गुरुवार, जानेवारी 23, 2020
   
Text Size

प्रकरण ३ : शोध

राष्ट्रवाद आणि आंतरराष्ट्रवाद

भारतासंबंधीची माझी प्रतिक्रिया पुष्कळशी अशी भावनात्मक होती; अर्थात ही भावनात्मक प्रतिक्रिया ही अनेक गोष्टींनी बनली होती व मर्यादित होती.  ही प्रतिक्रिया राष्ट्रवादाचे स्वरूप घेते.  पुष्कळांच्या बाबतीत या राष्ट्रवादाला मर्यादा रहात नाही, घरबंद रहात नाही, परंतु माझे तसे नव्हते.  माझ्या आजच्या हिंदुस्थानच्या अवस्थेत राष्ट्रवाद अपरिहार्य आहे.  राष्ट्रवाद ही नैसर्गिक नि आरोग्यदायी वाढ आहे.  कोणत्याही परतंत्र राष्ट्राला स्वत:च्या स्वातंत्र्याची तहान प्रथम हवी; पहिली प्रभावी प्रेरणा हवी; स्वत:च्या मुक्तीची आणि हिंदुस्थानसारख्या स्वत:चे विशिष्ट व्यक्तिमत्व असल्याची जाणीव असलेल्या देशाला, वैभवशाली भूतकाळाचा वारसा मिळालेल्या देशाला राष्ट्रीय स्वातंत्र्याची तहान असणे अधिकच अवश्य आहे.

जगभर ज्या घडामोडी नुकत्याच झाल्या त्यांनी काय दाखविले ?  श्रमजीविवाद, आंतरराष्ट्रवाद, यांच्या नवीन प्रवाहामुळे राष्ट्रवादाची कल्पना आता मागे पडेल असे घोषवण्यात येत होते.  परंतु या म्हणण्यात फार थोडे सत्य होते ही गोष्ट दिसून आली.  जनतेचे हृदय हलविणारी राष्ट्रवाद ही अद्यापही अति-प्रबल अशी प्रेरणा आहे.  राष्ट्रवादाच्या विचाराभोवती एक भावना, एक परंपरा यांची गुंफण असते, आपल्या सर्वांचे समान जीवन आहे, आपले ध्येय समान आहे ही भावना असते.  मध्यमवर्गातील बुध्दिमान वर्ग राष्ट्रवादाकडून आंतरराष्ट्रवादाकडे हळूहळू जात होता; निदान तसे त्याला वाटत होते; परंतु त्याच वेळेस हेतुपुर:सर आंतरराष्ट्रवादावर उभारलेल्या श्रमजीवी कामगार चळवळी राष्ट्रवादाकडे वळत होत्या.  महायुध्द आले आणि जिकडे तिकडे एकजात सारे राष्ट्रवादाच्या जाळ्यात ढकलले गेले.  राष्ट्रवादाचा हा लक्षात भरण्याजोगा पुनरोदय, किंवा राष्ट्रवादाचा पुन्हा लागलेला शोध व राष्ट्रवादाच्या महत्त्वाच्या अर्थाचा नवा साक्षात्कार झाला आहे त्यामुळे नवीन प्रश्न उभे राहिले आहेत.  आज जुन्या प्रश्नांचे स्वरूप बदलून गेले आहे.  मूळ धरून बसलेल्या प्राचीन परंपरा एकदम फेकून देता येत नाहीत; त्यांची अजिबात जरूर नाही असे म्हणून चालणार नाही.  आणीबाणीच्या प्रसंगी या जुन्या परंपरा एकदम जागृत होतात, माणसांच्या मनावर त्याचा अपार परिणाम होता; आणि पुष्कळ वेळा परमोच्च त्यागासाठी जनता तयार व्हावी, पराकाष्ठेची तिने शर्थ करावी म्हणून जाणूनबुजून या परंपरेच्या भावनांचा उपयोग केलेला आपणास अनेक ठिकाणी दिसून येतो.  परंपरेचा स्वीकार करायलाच हवा.  अर्थात नवीन विचाराला, नवीन काळाला, नवीन परिस्थितीला अनुरूप अशा प्रकारचा बदल तिच्यात केला पाहिजे ही गोष्ट खरी.  नवीन परिस्थितीशी तिचा मेळ घातला पाहिजे.  त्या जुन्यातून पुढे नवीन परंपरा उभी केली पाहिजे.  राष्ट्रवाद या ध्येयाची मुळे खोल गेली आहेत, तो प्रबल आहे.  राष्ट्रवाद म्हणजे जुन्या जमान्यातील चीज, तिला यापुढे काही अर्थ उरला नाही, असे मुळीच नाही.  परंतु अपरिहार्य अशा आजच्या परिस्थितीतून नवीन ध्येये आज जन्माला आली आहेत.  आंतरराष्ट्रवाद, श्रमजीविवाद उत्पन्न झाले आहेत.  या विविध ध्येयांचे एकजिनसी असे संमिश्रण, एक विशाल समन्वय आपणास करणे प्राप्त आहे.  जगातील विरोधवैरे कमी व्हावीत असे वाटत असेल, जागतिक समतोलपणा हवा असे आपणास वाटत असेल तर राष्ट्रवाद नि हे नवे वाद यांचा कोणत्यातरी स्वरूपात मेळ घातल्यावाचून गत्यंतर नाही.  राष्ट्रवादाची हाक हृदयाला सदैव हलवणार हे आपण कबूल केले पाहिजे.  मानवी मनाला त्याची सनातन ओढ आहे हे लक्षात ठेवून या भावनेला आपण वाव दिला पाहिजे.  परंतु मर्यादित क्षेत्रातच या भावनेला अधिसत्ता देणे योग्य ठरेल.

