मंगळवार, डिसेंबर 10, 2019
   
Text Size

प्रकरण ३ : शोध

राष्ट्र कितीही सुसंघटित, एकजिनसी असले तरी राष्ट्रात त्या विविध समूहात लहानमोठे भेद नेहमी लक्षात येण्यासारखे असतात.  सीमाप्रांतातील भिन्न राष्ट्रांचे परंतु एकमेकांशेजारचे दोन लोकसमूह पाहिले तर पुष्कळ वेळा त्यांच्यामधे भेद विरल होत होत हे लोकसमूह एकमेकांत मिसळलेले आढळतात व आधुनिक प्रगतीमुळे सगळीकडे एक प्रकारचा सारखेपणा येतो.  पण एका राष्ट्रातल्या सर्व लोकसमूहांची दुसर्‍या राष्ट्रातील लोकसमूहाबरोबर तुलना करून पाहिली तर राष्ट्राला एकसूत्रीपणा आणणारा मूलग्राही असा काही एक विशेष तेव्हाच उमटून दिसतो.  प्राचीन काळात त्याचप्रमाणे मध्ययुगातही आजकाल राष्ट्राची जी व्याख्या आहे, जी कल्पना आहे, ती नव्हती; त्या काळात सरंजामशाहीची तसेच धार्मिक, वांशिक आणि सांस्कृतिक बंधने यांना अधिक महत्व होते.  असे असूनही मला वाटते की, कोणत्याही काळी भारतीय मनुष्य भारतातील कोणत्याही प्रांतात गेला असता तरी त्याला घरच्यासारखेच वाटले असते.  आपण स्वदेशातच आहोत असे वाटले असते आणि दुसर्‍या कोणत्याही देशात आपण परदेशात आहोत असे वाटल्यावाचून राहिले नसते.  ज्या देशांनी भारतीय धर्म किंवा संस्कृती यांचा अंगीकार केला असेल त्या देशात अर्थात त्याला कमी परकेपणा वाटला असता.  जे हिंदुस्थानच्या बाहेरच्या धर्मांचे अनुयायी होते आणि हिंदुस्थानात येऊन जे घरेदारे करून राहिले ते काही थोड्या पिढ्या गेल्यावर भारतीय होऊन गेले.  ख्रिश्चन, ज्यू, पारशी, मुसलमान सर्वांच्या बाबतीत हीच गोष्ट दिसून येते.  हिंदुस्थानातील काही लोकांनी जरी परधर्म स्वीकारले तरी तेवढ्यामुळे ते अ-भारतीय झाले असे कधी वाटले नाही.  धर्मात बदल झाल्यामुळे त्यांच्या राष्ट्रीयतेत बदल होत नसे.  या विविध धर्मांचे हिंदी लोक त्या त्या धर्मांच्या परकीय राष्ट्रात गेले तर धर्म एक असूनही त्यांना परकीय, हिंदी राष्ट्राचेच मानण्यात येई.

आज राष्ट्रवादाची कल्पना अधिकच विकसित झालेली आहे.  परदेशात गेलेले हिंदी लोक आपसात कितीही भेद असले तरी एकच राष्ट्रीय संघ करून विविध कार्यांकरता त्या एका संघाला धरून राहतात.  हिंदुस्थानातील ख्रिश्चन मनुष्य कोठेही गेला तरी हिंदी म्हणूनच मानला जातो.  हिंदी मुसलमान तुर्कस्थान, अरबस्थान, इराण यांत कोठेही जावो, इतर कोणत्याही मुस्लिम धर्म असलेल्या देशात जावो, त्याच्याकडे हिंदी मनुष्य या दृष्टीने पाहण्यात येते.

