गुरुवार, एप्रिल 22, 2021
   
Text Size

प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला

पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला
घटनांच्या कार्यकारणपरंपरेची साखळी
अहमदनगर किल्ला : १३ ऑगस्ट १९४४


आम्ही येथे आल्याला नुकतीच दोन वर्षे लोटून गेली आहेत.  त्याच त्या एका ठिकाणी खिळलेले आहोत, तीच नेहमी मोजकी माणसे भेटताहेत, तेच बंदिस्त दृश्य डोळ्यांपुढे दिसते, तोच तो ठरलेला दैनंदिन कार्यक्रम अव्याहत वाहतो, असा हा तब्बल दोन वर्षांचा काळ-आम्ही स्वप्नात वावरतो आहोत असे भासते.  पुढे कधीतरी, केव्हातरी या स्वप्नातून उठून आम्ही या बंदिवासाबाहेरच्या मोकळ्या जीवनाच्या, स्वच्छंदाने चालणार्‍या मोकळ्या व्यवहाराच्या जगात जाऊ तेव्हा ते काही वेगळेच जग आहे असे वाटेल.  बाहेरच्या जगात पुन्हा गेल्यावर जी जी माणसे भेटतील, जे सारे काही दिसेल ते थोडेसे अनोळखी, काही वेगळेच आहे असे प्रथम वाटेल; नंतर काही वेळाने ओळख पटेल व मग पूर्वस्मृतींचा लोंढाच्या लोंढा मनात घुसेल, पण सार्‍या आठवणी पुन्हा उजळल्या तरी हे बाहेरचे जग पूर्वीचे तेच ते नसणार व आम्हीही तसे नसणार व आम्हाला त्याचा सराव वाटू लागायला कदाचित जडही जाईल.  केव्हा केव्हा आमचे आम्हालाच असे चमत्कारिक वाटू लागेल की, तुरुंगाबाहेरच्या या आपल्या नेहमीच्या दैनंदिन जीवनाचा जो आपल्याला नवा अनुभव येतो आहे तो झोपेत, स्वप्नात तर नाही ? एकदम आपल्याला जाग येऊन हे चाललेले स्वप्न विरून तर जाणार नाही ? यातली सत्यसृष्टी कोणती ?  का दोन्हींचाही आमचा अनुभव, त्यांची आम्हांला होत असलेली जाणीव, अगदी पुरी आहे म्हणून दोन्हीही सत्यच आहेत ?  किंवा दोन्हीही नुसताच आभास, एकामागून एक प्रसंग डोळ्यांपुढे तरळत जात जात ज्यांची आठवण जेमतेम मोघम, अस्पष्ट राहते अशा स्वप्नांची दुनिया ?

बंदिवास आणि त्याबरोबरच एकान्त व निष्क्रियता आली की मनाची प्रवृत्ती विचार करीत बसण्याकडे वळते, आणि आपल्या जीवनात पडलेला हा खंड स्वत:च्या जीवनात घडून गेलेल्या व मानवी कर्तृत्वाने शतकानुशतकांच्या दीर्घ इतिहासात घडवून ठेवलेल्या घटनांच्या स्मृतींनी भरून काढण्याचा प्रयत्न मन करीत राहते.  म्हणून, माझ्या ह्या लेखनाच्या निमित्ताने, पूर्वा हिंदुस्थानात काय घडले त्याचा इतिहास व अनुभव यांचा विचार करण्यात; मी गेले चार महिने माझे मन गुंतविले आहे आणि जे अनंत विचार मनात लोटले त्यातून काही निवडून काढून त्याचे हे पुस्तक लिहिले आहे.  मी जे काय लिहिले आहे त्यावरून पुन्हा एकवार दृष्टी फिरविली तर ते मला अपुरे व विस्कळीत वाटते.  त्यात एकसूत्रीपणा आलेला नाही, अनेक घटना नुसत्या एकत्र मांडून ठेवल्या आहेत, त्या एकजीव झालेल्या वाटत नाहीत.  त्यावर माझी स्वत:ची वैयक्तिक छाप फार पडलेली दिसते, केवळ वस्तुनिष्ठ वृत्तान्त व विवरण करायला गेलो तर त्यातही माझा स्वत:चा रंग येतोच.  लेखनात आलेला स्वत:चा दृष्टिकोण, माझा वैयक्तिक संबंध, माझी तशी इच्छा नसूनही गर्दीने पुढे घुसून पुढे आला आहे.  ही माझी प्रवृत्ती मी पुष्कळ ठिकाणी आवरून दडपून ठेवली आहे, पण अधूनमधून मी तिला सैल सोडून माझ्या लेखणीतून वाहू दिली आहे, माझ्या मनाचे प्रतिबिंब लेखनात येऊ दिले आहे.

झालेला सारा आतापर्यंतचा इतिहास लिहून टाकून त्या गतेतिहासाच्या ओझ्यातून मोकळा होण्याचा मी हा प्रयत्न केला आहे.  परंतु वर्तमानकालातील घोटाळे, बुध्दिप्रमाण्य न मानण्याचा जगाचा हेकेखोरपणा व या वर्तमानाच्या पुढचे गहन, गूढ भविष्य, यांचे ओझे त्या भूतकालाच्या ओझ्याहून काही कमी वाटत नाही, हे शिल्लक आहेच.  उनाड मनाला कशाचा आसरा सापडत नाही म्हणून ते अजूनही अस्वस्थपणे इकडे तिकडे भटकते आहे, त्याचा त्रास त्या मनाच्या धन्याला व इतरांनाही पोचतो आहे.  ज्यांच्या बुध्दीचे कौमार्य विचाराचा नांगर बुध्दीत घुसून भ्रष्ट झालेले नाही, विचाराचा विटाळसुध्दा ज्यांच्या बुध्दीला झालेला नाही, ज्यांच्या बुध्दीवर शंकेची कधी सावली पडली नाही की शंकेची एक ओळ देखील कधी उमटली नाही, त्यांचा हेवा वाटतो.  जीवन म्हटले की त्यात अधूनमधून धक्का लागणारच, दु:ख होणारच, पण एकंदरीत त्या महाभागांचे जीवन किती निरामय असते !

 

पुढे जाण्यासाठी .......