नवीन ध्येय, आंतराष्ट्रीय चळवळी यांचा ज्या देशांवर अपार परिणाम झालेला आहे, त्यांच्यावरसुध्दा राष्ट्रवादाची जर इतकी पकड अद्याप आहे, तर भारतीयांच्या मनावर ती त्याहून कितीतरी अधिक असणार.  कधी कधी असे सांगण्यात येत असते की, हा तुमचा राष्ट्रवाद तुमच्या परागतीचे, मागासलेपणाचे द्योतक आहे; इतकेच नाही, तर पुढे आणखी असेही म्हणतात की, तुमची स्वातंत्र्याची मागणी ही सुध्दा तुमच्या मनाचा कोतेपणा दाखविते.  ब्रिटिश साम्राज्यात किंवा ब्रिटिश राष्ट्रसंघात हिंदुस्थानचे दुय्यम तिय्यम दर्जाचे भागीदार होऊन राहण्याने जगात आंतरराष्ट्रवाद विजयी होणार असे या टीकाकारांना बहुदा वाटत असावे.  ज्याला आज आंतरराष्ट्रवाद म्हणून गोंडस नाव देऊन आमच्यासमोर मांडण्यात येत आहे तो आंतरराष्ट्रवाद म्हणजे संकुचित ब्रिटिश राष्ट्रवादाचे वाढवलेले स्वरूप होय.  ब्रिटिश हिंदी इतिहासाचा अपरिहार्य परिणाम हा की अशा ब्रिटिश राष्ट्रसंघात आम्ही सामील होणे ही गोष्ट सुतराम अशक्य आहे; परंतु क्षणभर आम्ही त्या गोष्टी विसरून, बाजूला ठेवून जरी बघितले तरीही या ब्रिटिशप्रणीत आंतरराष्ट्रवादात आम्ही शिरावे असे त्यात काहीही नाही.  आणि असे असूनही राष्ट्रवादाची प्रखर ज्वाला भारतात धगधगत असूनही कितीतरी अन्य राष्ट्रांपेक्षा खर्‍या अर्थाने आंतरराष्ट्रवाद नि आंतरराष्ट्रीय सहकार्य यांच्यासाठी भारत पुढे आलेला आहे; त्याने त्यांचा स्वीकार केला आहे; एवढेच नव्हे, तर जागतिक संघटनेसाठी स्वतंत्र राष्ट्र म्हणून असणार्‍या हक्कांना मर्यादा घालायलाही, थोडे खालचे स्थान घ्यायलाही भारत तयार आहे.