आपल्या या मातृभूमीची प्रत्येकाच्या मनात निरनिराळी चित्रे असतील.  कोणतीही दोन माणसे अगदी समान विचार करतील असे कधी होणार नाही.  मी जेव्हा हिंदुस्थानचा विचार करतो, तेव्हा अनेक गोष्टी माझ्या मनासमोर असतात.  मोठमोठी शेती, विशाल मैदाने, मधून मधून ठिपक्याप्रमाणे वसलेली लाखो खेडी, मी पाहिलेली ती शेकडो पुरेपट्टणे; उन्हाने करपून रखरखीत झालेल्या धरणीवर मुसळधार जीवन ओतून, पाहता पाहता जिकडे तिकडे तळपू लागलेली हिरवी शोभा, खळखळ वाहते पाणी व विशाल नद्यांचा चमत्कार दाखविणार्‍या वर्षाॠतूची जादू, उत्तरेची खैबर खिंड आणि तिच्या भोवतालचा वैराण प्रदेश, दक्षिणेची ती कन्याकुमारी; आणि भारतीय जनता व्यक्तिरूपाने व समूहरूपाने; आणि सर्वांत उत्तुंग तो नगाधिराज हिमालय; त्याचा तो बर्फमय शुभ्र किरीट, ती हिमाच्छादित शिखरे; वसंत ॠतूत फुलांनी डवरलेली मधूनमधून बुडबुडत, सळसळा वाहणारे निर्झर असलेली काश्मिरातली एखादी नयनमनोहर दरी, हे सारे माझ्या डोळ्यांसमोर येते.  आपण आपल्या आवडीप्रमाणे चित्रे रंगवितो व मनोमंदिरात ती जणून ठेवीत असतो.  मी माझ्या चित्रासाठी ही पर्वतांची पहाडी पार्श्वभूमी निवडली आहे.  हिंदुस्थानातील उष्ण प्रदेशाची नेहमीची सर्वसामान्य पार्श्वभूमी माझ्या चित्रासाठी मी पसंत केली नाही.  दोन्ही चित्रे यथार्थच आहेत.  कारण विषुववृत्तापासून तो आशियाच्या थंडगार हृदयापर्यंत हा महान हिंदुस्थान विशाल पसरलेला आहे.

 

भारताची विविधता आणि एकता

भारतातील विविधता कल्पनातीत आहे.  ती एकदम दिसते.  ती शोधायला नको.  कोणालाही ती एकदम समोर सर्वत्र दिसेल.  बाह्य आकारात फरक आहेत असे मानसिक सवयी व वैशिष्ट्यांतही फरक आहेत.  वरवर पाहिले तर सरहद्दीवरचा पठाण आणि दक्षिणेकडील तमिळी यांच्यात सामान्य असे काहीही आढळणार नाही.  दोघांच्या रक्तात काही समान अंश कदाचित असला तरी दोघांचे भिन्न मानववंश; त्यांचा तोंडावळा निराळा, त्यांचा बांधा निराळा; खाणे-पिणे, पेहराव अर्थात भाषा निराळी.  वायव्येकडील सरहद्द प्रांतात मध्यआशियाचे वारे लागले आहे व काश्मिरातल्याप्रमाणे सरहद्द प्रांतातीलही पुष्कळशा चालीरीती हिमालयाच्या पलीकडील देशांची आठवण करून देतात.  पठाणांतील लोकनृत्ये व रशियन कोसॅक लोकनृत्ये यांत विलक्षण साम्य आहे.  परंतु हे सारे भेद असूनही पठाणावर भारताची पडलेली छाप अगदी चुकूनसुध्दा चुकणार नाही इतकी स्पष्ट आहे व तितकीच ती तामिळ लोकांतही सहज आढळते.  यात आश्चर्य करण्यासारखे असे काही नाही.  कारण सीमाप्रांत आणि स्वत: अफगाणिस्थान एके काळी हजारो वर्षे भारतातच मोडत होते.  मुसलमानी धर्माचा उदय होण्यापूर्वी अफगाणिस्थानात व मध्य आशियातही तुर्की व इतर जातिजमाती राहात असत.  त्या सार्‍यांचा त्या वेळेस बुध्दधर्म होता.  आणि बुध्दधर्माच्या पूर्वी रामायण-महाभारताच्या काळी हे सारे हिंदूच होते.  प्राचीन भारतीय संस्कृतीचे एक प्रमुख केंद्र या सीमाप्रांतात बहरले होते.  अद्यापही या प्रदेशात जिकडे तिकडे प्राचीन अवशेष दिसतील; मठ, विहार दिसतील; याच प्रदेशात विश्वविश्यात तक्षशिला विद्यापीठ होते.  दोन हजार वर्षांपूर्वी त्याची कीर्ती शिगेला पोचून सर्व हिंदुस्थानातून व आशियाच्या निरनिराळ्या भागांतून विद्यार्थी तेथे येत.  धर्म बदलल्यामुळे फरक होतात ही गोष्ट खरी; परंतु त्या प्रदेशातील लोकांची घडत आलेली, वाढत आलेली विशिष्ट मनोवृत्ती ही संपूर्णपणे धार्मिक फरकामुळे बदलू शकत नाही.

