मंगळवार, डिसेंबर 10, 2019
   
Text Size

रामराव

‘आपण एकदा यात्रेला जाऊं.’ सगुणाबाई एके दिवशी म्हणाल्या.

‘इतक्यांत नको.’ रामराव म्हणाले.

‘मग कधी जायचे? परतीची स्वस्त तिकिटे निघाली आहेत म्हणे. आपल्या गावची पुष्कळ मंडळी जाणार आहेत. आपणही जावे.’

‘आपण जाऊ कधी तरी; परंतु अशा घाईत नको. आपली प्रेमा मोठी होऊन, तिचे लग्न होऊन ती एकदा सासरी गेली, म्हणजे मग आपण यात्रेला जाऊ. संसाराची यात्रा संपत आली की, देवाच्या यात्रेस निघावे. नाही तर यात्रा करून यायचे आणि पुन्हा मायामोहात पडायचे, ते बरे नाही.’

‘कधी करणार प्रेमाचे लग्न?’

‘घाई काय आहे? जरा होऊ दे मोठी. लहान वयात नको संसार अंगावर. आज कोठे गेली आहे प्रेमा? दिसत नाही मघापासून?’

‘गेली असेल मैत्रिणींकडे.’

‘त्या शंभूनानांकडे नाही ना गेली?’

‘का बरे?’

‘शंभूनानांकडे प्रेमा न गेलेली बरी. त्यांचा मुलगा आहे ना, त्याच्याविषयी लोक नाना गोष्टी सांगतात.’

‘लोकांना त्यांच्या श्रीमंतीचा मत्सर वाटतो. श्रीमंत म्हटला, म्हणजे दुर्गुणी व व्यसनी असायलाच असे भिका-यांना वाटते. उगाच कंड्या उठवतात.’

‘परंतु प्रेमाने तिकडे जाऊ नये असे मला वाटते.’

‘शंभूनाना तर प्रेमाला सून करून घेऊ असे थट्टेने म्हणत असतात.’

‘प्रेमा मी एखाद्या दरिद्र्याला देईन परंतु शंभूनानांकडे देणार नाही. काय चाटायची ती श्रीमंती!’

असे म्हणून रामराव उठून दिवाणखान्यात गेले. तो प्रेमा तेथे होती.

‘काय ग प्रेमा, तू बाहेर गेली होतीस?’

‘नाही. मी इथेच होते.’

‘एवढ्या दिवाणखान्यात एकटीत बसली होतीस? तुला भिती नाही वाटत?’

‘बाबा, आपला दिवाणखाना रिकामा असतो आणि महारांच्या मुलांनी शाळा नाही. आपल्या दिवाणखान्यात त्यांची शाळा भरली म्हणून काय झाले? मग दिवाणखान्याची भीती वाटणार नाही. भरलेला राहील.’

 

पुढे जाण्यासाठी .......