शुक्रवार, जुन 05, 2020
   
Text Size

सेवासदनात

प्रेमाला सरोजाची आठवण येई. ते तिचे दु:ख होते. कोठेही लहान मूल पाहिले, म्हणजे तिला सरोजा आठवे. आता सरोजा मोठी झाली असेल, बोलू लागली असेल असे तिच्या मनात येई. आई म्हणून ती कोणाला हाक मारील? आईबाप हयात असून प्रेमाची मुलगी पोरकी झाली; परंतु आजोबा तिला वाढवीत असतील. आईबापांपेक्षाही आजोबाआजींचे अधिक प्रेम नातवंडांवर असते. असा विचार मनात येऊन ती समाधान मानी.

तिचा कोर्स संपला. ती पहिली आली परीक्षेत. मुंबईच्या एका प्रख्यात दवाखान्यात तिला नोकरी मिळाली. ती मुंबईस राहू लागली. सरोजा कोठे आढळेल का, म्हणून तिचे डोळे तहानलेले असत; परंतु तिला वेळ नसे. दवाखान्यात भरपूर काम असे; परंतु ज्या आठवड्यात रात्रपाळी असे त्या आठवड्यात ती दिवसा मोकळी असे. ती मग हिंडत राही.

एकदा तिने आठ दिवसांची रजाच घेतली आणि रोज पहाटे उठून ती त्या समुद्रतीरावर जाई; परंतु रामराव तिला कधी आढळले नाहीत. आता कसे रामराव येणार? बेबी त्यांच्याजवळ असेल. पहाटे तिला कुशीत घेऊन अंथरुणात पडलेले असतील. ‘मी वेडीच आहे. पहाटे कसे येणार आता बाबा फिरायला! परंतु कोठे भेटतील बाबा? कोठे दिसतील?

प्रेमा दवाखान्यात मनापासून काम करी. सारे रोगी तिची वाट पाहात. ती गोड बोलून सारे करी. रोग्यांची जणू ती आई बने. हिडीस फिडीस करीत नसे. त्यांना धीर देई.

एकदा एक मोठी श्रीमंत बाई आजारी पडून हॉस्पिटलमध्ये आली. इतर नोकरचाकर, इतर दाया तिची अधिक काळजी घेत. तिच्या बिछान्यावर रोज स्वच्छ चादर. तिला वाटेल ते ताबडतोब मिळे. तिच्या सेवेसाठी सर्वजण सिद्ध असत.

एकदा प्रेमा एका गरीब रोग्याची शुश्रूषा करीत होती. इतक्यात त्या श्रीमंत बाईने हाक मारली. ‘येते हां’ असे म्हणून प्रेमा पहिले ते काम पुरे करीत होती. त्या गरीब बाईचे अंग नीट पुसून, तिला नीट नेसवून तिच्या अंगावर पांघरूण घालून प्रेमा त्या श्रीमंत बाईकडे गेली.

ती श्रीमंत बाई तणतणत होती; परंतु प्रेमाने तिचा राग दूर केला. तिची समजूत घातली. ‘सारे रोगीच, सर्वांचे नको का करायला?’ असे ती म्हणाली.

‘ती गरीब बाई तुम्हाला काय देणार?’

‘तिने काही न दिले, तरी परमेश्वर देईल?’

 

पुढे जाण्यासाठी .......