गुरुवार, एप्रिल 22, 2021
   
Text Size

पोलिसांकडून छळवाद

सरकारी अधिका-यांजवळ कोणी तरी चुगली केली. दुसर्‍याचा मान क्षुद्र बुद्धीला सहन होत नसतो. राखालचा मान हा व्यक्तीचा नव्हता. सार्‍या विणकरवर्गाचा तो मान होता. परंतु त्याच्या गावच्या एका विणकराला हे सहन झाले नाही. राखाल विदेशी सूत विणणारांना नावे ठेवी. त्याचाही राग त्यांच्या मनात होताच. कोणी तरी सरकारी अधिका-यांजवळ चुगली केली !

राखाल घरी, आपल्या लहानशा घरी बसला होता. पुन्हा त्याला खावयाची फिकीर पडू लागली होती. परंतु ते सोन्याचे क़डे विकावयाची त्याला इच्छा होत नव्हती. त्याच्या पत्नीने त्याला तो विचार सुचवला होता. तो एकदम तिच्यावर उसळून म्हणाला, “ते कडे विणाईची मजुरी नाही. तो कलेचा मान आहे. तिची ती पूजा आहे. देवाच्या अंगावरले दागिने विकून का पोट भरायचे ? त्यापेक्षा मेलेले काय वाईट ? पोटाची खळगी भरण्यासाठी देवाला नागवू ?” त्याची बायको म्हणली, “आज तुम्ही जगाल वाचाल तर आणखी देवाच्या अंगावर दागिने घालाल.”

“या जगात आणखी आता दागिने देवाला मिळणार नाहीत. हे हात यापुढे फुकट जाणार ! तोडून टाकू का हे हात ? यांना खावयास पाहिजे ; परंतु देवाची पूजा करण्याचे नशिबी नाही बेट्यांच्या !” राखाल खिन्न व उद्विग्न होत म्हणाला. त्याच्या डोळ्यांत निर्मळ अश्रू आले.

ते पाहा पोलिस त्याला पकडावयासाठी आले आहेत. “तुला ठाण्यावर न्यावयाचे आहे. तू मोठा गुन्हा केला आहेस. न विणावयाची वस्तू तू विणली आहेस. करावयाची नाही ती गोष्ट कोणी केली तर शिक्षा होते. चल !” एकजण म्हणाला.

“मी तयार आहे. मला माझे हात तोडायला, हे निरुपयोगी हात तोडायला धैर्य होत नाही, तुम्ही माझ्या मदतीला या व हे काम करा. मी आभार मानीन. सरकारचे उपकार होतील!” राखाल म्हणाला.

“चल, वटवट बंद कर. हातावर सुटतोस, का मान द्यावी लागते ! कोणाला माहीत ? असे उद्धटपणे बोललास तर जान गमावशील !” पोलीस म्हणाला.

“मग तर सोन्याहून पिवळे ! इतके भाग्य माझ्या नशिबी असेल असे वाटत नव्हते. म्हणून मी हातच म्हटले. माझी बायको व मुलगा यांनाही मारा. म्हणजे नीच सेवा करून जगण्याची त्यांना इच्छा होणार नाही. पतित होऊन, व्रतच्युत होऊन, स्वधर्मच्युत होऊन जगण्याची त्यांना इच्छा होणार नाही. त्यांनाही मारून मोहापासून दूर घेऊन चला. आज इतके दिवस माझ्या स्वधर्माची पूजा मला करावयाला सापडली नाही. मी भिऊन राहिलो. मी पूजा चालविली पाहिजे होती. उघड उघड चालवली पाहिजे होती. माझ्या भित्रेपणाबद्दल मला मारा. आम्हांला सा-यांनाच मारा !” राखाल बोलत होता. बायको रडत होती. मुलगा घरात नव्हता. पोलीस मुसक्या बांधून राखालला घेऊन गेले.

 

पुढे जाण्यासाठी .......