझे लक्ष नाही.  जनतेतल्या व्यक्तीकडे भारतीय जनता सत्यस्वरूपात, जिवंत हाडामांसाची, बोलतीचालती अशी माझ्या डोळ्यांसमोर उभी असते.  तिच्यातील ती सारी विविधता मी बघतो आणि त्यांची अपार संख्या असली तरी त्यांच्याकडे अस्पष्ट थवे, संघ या दृष्टीने न बघता व्यक्ती म्हणून मी पाहात असतो.  त्यांना पाहून मी निराश झालो नाही.  कदाचित त्यांच्यापासून मी फार अपेक्षा केली नाही म्हणूनही असे झाले असेल.  परंतु अपेक्षेपेक्षाही अधिक मला त्यांच्याजवळ आढळले.  हे जे काही जनतेजवळ मला आढळले, एक प्रकारचे स्थैर्य, काही उपयोगाला आणण्याजोगे सामर्थ्य सापडले, या सर्वांचे कारण म्हणजे आतापर्यंत त्यांनी जिवंत ठेवलेली भारतीय सांस्कृतिक परंपरा हे होय, असे माझ्या एकदम लक्षात आले.  ही सांस्कृतिक परंपरा थोड्याफार अंशाने तरी त्यांच्यात होती.  गेली दोनशे वर्षे टोले खाता खाता या परंपरेतले बरेचसे छिलून गेले होते, पण उपयुक्त असा बराचसा भाग बाकी राहिला होता व त्याबरोबरच अगदी निरूपयोगी व वाईट भागही राहिला होता.

 

हिंदी स्वातंत्र्यासाठी गेली २५ वर्षे आम्ही धडपडत आहोत.  माझ्या आणि पुष्कळांच्या मनात या सर्व उद्योगांच्या पाठमागे इच्छा एकच आणि ती म्हणजे भारताला पुन्हा चैतन्यमय करावे, त्याच्या रोमरोमात नवजीवन संचारवावे.  आम्हांला वाटत होते की प्रत्यक्ष कृतीतून, आपणहून अंगिकारलेल्या यातनांतून आणि यज्ञातून, त्यागातून आणि बलिदानातून, संकटे आणि धोके यांना स्वेच्छेने तोंड देऊन, आपणास जे अन्याय्य व चुकीचे वाटते, पापमय आणि दुष्ट वाटते, त्याला शरण न जाता, त्याच्यासमोर मान न वाकवता प्रसंग आल्यास मरणाला तोंड देऊनच हे राष्ट्र पुन्हा सजीव होईल; दीर्घ निद्रा संपून ते खडबडून जागे होईल, स्वत:ची संपलेली विद्युच्छक्ती पुन्हा नव्याने भरपूर भरून घेईल. 

हिंदुस्थानातील ब्रिटिश सरकारशी आमचा अव्याहत झगडा चालू असताना आमचे डोळे सदैव आमच्या जनतेकडे होते.  जनतेचे पुनरुज्जीवन हा आमचा मूलभूत हेतू आहे.  हा हेतू कितपत साध्य होत आहे त्यावर राजकीय यशाची किंमत.  आमची सर्व खटपट, सगळा उद्योग ह्या एका हेतूने चालत होते, व म्हणून कधी कधी आमचे वागणे मुत्सद्दयास न शोभेसे होई.  परंतु केवळ राजकीय दृष्टीने आम्ही काम करीतच नव्हतो.  राजकारणाच्या संकुचित वर्तुळात फिरणारे आम्ही नव्हतो.  परकी आणि काही हिंदी टीकाकार आमच्या वर्तनाला हसत.  आमच्या मार्गातील, वागण्यातील धरसोड पाहून ते टीका करीत.  हा आमचा सारा मूर्खपणा असे त्यांना वाटे.  आम्ही मूर्ख होतो की नव्हतो हे भावी इतिहासकार ठरवतील.  आमचे ध्येय उच्च होते, आमची दृष्टी विशाल कालावर होती.  कदाचित आम्ही मूर्खपणा केलाही असेल.  संधिसाधू राजकारणाच्या दृष्टीने तसे दिसेलही.  परंतु हिंदी जनतेची सारी पातळी उंच नेणे या ध्येयापासून आम्ही कधी चळलो नाही.  मानसिक दृष्ट्या, आध्यात्मिक दृष्ट्या व अर्थात राजकीय दृष्ट्या ही सारी जनता उंच चढावी या हेतूपासून आम्ही कधी विचलित झालो नाही.  राष्ट्राची, जनतेची, खरी आंतरिक शक्ती उभी करावी, या एका गोष्टीपाठीमागे आम्ही लागलो होतो.  ही शक्ती एकदा उभी राहिली म्हणजे मग सार्‍या बाकीच्या गोष्टी सहजच येतील, अपरिहार्यपणे येतील अशी आम्हाला खात्री होती.  मगरूर परकी सत्तेपुढे पिढ्यानपिढ्या चाललेली लज्जास्पद दास्यवृत्ती व भीरू शरणागतीची वृत्ती आम्हाला पार पुसून टाकावयाची होती.