पठाण व तामिळ मनुष्य ही अगदी दोने टोके आपण घेतली.  या दोहोंच्या दरम्यान सारे येतात.  सर्वांचे विशेष स्वभावधर्म आहेत; सर्वांची विशिष्ट स्वरूपे आहेत.  परंतु सगळे शेवटी हिंदी म्हणून, भारतीय म्हणून जगापासून उमटून पडतात.  बंगाली, महाराष्ट्रीय, गुजराथी, तामिळी, तेलगू, ओरिया, असामी, कानडी, मल्याळी, सिंधी, पंजाबी, पठाणी, काश्मिरी आणि मध्यहिंदुस्थानातील हिंदुस्थानी भाषा बोलणारे, या सर्व लोकांनी आपापले विशिष्ट स्वभावधर्म शेकडो वर्षे झाली तरी ठेवले आहेत, हे पाहून आश्चर्य वाटते.  प्राचीन वर्णनातून, लेखातून, वाङ्मयातून त्यांच्या ज्या गुणदोषांचे वर्णन आहे ते गुणदोष आजही त्यांच्यात दिसून येतात.  आपण असे असूनही शतकानुशतके ते सारे हिंदी म्हणून भारतीय म्हणून राहिले आहेत, जगले आहेत.  सर्वांचा तोच राष्ट्रीय वारसा; सर्वांचे तेच नीतिशास्त्र; तोच मनोधर्म.  हा जो भारतीय वारसा त्यात काही एक शक्तिशाली प्राणमय तत्त्व येते; त्याचा आविष्कार लोकांच्या राहणीत व संसाराकडे आणि संसारातल्या अडीअडचणींकडे पाहण्याच्या तत्त्वज्ञानी वृत्तीत दिसून येतो.  प्राचीन हिंदुस्थान चीनप्रमाणे एक स्वतंत्र जगच होते, व त्याची एक जी विशिष्ट संस्कृती, एक जीवनपध्दती होती ती राष्ट्राच्या सर्व संसाराला आपले रूप देई.  परकीय वळणाचे लोंढे पुरासारखे अनेकदा आले. त्यांचा भारतीय संस्कृतीवर पुष्कळदा परिणाम झाला, पण शेवटी ते सर्व या संस्कृतीने पचवून आत्मसात केले.  संस्कृतींचे संघर्ष सुरू होताच त्यांचा समन्वय करण्याचा प्रयत्न ताबडतोब केला जाई.  संस्कृतीच्या उष:कालापासून भारतीय बुध्दी अनेकांतून एकदा निर्माण करण्याचे काही एक अस्पष्ट स्वप्न पाहण्यात गुंग राहिलेली आहे. ती एकदा म्हणजे नुसते बाह्यरूप एक साच्याचे असावे किंवा श्रध्दा ठरीव सिध्दान्तावरच ठेवावी अशा हुकमी आग्रहाने सक्तीने लादलेली एकता करावी अशी योजना नव्हती.  यापेक्षा फार खोलवर पोचणारी, अधिक मूलग्राही एकता या संस्कृतीत योजलेली होती.  आणि या संस्कृतीच्या परिसरात भिन्न रूढी, विविध आचार, व अनेक प्रकारची भक्ती यांना वाव होता.  इतकेच नव्हे, तर अशा विविध प्रकारांना मान्यता व उत्तेजनही दिले जाई.

