सोमवार, जुलै 13, 2020
   
Text Size

गुराखी

परंतु मुलगा म्हणाला, “आई, राजाबरोबर मला जाऊ दे. मी मोठा होईन. तुला मग पालखीतून नेईन.”

आई म्हणाली, “तुला इच्छा आहे तर जा. परंतु माझे शब्द ध्यानात ठेव.”

राजा व गुराखी निघाले. गुराख्याने रस्ता दाखविला. दोघे राजधानीला आले. राजाने गुराख्याला शिकविण्यासाठी एक शिक्षक ठेवला. हळूहळू तो गुराखी हुशार झाला. राजाने त्याला मुख्य प्रधान केले.

गुराखी मुख्य प्रधान झाला, परंतु त्याला गर्व झाला नाही. तो गरिबांची काळजी घेई, त्याने विहिरी बांधलक्या. धर्मशाळा बांधल्या. तो कोणाला नाही म्हणत नसे. लोक त्याला दुवा देत. परंतु राजाचे जुने नोकर त्याचा हेवा करु लागले.

ते राजाला म्हणत, “राजा, भिकारडा गुराखी, त्याला तू प्रधान केलेस हे बरे नव्हे. तो प्रामाणिक असू शकणार नाही. लोकांना मदत करतो, विहिरी बांधतो. धर्मशाळा बांधतो. कोठून आणतो हे पैसे ? तिजोरीतील चोरीत असेल.”

राजा हलक्या कानांचा नव्हता. तो लक्ष देत नसे.

परंतु पुढे तो राजा मेला व त्याचा मुलगा गादीवर आला. या नव्या राजाजवळ ते जुने नोकर नाना गोष्टी सांगू लागले. एक दिवशी म्हणाले, “महाराज, तुमच्या वडिलांनी ऐकले नाही व या भिकारड्या गुराख्याला प्रधान केले. हा लंफंग्या आहे. तुमच्या वडिलांची  हि-यांच्या मुठीची एक तलवार होती. ती याने लांबविली. विचारा याला ती कोठे आहे म्हणून.”

नव्या राजाने गुराखी प्रधानाला बोलाविले व सांगितले,  “ती रत्नजडीत मुठीची तलवार घेऊन ये.”

प्रधानाने शोध शोध शोधली. तलवार सापडेना. परंतु त्याला आठवले की एकदा पूर्वीच्या राजानेच ती मोडून नवीन दागिने केले. त्याने ती हकीकत सांगितली. नव्या राजाचा विश्वास बसेना. तो म्हणाला, “प्रधानजी, चार दिवसांनी सर्व खजिन्याचा हिशेब घेईन. पैची अफरातफर असेल तर मान उडवीन.”

 

पुढे जाण्यासाठी .......