 

जगातील आजच्या लोकांत ही प्राणमयी शक्ती मला तिघांतच आढळते.  अमेरिकन, रशियन आणि चिनी जनतेत ही शक्ती आहे.  या तिघांना एकत्र गोवणे चमत्कारिक वाटेल नाही ?  अमेरिकन लोकांची पाळेमुळे जरी जुन्या जगात असली तरी ते नवीन आहेत.  जुन्या विधिनिषेधांचे थोतांड त्यांच्याजवळ नाही.  जुन्या वंशाचे जुन्याचे ओझे व मनोविकृतीचे विविध गंड त्यांच्या डोक्यावर बसलेले नाहीत.  त्यामुळे त्यांची अमर्याद उत्साहशक्ती आपण समजू शकतो.  कॅनेडियन, ऑस्ट्रेलियन, न्युझीलंडर या सर्वांचीही तीच स्थिती आहे.  जुन्या जगापासून त्यांची कधीच फारकत झालेली आहे आणि नवनवीन स्वरूपातील जीवन त्यांच्यासमोर उभे आहे.

रशियन लोक काही नवे नाहीत.  परंतु तेथे मरणामुळे जुन्याचा जसा संपूर्ण संबंध तुटतो त्याप्रमाणे क्रांतीमुळे जुन्याशी संबंध पार तुटला आहे.  त्यांचा असा काही दुसराच अवतार झाला आहे की त्याला इतिहासात तोड नाही.  ते नवयौवनाने नटले आहेत, त्यांची स्फूर्ती, त्यांच्यातील जिवंतपणा आश्चर्यकारक आहेत.  ते पुन्हा आज आपली जुनी मुळे शोधून काढू पहात आहेत,  परंतु प्रत्यक्ष व्यवहारात एक नवीन जनता, नवीनच मानववंश, एक नवीनच संस्कृती म्हणूनच त्यांची गणना होते.

एखादे राष्ट्र पुन्हा कसे सचेतन होऊ शकते, पुन्हा कसे तरुण होऊ शकते हे रशियाच्या उदाहरणावरून दिसून येत आहे.  परंतु त्यासाठी भरपूर किंमत देण्याची व बहुजन समाजातील दडपून ठेवलेले शक्तीचे व उत्साहाचे सारे झरे मोकळे करण्याची तयारी हवी.  चालू महायुध्दातील भयानक अत्याचारातून जे काही देश जिवंत राहतील त्या देशांना असे नवे तारुण्य मिळण्याचा संभव आहे.

परंतु वर सांगितलेल्या लोकांपेक्षा चिनी जनता अगदी वेगळी आहे.  चिनी जनता काही नवी नाही, किंवा क्रांतीच्या प्रक्षोभातून ते गेले नाहीत.  रशियासारखी सारी खालपासून वरपर्यंत त्यांची उलथापालथ झाली नाही.  सात वर्षांच्या क्रूर युध्दामुळे त्यांच्यात कितीतरी फरक झाला आहे आणि ते होणे अपरिहार्यच होते.  हा फरकही युध्दामुळे झाला का ?  या युध्दापेक्षाही दीर्घकाल चालू असलेल्या दुसर्‍या काही कारणांमुळे झाला, किंवा या दोन्ही कारणांमिळून झाला ते सांगता येत नाही.  परंतु चीनची जिवंत राहण्याची चिकाटी पाहून मन थक्क होते.  असे खंबीर राष्ट्र पार रसातळाला जाईल अशी कल्पनासुध्दा करवत नाही.

