मंगळवार, मार्च 31, 2020
   
Text Size

प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२)

त्यामुळे त्यांनी जे काही नीतिनिर्बंध सदैव पाळलेच पाहिजेत असे स्वत:च्या मते ठरविले आहेत, ते पाळून त्यांना स्वत:च्या प्रत्यक्ष आचरणात स्वत:ला प्रिय असलेल्या मार्गाने जाण्याची, स्वत:ची मते बदलून परिस्थितीशी जुळते करून घेण्याची व स्वत:चे जीवनविषयक व कर्तव्यविषयक तत्त्वज्ञान तयार करण्याची विशेषच मोकळीक मिळाली आहे.  हे त्यांचे तत्त्वज्ञान बरोबर आहे का चुकलेले आहे हा प्रश्न वाद करता येण्यासारखा आहे, पण त्याच एका मूळ मापाने प्रत्येक गोष्ट मोजली पाहिजे असा ते आग्रह धरतात व स्वत:च्याही बाबतीत त्यांचा तोच आग्रह विशेष आहे.  जीवनाच्या इतर प्रांताप्रमाणेच राजकारणातही हा एक मूळ मापाचा आग्रह सर्वसामान्य माणसाला मोठा अडचणीचा होतो, त्यामुळे पुष्कळ वेळा एकमेकाबद्दल गैरसमज उत्पन्न होतात.  पण अडचणी काहीही आल्या तरी गांधींनी जी काही पक्की रेघ मारली असेल त्या रेघेपासून गांधी रेसभर इकडेतिकडे हालू म्हणत नाहीत. मात्र परिस्थिती बदलेल त्याप्रमाणे तिच्याशी जुळते घेण्यापुरता स्वत:च्या मतात फरक करणे त्यांचे सारखे चालू असते.  ते जी एखादी सुधारणा म्हणून सुचवतात किंवा लोकांना जो काही उपदेश करतात तो ते स्वत:च्या बाबतीत ताबडतोब अमलात आणतात.  असल्या गोष्टींची सुरुवात ते स्वत:पासून करतात, त्यामुळे त्यांच्या उक्तीशी त्यांच्या कृतीचा मेळ मोठा नामी बसतो.  त्यामुळे काहीही झाले तरी त्यांचे सत्त्व ढळत नाही व त्यांचे जीवन आणि कार्य यांच्यातून नेहमी एक प्रकारे सहज सुसंगत पूर्ती आढळते.  वरवर पाहिले तर त्यांचा पराभव झालेला आहे असे ज्या प्रसंगी दिसे त्या प्रसंगीसुध्दा त्यांची उंची वाढली असे वाटे.

स्वत:च्या इच्छेनुरूप व स्वत:ची ध्येये कायम राखून जो हिंदुस्थान घडवायला गांधींनी आरंभ केला होता त्या हिंदुस्थानची त्यांची कल्पना काय होती ?  ''हा देश आपला आहे असे जेथे गरिबातल्या गरिबाला वाटेल, ह्या देशाच्या घटनेत आपल्या शब्दाला किंमत आहे असे जेथे त्यांना वाटेल, जेथे वरिष्ठ व कनिष्ठ असे वर्गभेद लोकांत मुळीच नाहीत, जेथे सर्व जमाती सलोख्याने एकजीव नांदत आहेत, असा भारत देश निर्माण व्हावा म्हणून मी कार्य करीत राहीन... ह्या भारतात अस्पृश्यता, मादक पेये व अमली पदार्थ ह्या उपाधींना जागाच नाही...स्त्रियांना पुरुषांचे सारे हक्क असतील...असा भारत देश असावा असे माझे मनोराज्य आहे.''  हिंदू म्हणून लाभलेल्या पितृधनाचा त्यांना अभिमान होता म्हणून हिंदुधर्माला विश्वव्यापी वेष चढविण्याचा त्यांनी प्रयत्न करून सत्याच्या कक्षेत एकूण एक सारे धर्म गोळा केले.  त्यांना लाभलेला संस्कृतीचा वारसा संकुचित करण्याचे त्यांनी नाकारले.

''हिंदुस्थानची संस्कृती निव्वळ हिंदू किंवा इस्लामी किंवा निव्वळ दुसर्‍या काही प्रकारची नाही, ती हे सर्व प्रकार मिळून झालेली आहे.'' अन्यत्र ते म्हणतात, ''देशाच्या संस्कृतीचे भिन्नभिन्न दिशेचे वारे माझ्या घराभोवती शक्यतो मोकळे फिरावे.  परंतु ह्या वार्‍यांपैकी कोणत्याही वार्‍याच्या झोताने कोलमडून पडायला मी तयार नाही.  लोकांच्या घरी आगंतुक किंवा भिकारी किंवा गुलाम म्हणून मी राहणार नाही असा माझा आग्रह आहे.''  गांधींच्यावर आधुनिक विचारप्रवाहांचा थोडाफार प्रभाव पडला, परंतु त्यांनी आपले मूळ कधीच सोडले नाही, त्या मुळाला ते अगदी चिकाटीने धरून राहिले.

 

पुढे जाण्यासाठी .......