 

भारतमाता

मी या सभेतून त्या सभेकडे असा सारखा हिंडत होतो.  सभांतून पुष्कळदा आपला हा हिंदुस्थान, हा भारत देश, असे शब्द मी उच्चारीत असे.  भारत हे संस्कृत नाव मूळ संस्थापक जो भरत त्याच्यावरून पडले.  शहरातील सभांतून भारत, भारतमाता असे शब्द मी क्वचितच वापरीत असे.  कारण शहरातील श्रोते अधिकच निर्ढावलेले; त्यांना यापेक्षा जास्त मसालेदार माल लागे.  तेथे एवढ्या भांडवलावर भागले नसते.  परंतु किसानाची मर्यादित दृष्टी त्याच्यासमोर या विशाल देशाविषयी मी बोलत असे.  आपला देश केवढा मोठा, किती विविध, एक प्रांत दुसर्‍यापेक्षा किती निराळा, आणि तरीही सारा देश एकच कसा, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत शेतकर्‍यांचे प्रश्न सर्वत्र सारखे कसे आहेत, स्वराज्य आणायचे आहे, ते या किंवा त्या भागासाठी नसून सर्व देशासाठी कसे आहे; ते मी सांगत असे.  वायव्येकडील खैबर खिंडीपासून कन्याकुमारीच्या दक्षिण टोकापर्यंत मी सर्वत्र हिंडलो.  परंतु शेतकरी कोठेही जा तेच प्रश्न मला कसे विचारीत, त्यांची दु:खे समान कशी होती, सर्वत्र भीषण दारिद्र्य, उपासमार, कर्जाचा डोंगर, सावकार आणि जमीनदार, त्यांचे ते विशेष हक्क, सरमसाट खंड, डोईजड कर, पोलिसांचा जाचकाच आणि या सार्‍या आपत्ती परकी सत्तेने जी एक चौकट आपणावर लादली आहे तिच्याशी कशा संबध्द आहेत ते मी सांगत असे.  आणि सर्वांना सर्वत्र त्रास आहे तर सुखही येईल हे सर्वांना कसे मिळाले पाहिजे ते मी समजावून सांगत असे.  संपूर्ण हिंदुस्थानचा विचार सगळा आपला सर्वांचा देश म्हणून करायला त्यांनी शिकावे, एवढेच नव्हे, तर ज्या विशाल जगाचा आपण एक भाग आहोत त्या जगाचाही त्यांनी थोडाफार विचार करायला शिकावे असा माझा प्रयत्न असे.  म्हणून त्यांच्यासमोर बोलताना मी त्यांच्यासमोर चीनमधील लढायांचा उल्लेख करीत असे.  स्पेन, अबिसीनिया, मध्य युरोप, इजिप्त, आशियाच्या पश्चिमेकडील देश यांतील संघर्ष, तेथील चळवळी यासंबंधी मी बोलत असे.  रशियात कसे आश्चर्यकारक फेरफार होत आहेत ते व अमेरिकेने किती प्रगती केली आहे ते सांगे.  अशा रीतीने एक व्यापक दृष्टी शेतकर्‍यालाही यावी म्हणून माझी धडपड असे.  हे काम सोपे नव्हते.  परंतु वाटत होते तितके कठीणही गेले नाही.  कारण रामायण महाभारत ही आपली प्राचीन महाकाव्ये, तसेच इतर दंतकथा आणि पुराणे यामुळे भारताची त्यांना कल्पना होती.  त्या प्राचीन साहित्याशी परिचित असल्यामुळे आपल्या देशाची कल्पना करणे त्यांना कठीण गेले नाही.  त्यांच्यापैकी काहीजण हिंदुस्थानच्या चारी दिशांना दूरवर यात्रेच्या निमित्ताने हिंडून फिरून आलेले असत.  कधी कधी माझ्या श्रोत्यांत जुने सैनिक असत, ते गेल्या महायुध्दात अनेक स्वार्‍यांतून जगातील निरनिराळ्या भागांतून जाऊन आलेले होते.  १९३० सालच्या सुमाराला सर्वत्र मंदी आली, तिचा संबंध जागतिक घडामोडींशी कसा होता ते त्यांना सांगितले की परकी देशांचे उल्लेख त्यांना पटकन पटत. 

