मंगळवार, जुलै 07, 2020
   
Text Size

सदिच्छेचे सामर्थ्य

राजा म्हणाला, “प्रधानजी, साधू म्हणतो तसे करुन पाहू या. इतके बाह्य उपाय झाले. हकीम झाले, वैद्य झाले, मांत्रिक झाले, तांत्रिक झाले. आता साधू म्हणतो तसे वागू या. चला परत.”

साधूला प्रणाम करुन ते सारे परत गेले. राजाने नवीन हुकूम दिले, अधिकारी नीट वागू लागले. डोईजड कर कमी झाले, शेतसार प्रमाणात झाला. रस्ते झाले, कालवे झाले. उद्योगधंद्याच्या शाळा झाल्या. लोकांना आजारीपणात औषधपाणी मिळू  लागले. जसजसा राज्यकारभार सुधारू लागला तसतसा राजाचा रोग बरा होऊ लागला. प्रजा राजाला दुवा देऊ लागली. “कसा उदार आहे राजा, किती प्रजेवर त्याचे प्रेम !” असे लोक म्हणू लागले. “राजा चिरायु होवो, सुखी होवो, उदंड आयुष्याचा होवो !” अस स्त्रीपुरुष, लहानथोर सारे म्हणू लागले.

हळूहळू राजा निरोगी झाला. शरीरवरचे व्रण गेले. शरीर तेजस्वी व सुंदर झाले. त्याचे मनही सुंदर झाले. त्याची बुद्धीही निर्मळ झाली. एके दिवशी राजा प्रधानाला म्हणाला, “त्या साधूने सांगितले तसे झाले. त्यांचे उपकार. त्यांना वाजतगाजत येथे आणू या. त्यांचा सत्कार करु या.”

सारे शहर शृंगारले गेले. ठायी ठायी कमानी व तोरणे उभारण्यात आली. रस्त्यात चंदनाचा सडा घालण्यात आला. घोडेस्वार, हत्ती, वाजंत्री सारा थाट सजला. राजा साधूकडे गेला. त्याने आग्रह करुन साधूमहाराजांस पालखीत बसविले. स्वतः राजा पायी चालत निघाला. तो साधूवर चौ-या वारीत होता. मिरवणूक सुरु झाली. हजारो लोक जमले होते. साधूचा जयजयकार होत होता. लोक लाह्या, फुले यांची वृष्टी करीत होते. कोणी तर चांदीसोन्याची फुले उधळली.

 

पुढे जाण्यासाठी .......