 

शिलालेख, मंदिरे, स्तंभ वगैरे प्राचीन स्मृतिचिन्हे व प्राचीन शिल्पकला, चित्रकला यांचे अजिंठा, वेरुळ, घारापुरी लेणी यांसारखे नमुने मी पाहिले.  पुढील काळातील दिल्ली, आग्रा येथील रमणीय असे शिल्पकलांचे नमुने पाहिले.  तेथील प्रसिध्द दगड भारताच्या इतिहासातील स्वत:ची कथा सांगत होता.

माझ्या अलाहाबाद शहरात, तसेच हरद्वार येथे मी मोठमोठ्या पर्वण्यांच्या वेळेस, कुंभमेळ्यासारख्या प्रसंगी जात असे तेव्हा हजारो वर्षापासून गंगेत स्नान करण्यासाठी पूर्वज येत त्याप्रमाणे येणारे लाखो लोक.  सर्व हिंदुस्थानातून ठिकठिकाणचे लोक आलेले दिसत.  तेराशे वर्षांपूर्वी चिनी व इतर प्रवाशांनी गंगास्नानोत्सवांची ही वर्णने लिहून ठेवलेली मला आठवत.  त्या वेळेसही हे कुंभमेळे फार पुरातन झालेले होते.  केव्हापासून, कोणत्या अनादिकालापासून त्यांचा आरंभ झाला असेल देव जाणे !  असंख्य पिढ्यान् पिढ्या ह्या प्रसिध्द नदीकडे आमच्या मनाची ओढ कशामुळे ? असा प्रश्न मला सारखा पडे.

माझे हे प्रवास, मी घेतलेली ही दर्शने, आणि त्यांच्यापाठीमागे असलेली वाचनाची माझी पार्श्वभूमी, यामुळे भारताच्या भूतकाळाकडे पाहण्याची मला विशिष्ट दृष्टी लाभली.  नुसत्या बुध्दीने सारे समजून घेणे म्हणजे काही अंशी नीरस, कोरडे त्याच्या जोडीला आता भावनात्मक रसग्रही दृष्टीही आली.  त्यामुळे भारतासंबंधीच्या माझ्या मनोमय मूर्तीत हळूहळू एक प्रकारचा जिवंतपणा, यथार्थपणा येऊ लागला आणि माझ्या पूर्वजांची ही प्राचीन भूमी पुन: जिवंत माणसांनी गजबजलेली मला दिसू लागली.  त्यांचे हास्य, त्यांचे अश्रू, त्यांचे प्रेम, त्यांचे क्लेष सारे मला प्रत्यक्ष दिसू लागले; ऐकू येऊ लागले.  आणि या असंख्य जनतेत मला अशा व्यक्ती दिसल्या की, ज्यांना हे जीवन म्हणजे काय, त्याचा अर्थ काय हे समजले होते;  ज्यांनी आपल्या परिणत प्रज्ञेतून अशी काही एक समाजव्यवस्था निर्माण केली की त्यामुळे, संस्कृतीचे एकजिनसी स्थिररूप भारतात हजारो वर्षे टिकले.  भूतकालातील हजारो स्पष्ट चित्रे माझ्या मनोमंदिरात उभी राहू लागली.  त्यांच्याशी संबध्द अशा एखाद्या ठिकाणी जाताच ती सारी चित्रे पटकन माझ्या डोळ्यांसमोर येत.  काशीजवळ सारनाथ येथे जाताच भगवान बुध्द प्रत्यक्ष समोर आहेत, ते आपले पहिले प्रवचन देत आहेत असे वाटे व भगवान बुध्दांच्या त्या प्रवचनाचा प्रत्यक्ष प्रतिध्वनी अडीच हजार वर्षांच्या अंतरावरून ऐकू येतो आहे असे वाटे.  सम्राट असूनही माणुसकीने कोणत्याही नृपसम्राटापेक्षा थोर अशा त्या अशोकाचा इतिहास, त्याचे स्तंभ, त्यांवरील शिलालेख त्यांच्या उदात्त भाषेत मला सांगत.  आणि फत्तेपूर शिक्रीला जाताच साम्राज्याची क्षणभर विस्मृती पडून सर्व धर्मांच्या पंडितांशी चर्चा करणारा, मानवाच्या त्या सनातन, शाश्वत प्रश्नाला उत्तर मिळवू पहाणारा, सदैव नवीन शिकण्याची जिज्ञासा असणारा अकबर डोळ्यांसमोर येई.