कधी कधी सभास्थानी मी पोचताच प्रचंड जयघोषांनी माझे स्वागत केले जाई.  'भारतमाता की जय' या गर्जना उठत.  या घोषणेचा अर्थ काय असे मी त्यांना विचारी तेव्हा ते बुचकळ्यात पडत, कारण मी असा काही प्रश्न करीन अशी त्यांची अपेक्षा नसे.  ज्या भारतमातेचा जय व्हावा असे तुम्हाला वाटते ती भारतमाता म्हणजे काय ?  या प्रश्नाचे त्यांना नवल वाटे, व काय उत्तर द्यावे हे ध्यानात न आल्यामुळे ते एकमेकांकडे बघत व माझ्याकडे बघत.  मी पुन्हा पुन्हा विचारीत राहिलो तर एखादा तडफदार जाट, जमिनीशी पिढ्यानपिढ्या एकरूप झालेला असा किसान उभा राही आणि उत्तर देई की, भारतमाता म्हणजे ही धरित्री, ही हिंदुस्थानची सुंदर जमीन, परंतु मी पुन्हा प्रश्न विचारी की कोठली जमीन ?  तुमच्या खेडेगावातील जमिनीचा तुकडा की जिल्ह्यातील सारी जमीन की प्रांतातील, की या सर्व हिंदुस्थानातील ? अशा रीतीने प्रश्नोत्तरे चालत, आणि ते शेवटी अधीर होऊन म्हणत, ''आम्हांला समजत नाही, तुम्ही सारे नीट सांगा'' आणि मी तसा प्रयत्न करी.  तुम्ही समजता त्याप्रमाणे सर्व हिंदुस्थान यात येतोच, परंतु आणखीही काधी अधिक त्यात आहे.  भारतातील पर्वत व नद्या, अरण्ये व अन्न देणारी अफाट शेतजमीन या सार्‍या गोष्टी आपणास प्रिय आहेतच; परंतु शेवटी भारत म्हणजे मुख्यत्वेकरून भारतीय जनता, तुमच्या माझ्यासारखे हे सारे लोक, या अफाट देशात सर्वत्र पसरलेली हिंदी जनता हा भारतमातेचा मुख्य अर्थ.  भारतमाता म्हणजे कोट्यवधी हिंदी बंधुभगिनी भारतमातेचा जय म्हणजे या भारतीय जनतेचा जय.  आणि मी शेवटी म्हणे की तुम्हीही सारे या विशाल भारतमातेचेच अंश आहात.  तुम्ही स्वत:च एक प्रकारे मूर्तिमंत भारतमाता आहात.  हळूहळू हा विचार त्यांच्या मनोबुध्दीत मुरत जाई, हृदयात घुसे आणि मग एखादा मोठा नवीन शोध लागला अशा रीतीने त्यांच्या डोळ्यात एक नवीन प्रभा चमके.

   

हिंदुस्थान किंवा इतर कोणताही देश यांना मानवी गुणधर्म कल्पून पाहण्याची वृत्ती अर्थात खुळेपणाची आहे.  देश म्हणजे हातपाय असलेली एखादी व्यक्ती नव्हे.  मी तरी असली कल्पना कधी केली नाही, अशा स्वरूपात भारताकडे कधी पाहिले नाही.  भारतीय जीवनातील विविधता, शेकडो भेद, नाना वर्ग, जातिजमाती, धर्म, वंश, सांस्कृतिक विकासाच्या निरनिराळ्या पातळ्या या सर्वांची मला स्पष्ट जाणीव असे.  परंतु मला असे वाटते की ज्या देशाला अखंड अशी सांस्कृतिक परंपरा आहे, अशा दीर्घ परंपरेची ज्याला पार्श्वभूमी आहे, ज्या देशातील लोकांची जीवनाकडे पाहण्याची एक समान दृष्टी आहे, त्या देशाचे विशिष्ट काही अंतरंग निर्माण होत असते, आणि त्या अंतरंगाचा त्याच्या सर्व संतानांवर ठसा उमटत असतो.  त्यांचे आपसात मग कितीही मतभेत असोत, परंतु राष्ट्राच्या विशिष्ट वृत्तीचा स्पष्ट ठसा त्यांच्यावर उमटल्याशिवाय राहात नाही.  तुम्ही चीनमध्ये जाऊन पाहा, तेथील सनातनी मांठेरिन पंडित बघा, किंवा भूतकाळाशी संबंध असलेला संबंध तोडून उभा राहिलेला कम्युनिस्ट बघा.  त्यांच्यावर एकच चिनी छाप तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही.  तसेच भारताच्या अंतरंगाचेही आहे.  या भारतीय अंतरंगाचा मी शोध करीत होतो. केवळ जिज्ञासा म्हणूनही हे संशोधन करीत नव्हतो.  जिज्ञासा नव्हती असे नाही.  परंतु माझा देश, माझे देशबांधव यांचे वैशिष्ट्य समजून घेण्यासाठी एखादी किल्ली या संशोधनातून मला मिळेल असे वाटत असल्यामुळे त्या शोधास मी प्रवृत्त झालो होतो.  माझ्या विचाराला आणि कृतीला त्या संशोधनातून मार्गदर्शन होईल या इच्छेने मी या शोधाला निघालो होतो.  राजकारण आणि निवडणुकी यांना त्या त्या क्षणापुरते महत्त्व असते.  क्षुद्र गोष्टींवरच आपण जेव्हा भर देऊ लागतो तेव्हा अशा गोष्टींना भाव येतो.  परंतु भारताच्या भविष्यकालीन मंदिराची जर आपणांस भक्कम पायावर अभंग, सुरक्षित व सुंदर उभारणी करायची असेल, तर आपणांस पाया चांगला खोल खणला पाहिजे.

