सोमवार, जुलै 13, 2020
   
Text Size

बहीणभाऊ

मधू व मालती दोघे बहिणभाऊ. त्यांचे एकमेकांवर फार प्रेम. घरात अलोट संपत्ती होती. कशाची वाण नव्हती. आईबाप मधू-मालतीचे सारे लाड पुरवीत. मधू घोड्यावर बसायला शिके. त्याचा एक छानदार घोडा होता. मालतीचे लग्न झाले. एका जहागीरदाराच्या घरी तिला देण्यात आले. माहेरच्यापेक्षाही मालतीचे सासर श्रीमंत होते.

मधूही आता मोठा झाला होता. त्याचे अद्याप लग्न झाले नव्हते. परंतु एकाएकी त्याचे वडील वारले व थोड्या दिवसांनी आई पण वारली. मधू एकटा राहिला. मालती चार दिवस माहेरी आली होती. परंतु पुन्हा सासरी गेली.

सारा कारभार मधूच्या अंगावर पडला. परंतु त्याला अनेकांनी फसविले. एकदा त्याने मोठा व्यापार केला, परंतु त्यात तो बुडाला. मधू भिकारी झाला. त्याची शेतीवाडी जप्त झाली. घरादारांचा लिलाव झाला. सुखात वाढलेला मधू त्याला वाईट दिवस आले. ज्याच्याकडे शेकडो लोक जेवत त्याला अन्न मिळेना. जो गाद्यागिर्द्यावर झोपायचा, त्याला रस्त्यावर निजावे लागे. ज्या मधूला हजारो लोक पूर्वी हात जोडत, तोच आज सर्वांसमोर हात पसरीत होता.

मधूला वाटले आपल्या बहिणीकडे जावे. प्रथम बहिणीकडे जाण्याला तो धजत नव्हता. तो स्वाभिमानी होता. “श्रीमंत बहिणीकडे भिका-यासारखे कसे जावयाचे? जिच्याकडे पूर्वी हत्तीघोड्यांवरुन गेलो, तिच्याकडे पायी कसे जावयाचे? जरीच्या पोषाखाने पूर्वी गेलो, तेथे फाटक्या चिंध्यांनी कसे जावयाचे? परंतु मधू मनात म्हणाला, “प्रेमाला पेशाअडक्याची पर्वा नाही, हिरेमाणकांची जरुरी नाही. माझी बहिण का मला दूर लोटील? छे, शक्य नाही.”

मधू बहिणीकडे आला, दारात उभा राहिला. वरुन गच्चीतून बहिण बघत होती. मधूने वर पाहिले, परंतु बहिण आत निघून गेली. मधूला वाटले बहिण खाली भेटायला येत असेल. परंतु कोणी आले नाही. दरवाज्यातील भय्याने, विचारले, “कोण रे तू? येथे का उभा चोरासारखा? निघ येथून.”

मधू म्हणाला, “माझ्या बहिणीचा हा वाडा आहे. तिला आत सांगा, जा.”

नोकर हसला. परंतु घरात जाऊन परत आला. तो मधूला म्हणाला, “चला तिकडे गोठ्यात, तेथे तुम्हाला भाकरी आणून देतो. ती खा व जा.”

 

पुढे जाण्यासाठी .......