अशा रीतीने भारताच्या इतिहासाचा विविध विपुल असा भव्य चित्रपट हळूहळू माझ्या दृष्टीसमोर उलगडला गेला.  ते जयपराजय, ते अभ्युदय, ते अध:पतन, सारे डोळ्यांसमोरून चालले.  पाच हजार वर्षांच्या इतिहासात किती स्वार्‍या, किती उत्पात झाले.  परंतु सांस्कृतिक परंपरा सदैव टिकून राहिली याचे मला राहून राहून विशेष वाटे.  ही सांस्कृतिक परंपरा सर्व जनतेला व्यापून पुन्हा उभी आहे.  जनतेच्या जीवनावर ती अपार परिणाम करीत आली आहे.  खरोखरच ही अपूर्व वस्तू आहे.  फक्त चीनमधेच अशी अखंड परंपरा, असे सांस्कृतिक जीवन आपणास दिसून येते आणि या भव्य भूतकाळातून पुढे पुढे आजचा अभागी हिंदुस्थान डोळ्यांसमोर येऊ लागला.  ते प्राचीन वैभव, ती अखंड परंपरा.  परंतु आज तो परतंत्र आहे, ब्रिटनच्या अंकित आहे, ब्रिटनचे शेपूट बनला आहे.  तिकडे जगात महायुध्द पेटले आहे, मानवजातीला सळो की पळो करीत आहेत, माणसाला पशू बनवीत आहे.  परंतु पाच हजार वर्षे डोळ्यांसमोर असल्यामुळे मला एक नवीन दृष्टी लाभली होती.  आणि वर्तमानकाळाचे आजचे ओझे जरा हलके वाटले.  भारताच्या प्रदीर्घ इतिहासात ब्रिटिश सत्तेची ही १८० वर्षे म्हणजे थोड्या क्षणांचे किरकोळ दु:ख.  भारताला हरपलेले स्वत्व पुन: सापडेल.

या ब्रिटिश प्रकरणातील शेवटचेच पान आता लिहिले जाते आहे.  हे जगही आजच्या प्रलयातून तरेल आणि नवीन पायांवर नवरचना उभी करील.

 

माझ्या रक्तात हिंदुस्थान होता.  भारतात असे कितीतरी होते की ज्याने माझ्या अंगावर आपोआप रोमांच उभे राहात.  असे असूनही या भारताकडे एखाद्या परकीय टीकाकाराप्रमाणे मी बघत असे, आजच्या स्थितीबद्दल मला तिटकारा वाटे; भूतकाळातील पुष्कळ उर्वरित गोष्टींबद्दल मला घृणा वाटे.  भारताकडे मी पाहू लागलो तो थोडा पाश्चिमात्य दृष्टीने व म्हणून जसा एखादा पाश्चिमात्य मित्र भारताकडे पाहील तशी माझी दृष्टी त्या वेळी होती.  भारताचा सर्वसाधारण देखावा, रूप बदलून टाकावे, त्याला अर्वाचीन वेष चढवावा म्हणून मी अधरी झालो होतो.  तथापि माझ्या मनात संशय उभे राहात.  भारताचे स्वरूप मला समजले तरी आहे का ?  भारताच्या भूतकालीन वारशातील बराचसा भाग त्याज्य म्हणून फेकून द्यायला मी तयार झालो आहे.  परंतु या देशाचा आत्मा मला सापडला आहे का ?  जुन्यातले पुष्कळसे टाकून देण्याजोगे होते खरे; पण हिंदुस्थानजवळ चैतन्यमय, शाश्वत फार महत्त्वाचे असे काहीच जर नसते तर हिंदुस्थान म्हणून जे काही वैशिष्ट्य खात्रीने होते व हिंदुस्थानने हजारो वर्षे जे सुसंस्कृत जीवन अखंड चालवले ते शक्य तरी होते का ?  असा हा फार महत्त्वाचा भाग कोणता ?