 

१९२० सालच्या सुमाराचे माझे कार्य माझ्या प्रांतापुरतेच मर्यादित होते.  आग्रा-अयोध्येच्या संयुक्त प्रांतात मी सर्वत्र हिंडलो.  ४८ जिल्ह्यांतून, खेड्यांतून, शहरांतून, मोठ्या भरण्याच्या गावांतून हिंडलो.  संयुक्त प्रांत म्हणजे हिंदुस्थानचा गाभा आहे, अशी आजपर्यंत समजूत आहे.  प्राचीन व मध्ययुगीन संस्कृतीचे आसन व अधिष्ठान याच प्रांतात.  हा प्रांत म्हणजे अनेक जातिजमातींच्या सरमिसळीची जागा; अनेक संस्कृतींच्या संमिश्रणाची जागा.  या क्षेत्रातच १८५७ चे स्वातंत्र्ययुध्द पेटले व पुढे क्रूरपणाने चिरडून टाकण्यात आले.  संयुक्त प्रांतभर फिरता मला तेथील अनेक प्रकारच्या लोकांची प्रत्यक्ष ओळख व माहिती होत गेली.  उत्तर व पश्चिम बाजूच्या जिल्ह्यांतले जाट म्हणजे त्यांच्या मायभूमीचा खरा नमुना; धट्टाकट्टा, रगेल, त्यातल्या त्यात बर्‍यापैकी स्थितीतला दिसे.  छोटे छोटे रजपूत जमीनदार, रजपूत शेतकरी यांनी मुसलमानी धर्म स्वीकारला असला तरी रजपूत रक्ताचा आणि रजपूत परंपरेचा त्यांना कोण अभिमान वाटे.  कलाकुसरीचे नाजुक नक्षीदार काम करणारे पटाईत कलावंत, कारागीव व छोटेछोटे धंदेवाईक हाते.  त्यात हिंदू व मुसलमानही होते.  किसान व जमीन कसणारी कुळे त्यातल्या त्यात गरिबीत दिवस वाढीत होती.  विशेषत: पूर्वेकडील, अयोध्येकडील या वर्गाची संख्या अफाट होती.  पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या जुलमाने व रक्तशोषणाने पिळून निघालेली, चिरडून टाकलेली ही पददलित जनता, काही फरक होईल आणि आपले नशीब बदलेल अशी आशा करण्याचेही धैर्य होत नसतानाही कसल्यातरी आशेवर व श्रध्देवर जगत होती.