चीनमध्ये अशा प्रकारचा चिवट प्राण दिसला, तशाच प्रकारचा भारतीय जनतेतही आहे असे कधी कधी मला वाटते.  परंतु ते कधी कधी वाटते एवढेच, कायम खात्री नाही.  कारण मला या बाबतीत तिर्‍हाइतासारखा विचार करता येत नाही.  माझ्या मनात देशाबद्दल जी आशा आहे त्यामुळे कदाचित मला नीट विचार करून निष्कर्ष काढता येत नसेल.  परंतु भारतीय जनतेत सर्वत्र मिसळत असताना, हिंडताना या चैतन्याच्या शोधात मी असे.  माझ्या लोकांत हे चैतन्य असेल तर सारे ठीक होईल, भिण्याचे कारण नाही असे वाटे आणि जर ते नसेल तर आमच्या या घोषणा आणि आमचे हे राजकीय उद्योग केवळ मनाची फसवणूक आहे व तेवढ्यावर आम्ही विशेष काही करू शकणार नाही.  कसे तरी माझे राष्ट्र जगावे, आणि यासाठी एखादी राजकीय तडजोड करावी असे माझ्या मनात कधी आले नाही.  मला वाटे की हिंदी जनतेत शक्ती, उत्साह, कर्तव्य ह्यांचा प्रचंड संचय आहे, पण तो कोंडलेला आहे.  तो मोकळा करून हिंदी जनतेला नवचैतन्य, नवतारुण्य यावे अशी मला तळमळ होती.  या जगात अशा ठिकाणी भारत उभा आहे की, तेथे उभे राहून दुय्यम दर्जाचे काम त्याने करणे केवळ अशक्य आहे.  भारत पहिल्या दर्जाचे राष्ट्र तरी होईल किंवा अजिबात बाजूला पडेल.  या दोन्हींहून वेगळ्या, मधल्या स्थितीला माझे मनच घेत नाही, व अशी मधली स्थिती संभवनीय नाही.

   

तसेच मधूनमधून या परंपरेचे पुनरुज्जीवन होऊन डोळे दिपण्याइतकी ती चमकलेली दिसते.  इतकेच नव्हे, तर हा विजेचा झोत काही प्रसंगी खूप काळपर्यंत झगझगीत टिकून राहिलेला दिसतो.  जे जे नवे, ताजे असेल ते समजून घेण्याचा व ह्या नव्याचा जुन्याबरोबर (सगळ्या जुन्याबरोबर नसले तरी निदान जुन्यातले जे उपयोगी असेल, टिकाऊ वाटेल तेवढ्याबरोबर) मेळ घालण्याचा सारखा सतत प्रयत्न दिसतो.  पुष्कळ वेळा ते जुने बाह्य आकाराने प्रतीक म्हणून राहिलेले दिसते; परंतु आतील खरा गाभा संपूर्णपणे बदललेला असतो.  परंतु स्वत: प्राणमयी व सर्वत्र प्राणदायी अशी काही एक शक्ती सतत अस्तित्व व प्रगती टिकवून धरीत होती.  कोणती तरी एक प्रबळ अशी अंत:प्रेरणा अशा प्रकारे अस्पष्ट अशा कोणत्यातरी दिशेने या राष्ट्राला पुढे नेत होती.  जुने आणि नवे यांचा समन्वय करीत पुढे जाण्याची इच्छा मात्र सदैव दिसून येते.  या प्रेरणेमुळे, या इच्छेमुळे भारतीय जनता पुढे जात होती; बरेचसे जुने ठेवूनही नवीन आत्मसात करायला यामुळेच शक्य झाले.  या शतकानुशतकात एखादे स्वच्छ, स्पष्ट असे स्वप्न हृदयाशी धरून भारत जात आहे, असे दिसते का ?  ते स्वप्न अस्वस्थ व अशान्त झोपेतील कधीकधी बडबडही असेल.  परन्तु असे काही होते का ?  मला कळत नाही.  प्रत्येक राष्ट्राला वाटत असते की, विशिष्ट कार्यासाठी आपले अस्तित्त्व आहे, अमुक एक संदेश द्यायला आपण जगतो, जगत आहोत अशी श्रध्दा, असा एक विश्वास सर्वांना वाटत असतो.  आणि काही अंशी प्रत्येकाच्या बाबतीत ते खरेही असते.  मी हिंदी असल्यामुळे हिंदुस्थानजवळ असा काही उज्ज्वल संदेश आहे, ईश्वरदत्त कार्य आहे, या श्रध्देचा माझ्यावरही परिणाम झालेला आहे.  आणि मला असेही वाटते की, खंड न पडता भारतीय जनतेच्या हजारो पिढ्यांना विशिष्ट वळण देण्याची शक्ती जेथे आहे तेथे ती शक्ती कोणत्या तरी अक्षय व सामर्थ्यदायी विशालसंचयातून आली असली पाहिजे.  आणि त्या त्या युगात कमी होत जाणार्‍या स्फूर्तीला, चैतन्याला, प्राणमय तत्त्वाला पुन्हा तजेला देण्याची, पुन्हा शक्तिशाली करण्याची अद्‍भुत किमयाही त्या अक्षय संचयाजवळ असली पाहिजे.