हिंदुस्थानच्या वायव्य कोपर्‍यात सिंधू नदीच्या खोर्‍यात मोहोंजोदारो येथे उंचवट्यावर मी उभा होतो.  त्या प्राचीन शहरातील घरे, रस्ते माझ्या सभोवार होते.  पाच हजार वर्षांपूर्वीची ती संस्कृती होती म्हणतात.  आणि त्या काळीही संस्कृती विकास पावलेली अशी होती.  प्राध्यापक चाइल्ड लिहितात, ''विशिष्ट परिस्थितीशी मानवी जीवनाचा परिपूर्ण मेळ कसा घालावा त्याचे सिंधू नदीच्या खोर्‍यातील ही संस्कृती म्हणजे प्रतीक आहे.  शेकडो वर्षांच्या धीमेपणाच्या अविरत प्रयत्नांनीच ही गोष्ट साधणे शक्य आहे.  आणि ही संस्कृती टिकून आहे. तिचे विशिष्ट भारतीय स्वरूप स्वच्छ दिसून येते.  अर्वाचीन भारतीय संस्कृतीचा पाया ही सिंधू नदीच्या तीरावरील संस्कृती आहे.''  आश्चर्य वाटते की एखादी संस्कृती एक उच्च विचार, आचार, व्यवहारपध्दती अव्याहतपणे पाचसहा हजार वर्षे चालत आली, आणि तीही निर्जीव, स्थिर नव्हे तर सारखी बदलत वाढत असलेली—कारण हिंदुस्थानातही सारखा बदल, सारखा उत्कर्ष चालू होता.  इराण, इजिप्त, ग्रीस, चीन, अरबस्तान, मध्य आशिया, भूमध्यसमुद्राजवळचे प्रदेश या सर्वांशी हिंदुस्थानचा घनिष्ठ संबंध सतत येत होता.  हिंदुस्थानचा त्यांच्यावर नि त्यांचा हिंदुस्थानवर जरी परिणाम होत होता तरी भारतीय संस्कृतीचा पाया अभंग होता.  तो खचला नाही, वाहून गेला नाही.  या सामर्थ्याचे रहस्य कशात होते ?  हे सामर्थ्य कोठून आले ?

