बुधवार, सप्टेंबर 23, 2020
   
Text Size

पतीच्या मदतीस

‘तुमची पत्नी असेल.’

‘पत्नीला मी घालवून दिले आहे. ती देवता होती; परंतु मी कसाब तिला छळीत असे. होय. तिचीच पुण्याई मला तारीत असेल. असेल का पण ती जगात? गरीब बिचारी! मडमिणीच्या रंगाला मी भुललो आणि जवळचे रत्न फंकून दिले. अरेरे!’

असे हे संवाद कानावर येऊन प्रेमाला आशा वाटे. आत्याचे म्हणणे खरे होईल का? का हे पतीचे स्मशानवैराग्य आहे? उद्या पुन्हा पैसे हाती आले म्हणजे शेण खायला जाणार नाहीत कशावरून? आपण फक्त कर्तव्य करावे. या खटल्यातून त्यांना वाचवावे. दूरच राहावे. विषाची पुन्हा परीक्षा नको.

खटला बरेच दिवस चालणार असे दिसत होते. प्रेमाला सत्याग्रहात आता जाता येत नव्हते. पतीची मुक्तता करणे हे पहिले कर्तव्य. सत्याग्रह पुढे थांबलाही. महात्माजी विलायतेत गेले. वाटोळ्या परिषदेसाठी गेले.

तथापि देशात अशांतताच होती. पुन्हा चळवळ सुरू होणार की काय? नवीन प्रतिगामी व्हाइसरॉय आले होते. नोकरशाही स्वातंत्र्याची चळवळ ठेचण्यासाठी तयार होती. ३० सालचा काँग्रेसचा विजय नोकरशाहीला शल्याप्रमाणे टोचत होता.

प्रेमा वर्तमानपत्रातून हे सारे वाची. ती आता अंगावर खादी घाली. बंगल्यात सर्वत्र खादी. पुन्हा चळवळ सुरू झाली तर तीत पडायचे असे ती ठरवीत होती.

३१ साल गेले. ३२ साल उजाडले; परंतु देशात पुन्हा आगडोंब उसळला. महात्माजी मुंबई बंदरात उतरले. ते येण्याच्या आधीच पंडित जवाहरलाल यांस अटक झाली होती. अब्दुल गफारखान यांस अटक झाली होती. महात्माजींनी लॉर्ड विलिंग्डन यांस दोन तारा केल्या. महात्माजी त्यांना भेटू इच्छित होते. बोलू इच्छित होते; परंतु त्या तारांना उत्तरही आले नाही. महात्माजींसही ४ जानेवारीस अटक झाली. देशभर पुन्हा लाठीमार सुरू झाले.

अद्याप श्रीधरच्या खटल्याचा निकाल लागला नव्हता. केव्हा लागणार निकाल? प्रेमा अधीर झाली. तो एके दिवशी सर्व देशाला हादरविणारी बातमी आली. हरिजनांसाठी महात्माजींचा येरवड्यास उपवास सुरू झाला. सारा देश गहिवरला.

 

पुढे जाण्यासाठी .......