मंगळवार, एप्रिल 20, 2021
   
Text Size

प्रास्ताविक

मानवी संस्कृती आज संकटात आहे. मधूनमधून असे प्रसंग तिच्यावर नेहमीच येत असतात. जग आज जुनी वस्त्र फेकून देत आहे. एका पिढीपूर्वी जे आदर्श, जी ध्येये, ज्या संस्था वगैरे प्रमाण म्हणून मानली जात, त्या सर्वांना आज आव्हान आहे. त्या सर्वांत बदल होत आहे. जो जो कोणी आजच्या युगाच्या अंतरंगात डोकावून पाहील, त्याला त्याला असे दिसून येईल की आज सर्वत्र एक प्रकारची अस्वस्थता आहे ; निश्चितता कशालाच नाही. आजच्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीविषयी कोणालाच समाधान नाही. आणि एखादी नवी व्यवस्था जन्माला यावी म्हणून सारे उत्सुक झाले आहेत. विचारांचा आज गोंधळ उडाला आहे. ध्येयांची सुस्पष्ट कल्पना नसल्यामुळे त्यांच्याबद्दलचा वाटणारा जिव्हाळा व उत्साह ही तात्पुरती असतात. या सर्व परिस्थितीवरुन मानवजात लवकरच एखादे नवीन पाऊल टाकील असे वाटते.

आज जी ही एक प्रकेरची सारीच अनिश्चितता वाटत आहे, तिला मुख्य कारण म्हणजे आजचे शास्त्र होय. शास्त्र आजच जन्माला आले असे जरी नसले, तरी त्याची प्रगती अर्वाचीन काळात कल्पनातीत झपाट्याचे होत आहे. शास्त्राचे क्षेत्र वाढत आहे, ते सर्वत्र घुसत आहे. शास्त्राच्या गतीबरोबर संसार टिकत नाही. शास्त्राच्या प्रगतीबरोबरच भराभरा परिस्थितीही नीट रीतीने बदलणे होत नाही. आपण एखाद्या प्राण्याला त्याच्या नेहमीच्या वातावरणातून एकदम उचलून जर अगदी अपरिचित अशा वातावरणात नेऊन सोडले, तर त्या प्राण्याला कसे तरी वाटते. तो प्राणी बैचैन होतो. त्या नवीन परिस्थितीशी जमवून घेईपर्यत त्याला अस्वस्थ वाटत असते. “काही काळ शास्त्राने आता सुटी घ्यावी”, असे एक थोर बिशप म्हणाले. त्यांच्या म्हणण्याचा भावार्थ काय ? भावार्थ इतकाच, की शास्त्र फार झपाट्याने पुढे जात आहे. नवीन शोध रोज मिळत आहेत. परंतु या शास्त्रीय शोधांचा उपयोग करुन घेणारा मानवप्राणी तितकाच झपाट्याने सुधारत आहे असे नाही.

 

पुढे जाण्यासाठी .......