मी भारताचा इतिहास वाचला व विपुल अशा प्राचीन साहित्यातील काही भाग वाचला आणि हे सर्व वाङ्मय ज्यांनी निर्माण केले, हा सर्व इतिहास ज्यांनी घडवला त्यांच्या विचारांचा जोरकसपणा, भाषेची स्पष्टोक्ती व बुध्दीचे वैभव यांचा माझ्यावर फार परिणाम झाला.  प्राचीन काळी चीनमधून, पश्चिम व मध्य आशियातून मोठमोठे प्रवासी येऊन त्यांनी हिंदुस्थानात ठिकठिकाणी फिरून आपली प्रवासवृत्ते लिहून ठेवली आहेत.  त्यांच्या वाचनातच मनाने मी सारा देश पाहिला.  तसेच इकडे आशियाच्या पूर्व बाजूला, अंगकोर, बोरोबडर आणि अशा कितीतरी ठिकाणी भारताने प्राचीन काळी काय काय मिळविले, काय काय निर्मिले, त्याचाही विचार माझ्या मनात आला.  आमच्या वाङ्मयावर नि विचारांवर ज्याचा अपाप परिणाम झालेला आहे, प्राचीन कथा, दंतकथा यांच्याशी ज्याचा चिरसंबंध आला आहे असा हिमालयही मी भटकून आलो.  पर्वतांबद्दल आधीच मला फार प्रेम आणि काश्मिरशी पुन्हा माझे नाते, यामुळे हिमालयाचे मला फार आकर्षण वाटे.  मला आजही तेथे उत्साह, शक्ती, सौंदर्य दिसत होतीच.  परंतु आजच्या जीवनाबरोबरच प्राचीन युगातील स्मृतिरूप सौंदर्याचा साक्षात्कार तेथे मला होत होता.  आणि या पर्वतातून वाहणार्‍या या विशाल नद्यांमुळे माझे लक्ष तिकडे जाऊन आमच्या इतिहासातील कितीतरी विविध पर्वे माझ्या डोळ्यांसमोर आली.  सिंधू नदी-जिच्यामुळे या देशाला आजचे हिंदूस्थान हे नाव मिळाले आहे, जिला ओलांडून हजारो जातिजमाती, मालाची ने-आण करणारे लमाण, सैन्ये, हजारो वर्षे येत होते, पूर्वेकडची ती ब्रह्मपुत्रा-इतिहासाच्या मुख्य प्रवाहापासून जरा बाजूला असलेली; ईशान्येकडील पर्वतांना फोडून खोल दर्‍यांतून वेगाने मार्ग काढीत खाली येणारी आणि नंतर पर्वत आणि वृक्षाच्छादित मैदाने यांच्यामधून शांतपणे सर्वत्र पसरणारी ती यमुना, तिच्याभोवती कितीतरी कथा, रासक्रीडा, खोड्या, खेळ यांच्या अनेक गोष्टींचा गोफ विणला आहे.  आणि सर्वांपेक्षा हिंदुस्थानची खरी नदी गंगा !  भारताच्या हृदयाला तिने कायमचे बध्द करून ठेवले आहे व भारताच्या हृदयावर तिची सत्ता चालत आली आहे.  इतिहासाच्या उष:कालापासून असंख्य, लक्षावधी लोकांना गंगातीराचा ध्यास लागला आहे.  गंगेची कथा म्हणजेच भारताचा इतिहास.  उगमापासून सागरसंगमापर्यंत गंगेची कथा ऐकणे, प्राचीन काळापासून आतापर्यंतची कथा ऐकणे, म्हणजे भारतीय संस्कृतीच्या विकासाचा इतिहास ऐकणे आहे.  नाना राज्ये, साम्राज्ये, त्यांचे उदय नि अस्त, मोठमोठी पुरे, पट्टणे, वैभवशाली नगरे, भारतीय ॠषींना व्यग्र करणारा आत्म्याचा शोध; मानवाची अनेक साहसे, जीवनाची विपुलता व सफलता, तसेच त्याग नि वैराग्य, चढउतार, भरती-ओहोटी, विकास-र्‍हास, जीवनमरण या सर्वांचा इतिहास गंगेच्या इतिहासाशी एकरूप झालेला आहे.

   

भारताच्या भूतकाळाचे विहंगम दृश्य

विचार करीत करीत काम करता करता वर्षानुवर्षे खरा भारत म्हणजे काय ते समजून घेण्याचा व माझ्यावर भारताचा काय परिणाम झाला त्याची छाननी करण्याचा माझ्या मनावर छंद जडला होता.  मी माझे बाळपण आठवले.  त्या वेळेस मला काय वाटे, वाढत्या समजुतीबरोबर भारतासंबंधीचे कोणते अस्पष्ट विचार स्पष्ट आकार घेत होते, नवीन अनुभवांना, त्या आकारांना कसे वळण मिळत गेले ते सारे मी आठवू लागलो.  प्राचीन इतिहास-पुराणांतल्या कथा व अर्वाचीन वस्तुस्थिती यांचे विचित्र मिश्रण होत होत सारखी बदलत चाललेली ती मूर्ती केव्हा केव्हा दूर मागे सरकली असे वाटे,  पण ती दिसेनाशी कधीच झाली नाही.  या मूर्तीचा मला अभिमान वाटे, तशी लाजही वाटे.  कारण माझ्या अवतीभोवती धर्माच्या नावाघर चाललेले खुळे आचार व निरूपयोगी झालेल्या धर्मसमजुती दिसत.  त्यांची व विशेषत: आपल्या देशाच्या गुलामगिरीची व कंगाल स्थितीची शरम वाटे.