असा एकदा सामर्थ्याचा अक्षय संचय होता का ?  आणि जर होता तर तो आज आटला आहे काय ?  का त्या विहिरीला गुप्त झरे असून त्यातून सदैव नवजीवन येत राहील, खूट भरून निघत जाईल ?  मग आजचे काय ?  आजही काही झरे नवे जीवन देत आहेत का ?  आपणास नवशक्ती देत आहेत का ?  आपण फार जुन्या मानववंशातले आहोत.  किंबहुना अनेक मानववंशांचे आपण मिश्रण आहोत.  इतिहासाच्या आरंभकालापर्यंत आपल्या वांशिक स्मृती जाऊन पोचतात.  आपल्या भारतीय जीवनाचा ऐन उमेदीचा काळ संपून आता काय तिसरा प्रहर किंवा त्याही पुढची संध्याकाळ झाली काय ?  म्हातारपणी थंड, निर्जीव, वांझ झालेले जीवन कसेतरी जगत असताना काही धडपड नको, नुसते निजून राहण्याची प्रबळ इच्छा असते, ती आपली गत झाली आहे का ?

जगातल्या कोणत्या देशातले लोक, कोणताही मानववंश जसाच्यातसा कायम राहात नाही.  त्याचे इतरांशी सारखे मिश्रण चालू असते, व हळूहळू मूळ रूप बदलत असते.  केव्हा केव्हा मूळ स्वरूपाचा सर्वस्वी लोप होऊन अगदी नव्या रूपाने उदय झाल्यासारखे दिसते किंवा केव्हा केव्हा त्या मूळ स्वरूपाचाच एक प्रकार झाल्यासारखे दिसते.  या रुपांतरामुळे नव्या जुन्याचा संबंध अजिबात तुटलेला आढळतो, किंवा कधी कधी नव्या-जुन्यामध्ये विचार व ध्येये यांच्या चैतन्यमय दुव्यांमुळे संबंध राहिलेला दिसतो.

दीर्घकाळ टिकलेली व चांगली नांदत असलेली संस्कृती हळूहळू किंवा एकदम नाश पावून तिची जागा एखाद्या नव्या जोमाच्या संस्कृतीने घेतल्याची उदाहरणे इतिहासात पुष्कळशी आढळतात.  अशी काहीएक चैतन्यशक्ती, सामर्थ्याचा काही एखादा गूढ उगम आहे की काय ?  की त्याच्यामुळे राष्ट्र किंवा संस्कृती जिवंत राहते व ती नसली तर म्हातार्‍याने तरुणाचे सोंग घेतल्यासारखे सारे निकामी होते ?

 

भारताचे सामर्थ्य व दुर्बलता

भारताच्या सामर्थ्याची तसेच भारताच्या अवनती व र्‍हासाची कारणे शोधण्याचा मार्ग लांबचा व गुंतागुंतीचा आहे.  परंतु त्या र्‍हासाची आजची कारणे अगदी स्पष्ट आहेत.  यांत्रिक ज्ञानाचे जे नवीन तंत्र युरोपात निर्माण होत होते त्यात हा देश मागे राहिला.  पुष्कळ गोष्टींत जे युरोपखंड कित्येक वर्षे मागासलेले होते ते एकदम या नवीन उद्योगधंद्यांतील शोधामुळे पुढे आले.  या उद्योगधंद्यांतील नवतंत्रापाठीमागे शास्त्रीय दृष्टी होती, विज्ञानवृत्ती होती; त्याचप्रमाणे अनेकविध गोष्टींत नवीन होणारा, साहसी जलपर्यटनांत, संशोधनार्थ काढलेल्या सफरींतून दिसून येणारा अपार उत्साह, दुर्दम्य जीवनशक्ती हीही होती.  या नवीन शोधांनी युरोपातील राष्ट्रांना नवीन लष्करी सामर्थ्यही प्राप्त झाले.  त्यामुळे पूर्वेकडे पसरायला आणि पूर्वेवर अधिराज्य स्थापायला त्यांना कठीण गेले नाही.  ही केवळ हिंदुस्थानचीच कहाणी नाही.  बहुतेक सर्व आशियात हेच घडून आले.

