शुक्रवार, जुन 05, 2020
   
Text Size

सेवासदनात

‘परमेश्वर काय देईल?’

‘आशीर्वाद देईल.’

‘परमेश्वर आहे का तरी?’

‘तुम्हाला काय वाटते?’

‘मला वाटते, नाही.’

‘माझ्या भावाचा त्याने सत्यानाश केला म्हणून.’

‘कोठे होता तुमचा भाऊ?’

‘तिकडे लांब शिवतर म्हणून एक गाव आहे तेथे होता. मी व माझे पती आम्ही दोघे पुष्कळ वर्षे तिकडे आफ्रिकेत होते. आम्हाला मूलबाळ नव्हते. आम्ही दोघेच. भरपूर पैसा मिळविला; परंतु त्या पैशाचे करायचे काय समजेना. आमची सारी संपत्ती स्वकष्टार्जित होती. आम्ही मुंबईस परत आलो. एक मोठा बंगला घेतला. निरनिराळ्या धंद्यांत पैसे गुंतवले. शेअर घेतले. राहात होतो. पुढे तेही मरण पावले. मी एकटी राहिल्ये. भावाचा शोध केला. त्याला एक मुलगी होती. प्रेमा तिचे नाव. कितीतरी वर्षांपूर्वी त्याचे एक पत्र आफ्रिकेत आले होते. त्या वेळेस त्याला पैसे हवे होते. आम्हाला पाठविता आले नाही. त्या वेळेस आम्ही श्रीमंत नव्हतो; परंतु भावाने पुन्हा पत्र पाठविले नाही. आम्हीही नाही पाठविले; परंतु इकडे आल्यावर शोध केला; तो कोणाचा पत्ता नाही. भावाचे घरदार सारे गेले, जप्त झाले. त्याची बायको मेली. तिला न्यायलासुद्धा कोणी आले नाही. सत्यनारायणासाठी महारांना जागा दिली म्हणून बहिष्कार पण घातला गेला. त्याच्या मुलीचे लग्न होऊ न देत ना. कोठेतरी भावाने तिचे लग्न केले, तर तिचेही म्हणे सासरी हाल! भाऊ वैतागून गेला. ती त्याची मुलगीही म्हणे अशीच कोठे वणवण करीत आहे. काय झाले असेल त्या बिचारीचे देवाला माहीत. असा कसा हा देव! माझ्या भावाच्या हात धुवून पाठीस लागणारा देव.’

प्रेमाच्या डोळ्यांत पाणी आले.

‘रडताशा तुम्ही?’

‘गरीब स्त्रियांची दशा ऐकली की, मला फार वाईट वाटते. जाते मी.’

‘बसा जरा. तुम्ही सर्वांचे खरेच किती मनापासून करता. तुम्हाला पैशाचा मोह नाही, रोगी गरीब असो, श्रीमंत असो. सर्वांचे तुम्ही करता. बसा.’

‘बसून कसे चालेल? पुन्हा येईन.’

असे म्हणून प्रेमा गेली. आजा-यांना औषधे देत, चौकशी करीत, टेंपरेचर घेत ती गेली. प्रेमा आदर्श सेविका होती.

 

पुढे जाण्यासाठी .......