प्रश्न
तत्त्वज्ञान म्हणजे काय ? व्यापक अर्थाने पाहिले तर ज्या अमूर्त व अदृश्य पायावर संस्कृतीची इमारत उभी असते तो पाया म्हणजे तत्त्वज्ञान. तत्त्वज्ञान असा पाया देत असते. तत्त्वज्ञान म्हणजे जणू संस्कृतीचा आत्मा. हा आत्मा आपल्याभोवती हळुहळू संस्कृतीचे शरीर उभारतो. त्या त्या समाजातील लोकांना त्या त्या समाजात परंपरागत चालत आलेल्या रुढींवरून, निरनिराळ्या संस्थांवरून; कोणत्या वस्तू महत्त्वाच्या मानावयाच्या, नैतिक मूल्ये म्हणजे काय, ते सारे कळत असते. जीवनाचा अर्थ काय, हेतू काय, हे आपण आपल्या समाजातील रुढ व सर्वसामान्य अशा आचारविचारांवरुन ठरवीत असतो, त्यांवरुन समजून घेत असतो. ज्या वेळेस एखाद्या संस्कृतीची आपण स्तुती अथवा निंदा करतो, त्या वेळेस त्या त्या संस्कृतीत कोणत्या गोष्टीस किती किंमत दिली जाते, हीच गोष्ट आपल्या डोळ्यांसमोर असते. मूल्यश्रेणीवरुन त्या त्या संस्कृतीची परीक्षा घेता येते.
‘पिंडी ते ब्रह्मांडी’ असे भारतीय ऋषी म्हणत. ग्रीक तत्त्वज्ञानीही ही गोष्ट मानीत. मनुष्य म्हणजे एक लहानसे विश्वच होय. खनिज वस्तूंप्रमाणे, जड धातू वगैरेप्रमाणे माणसाच्या देहाला मोजमाप आहे; वनस्पतीप्रमाणे या देहातील रचना आहे; पशूंप्रमाणे या देहाला हालचाल आहे व इंद्रियज्ञान आहे, आणि याशिवाय बुद्धी व आध्यात्मिक आकांक्षा आहेत. मनुष्य म्हणजे शरीर, मन व आत्मा यांचा त्रिवेणीसंगम होय. आपले हे बाह्य शरीर माकडाच्या शरीरापेक्षा फारसे निराळे नाही. वनस्पती व प्राणी यांतूनच हे शरीर उत्क्रांत होत आले असावे. वनस्पती व पशू हे आपले पूर्वज होत. आचार्य इलियट स्मिथ सांगतो की, चिंपांझी जातीच्या मनुष्यसदृश वानरजातीच्या मेंदूची रचना व माणसाच्यात मेंदूची रचना सारख्या आहेत. आपल्या काही वृत्तींवरुन प्राण्यांशी असलेले आपले नाते स्पष्ट होते. उपजत आलस्यवृत्ती, एके ठिकाणी राहण्याची इच्छा, त्या त्या स्थानाबद्दल, भूमीबद्दल वाटणारे प्रेम, क्रोध, भीती वगैरे दुर्दम्य विकार यांवरुन ही गोष्ट सहज ध्यानात येईल. त्याचबरोबर दुस-याही काही गोष्टी आपणात आहेत. अमूर्त व अदृश्य गोष्टींसाठी उत्कट इच्छा, आध्यामिक वृत्ती, पशूत्वातून वर जाऊन उच्चतर जीवन मिळविण्यासाठी धडपड, या गोष्टीही आपल्या जीवनात आहेत. आपली वाङमये, आपल्या कथा, आपली तत्त्वज्ञाने, आपले धर्म, या दुस-या प्रकारच्या वृत्तींतून जन्मली आहेत. मानवी संस्कृती सारखी उत्क्रांत होत चालली आहे. मानवजात सारखी पुढे जात आहे. मानवजातीचा सारा प्रवाह जर आपण पाहू तर आपणास असे दिसून य़ेईल, की मनुष्याची आध्यात्मिक भूक ही सदैव जागी आहे. उच्च जीवनाची त्याची तळमळ सारखी सुरु आहे. आदर्श जीवनाकडे तो डोळे लावून बघत आहे. ही त्याची आध्यात्मिक वृत्ती प्रथम ओबडधोबड स्वरुपात प्रकट झालेली दिसेल. परंतु ओबडधोबड व भोळ्याभाबड्या गोष्टी व कथा यांतून ही वृत्ती विकसित होत होत शेवटी उच्च तत्त्वज्ञानात परिणत झाली. या स्थूल वृत्तींतूनच सूक्ष्म विचार करणारी दर्शने निर्माण झाली, नितीप्रधान अशा संस्कृती उत्पन्न झाल्या.
पुढे जाण्यासाठी .......