हे असे का घडले त्याच्या मुळाशी जाणे अधिकच कठीण आहे.  कारण प्राचीन काळी पहिल्या पहिल्या शतकात तरी भारतही बुध्दीच्या क्षेत्रात कमी जागरूक नव्हता.  कारण उद्योगधंद्यांतील कौशल्यातही मागे नव्हता.  परंतु हळूहळू सारे बिघडत चालले होते.  ही क्रिया एकदम झाली नाही.  शतकानुशतके ही अध:पाताची, र्‍हासाची क्रिया नकळत होत होती असे वाटते.  हळूहळू नवे उद्योग हाती घ्यावे, व्याप वाढवावा हे कमी होऊ लागले.  जीवनप्रेरणा, विजिगीषू वृत्ती कमी होत गेली.  प्रतिभा लोपली, निर्मात्री वृत्ती सुकली.  केवळ अनुकरण करणारी वृत्ती आली.  सृष्टीची, या विश्वाची कोडी उलगडण्यासाठी आत घुसू पाहणारी ती बंडखोर विजयी बुध्दी दिसेनाशी झाली, व तिच्याऐवजी शब्दब्रह्मात रमणारा, टिका-टिप्पणी लिहिणारा, लांब विवरणे आणि भाष्ये लिहिणारा भाष्यकार आणि टीकाकार समोर उभा राहिला.  भव्य शिल्प, दिव्य कला मागे पडली आणि बारीकसारीक कंटाळवाणे नक्षीकाम निर्माण होऊ लागले.  त्यात कल्पनेची किंवा आदर्शाची उदात्तता दिसून येत नसे.  भाषेतील जोर गेला.  किती विपुल आणि सामर्थ्यसंपन्न भाषा होती; आणि साधी असून पुन्हा किती प्रभावी वाटे !  परंतु ते सारे जाऊन तिच्या जागी अलंकारिक, कृत्रिम, समासप्रचुर अशी क्लिष्ट भाषा आली.  पूर्वी साहसीवृत्ती होती; जिवनस्त्रोत दुथडी वाहात होता.  त्यामुळे दूर दूर जाऊन नवीन नवीन वसाहती आपण वसविल्या.  त्या वसाहतींच्या केवढाल्या योजना, विशाल कल्पना ! भारतीय संस्कृती कितीतरी दूरदूरच्या देशांत आपण नव्याने रुजवली.  परंतु तो चैतन्यपूर ओसरला.  ती साहसी वृत्ती अस्तंगत झाली.  कूपमंडूकपणाने समुद्रपर्यटनही आता निषिध्द ठरविले.  आरंभीच्या काळी सर्वत्र दिसणारी ती जिवंत जिज्ञासा, तो संशोधक बुध्दिवाद, ज्यामुळे पुढे विज्ञानातही आपण भरपूर प्रगती केली असती, ती जाऊन त्यांची जागा अंधश्रध्देने घेतली.  भूतकालाची आंधळेपणाने पूजा करणे ऐवढेच शिल्लक राहिले.  भारतीय जीवनाचा प्रवाह मंदमंद होत भूतकालात अटकून पडलेला, शतकाशतकांच्या जमलेल्या गाळातून हळूहळू जेमतेम वाहताना दिसतो.  भूतकालाच्या अजस्त्र ओझ्याखाली भारतीय जीवन चिरडून गेलेले दिसते व सर्वत्र एक प्रकारची मूर्च्छा पसरलेली दिसते.  मनाच्या अशा निष्क्रिय व चैतन्यहीन स्थितीत आणि देहाला अपार थकवा आलेला असताना भारताचा झपाट्याने र्‍हास होत गेला, व जगातील बाकीचे देश पुढे जात असता भारत देश अंग ताठून निपचीत पडून राहिला यात आश्चर्य नाही. 

परंतु हे असे वर्णन म्हणजे संपूर्ण सत्य नव्हे.  केवळ गतिहीनच आपण शतकानुशतके असतो, केवळ साचलेल्या डबक्यातच बसून असतो तर भूतकाळाशी अजिबात संबंध सुटला असता.  परंपरा, अखंड प्रवाह राहता ना.  केवळ दगडासारखे अचल, निर्जीव आपण शेकडो वर्षे राहिली असतो तर पूर्वीच्या युगाचा संपूर्ण अंत झाला असता आणि त्याच्या भग्नावशेषांवर काही नवीन, जिवंत उगवलेले दिसले असते, नवीन उभारणी दिसली असती.  परंतु असा पूर्वीच्या युगाचा अंत होऊन खंड पडलेला दिसत नाही, उलट परंपरा अखंड चाललेली दिसते.

   

पुढे जाण्यासाठी .......