मी वाढत चाललो व भारताला स्वातंत्र्य मिळविण्याच्या आशेने चाललेल्या चळवळीत पडलो असताना भारताच्या विचाराचा मनाने ध्यास घेतला.  ज्या भारताने मला पछाडले होते, जो भारत मला सारखी हाक मारीत होता, त्या भारताचे स्वरूप काय ?  आमच्या हृदयातील काही खोल, अस्पष्ट अशा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणून कर्माकडे मला ओढणारा हा हिंदुस्थान, हा भारत म्हणजे एकंदरीत काय ?

मला वाटते आरंभी तरी वैयक्तिक नि राष्ट्रीय स्वाभिमानामुळे दुसर्‍याची सत्ता झुगारून देऊन स्वेच्छेप्रमाणे स्वतंत्र जीवन जगण्याची प्रत्येकाला इच्छा असते.  त्या इच्छेनेच मी प्रेरित झालो होतो.  मानवी स्मृतीच्या आरंभाअगोदरच्या अंधुक कालापासून चाललेला अखंड भरगच्च इतिहास असलेला आपला हा देश, आणि त्याचे हातपाय सहा हजार मैलांवरच्या एका लहानशा बेटावरील राजसत्तेने बांधून टाकावे व परक्या सत्तेने या देशावर आपली मन मानेल तशी सत्ता चालवावी ही गोष्ट मला राक्षसी वाटे.  आणि त्या सक्तीच्या प्रबंधाने जे अपार दारिद्र्य आले व जो अपार अध:पात झाला त्यामुळे तर ही गोष्ट अधिकच भयंकर नि सैतानी वाटली.  मला काय किंवा इतरांना काय स्वातंत्र्याच्या लढ्यात पडायला हे कारण पुरेसे होते.

परंतु माझ्या मनात उभ्या राहणार्‍या प्रश्नांचे एवढ्याने समाधान होत नव्हते.  हा हिंदुस्थान देश म्हणजे काय ?  भारतवर्ष म्हणजे काय ?  हे प्रत्यक्ष भौतिक स्वरूप तूर्त सोडून दिले,  भौगोलिक स्वरूप बाजूला ठेवले, तर त्याशिवाय भारत म्हणजे काय ?  भूतकाळात भारत म्हणताच कोणत्या गोष्टी डोळ्यांसमोर येत असत ?  त्या काळात कशामुळे भारताला सामर्थ्य लाभले होते ?  ते सामर्थ्य त्याने कसे गमावले ?  ते सामर्थ्य आज संपूर्णपणे लुप्त झाले आहे का ?  फार विशाल संख्या भरेल इतके मनुष्यप्राणी या भारतात वस्ती करून जगत आहेत यापलीकडे या भारतात आजकाल काही जिवंतपणा, काही तत्त्व आहे का ?  आजच्या जगात भारताचा उपयोग काय व कसा आहे ?

आजकाल जगापासून अलग राहता येणार नाही, आणि ते इष्टही नाही, हा विचार माझ्या मनात जसजसा पक्का होत गेला तसतसे या प्रश्नाचे व्यापक आंतरराष्ट्रीय स्वरूप माझ्यासमोर अधिक अधिक उभे राहात गेले.  हिंदुस्थान नि जगातील इतर देश यांच्यामध्ये राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक सहकार्य मनमोकळेपणाने, एकविचाराने, होत आहे असे भविष्यासंबंधीचे चित्र माझ्या मनात येत होते.  परंतु भविष्य येण्याआधी आज हा वर्तमान आहे.  आणि या वर्तमानकाळापलीकडे, त्याच्या पाठीमागे तो प्राचीन गुंतागुंतीचा दीर्घ इतिहास आहे.  त्या भूतकाळातूनच आजचा वर्तमानकाळ जन्माला आला आहे.  म्हणून सारे समजून घेण्यासाठी मी भूतकाळाकडे वळलो.

   

पुढे जाण्यासाठी .......