१९२० सालानंतर ३० चा काळ आला.  तुरुंगाच्या वार्‍या करताकरता मधूनमधून जी फुरसत मला मिळाली ती मी हिंदी जनतेत हिडण्यातच घालविली.  विशेषत: १९३६-३७ सालातील निवडणुकीच्या दौर्‍यात सारा हिंदुस्थान मी पालथा घातला.  शहरे, गावे, खेडी सर्वत्र फिरलो.  फक्त बंगालमधील खेड्यापाड्यांतून मी गेलो नाही.  क्वचितच बंगाली ग्रामीण जनतेचे मला दर्शन झाले, हे माझे दुर्दैव; परंतु बाकी सर्वत्र मी गेलो.  प्रत्येक प्रांतातून मी दौरा काढला आणि खेडोपाडी हिंडलो.  मी राजकीय आणि अर्थिक प्रश्नांवर भर देत असे.  त्या वेळच्या माझ्या भाषणांवरून पाहिले तर निवडणुका आणि राजकारण याशिवाय माझ्या मनात दुसरे काही असेल असे वाटणार नाही.  परंतु माझ्या मनाच्या एका कोपर्‍यात सदैव काहीतरी खोल, गंभीर, अधिक स्पष्ट असे काही असे.  निवडणुकींचा त्याच्याशी फारसा संबंध नव्हता.  जाणार्‍या घटकेचा, तात्पुरत्या प्रक्षोभांचा, गडबडीचा त्याच्याशी संबंध नसे.  दुसर्‍याच एका प्रक्षोभक विचाराने मला घेरले होते.  दुसर्‍याच एका तसल्या विचाराने मी पछाडलो गेलो होतो.  भारताच्या शोधार्थ जुने ग्रंथ, जुने शिलालेख व अवशेष, जुन्या कलाकृती, प्राचीन प्रवासवर्णने यात माझी पहिली सफर झाली, आता ही दुसरी सफर चालली होती.  माझ्यासमोर प्रत्यक्ष भारतभूमी होती, भारतीय जनता होती.  भारताची अगाध मोहिनी व विविधता यांचा मला अधिकाधिक साक्षात्कार होऊ लागला व मला जसजसे अधिक दर्शन घडे तसतसे ज्या अमूर्त कल्पनांची ही साकार मूर्ती बनली त्या साकार कल्पनांचे आकलन करणे मला किंवा कोणालाही किती कठीण आहे याची जाणीव जास्त स्पष्ट होऊ लागली.  भारताच्या प्रचंड विस्तारामुळे किंवा विविधतेमुळे काही गोष्टी सुटून जात असे नव्हे तर भारताच्या अंतरंगाच्या अथांग खोलीचा, गंभीर आत्म्याचा ठाव मला लागेना.  मधून मधून तळ दिसे व त्याने मन वेडे होई.  एखादा प्राचीन लेखपट असावा, ज्याच्यामागून एकावर एक अनेकांनी आपले विचार, आपले मनोमय जीवन लिहून ठेवलेले असावे, आणि मागून येणार्‍यांनी नवीन लिहिले तरी जुने सारे नष्ट झालेले नसावे, पुसले गेले नसावे; त्याप्रमाणे हा भारत मला दिसला.  त्या त्या युगातील, त्या त्या काळातील ते विचार आणि ती स्वप्ने ही सारी आपल्यामध्ये एकत्र असतात.  कधी त्यांची आपणांस जाणीव असते, कधी नसते.  ज्याला आपण भारत म्हणून म्हणतो त्या भारताला या सर्वांनी आकार दिला आहे.  भारताची संमिश्र आणि गूढ मूर्ती या सर्वांतून घडलेली आहे.  ही भारताची मूर्ती ईजिप्तमधील त्या दुर्बोध स्फिंक्स पुतळ्याप्रमाणे वाटते.  तिच्या मुखावरील हास्याचा अर्थ लक्षात येत नाही.  नाही ना समजत माझे स्वरूप असे म्हणत जणू ती हसते असे वाटते.  मी भारताच्या चारी दिशांना हिंडलो.  सर्वत्र मला ते दुर्बोध हास्य दिसे, कूटात्मक सस्मित मुखमंडल दिसे.  भारतीय जनतेत बाह्यत: जरी विभिन्नता असली, अपार विविधता असली तरी आतून या सर्वांची एकच घडण असल्याचा तीव्र अनुभव येई.  हजारो वर्षे गेली तरी आपण त्या आंतरिक एकतेमुळे एकत्र राहिलो.  कितीही राजकीय घडोमोडी झाल्या, आपत्ती आल्या तरी ही एकता मेली नाही.  भारताची एकता मला आता केवळ एक बुध्दिगम्य कल्पना म्हणून उरली नाही.  तो आता एक भावनागम्य प्रत्यक्ष अनुभव झाला.  त्या अनुभवाने मला पार भारून टाकले.  ती आमूलाग्र एकता इतकी प्रभावी आणि सामर्थ्यसंपन्न होती की, कितीही उत्पात झाले, प्रलय ओढवले, प्रक्षोभ माजले, राजकीय विभागण्या झाल्या तरी ती अजिंक्य आणि अमरच राहिली, विजयीच राहिली.

   

पुढे जाण्यासाठी .......