सोमवार, सप्टेंबर 20, 2021
   
Text Size

पैलागडची रमी

ती पाहा अंधारी खोली. कोण राहते त्या खोलीत ? कोण राहणार ? गरिबाशिवाय कोण राहणार ? रमी राहते तिथे. तिचा एक मुलगा तिकडे मुंबईला गिरणीत काम करतो. तो रमीला पैसे पाठवतो. परंतु त्या पाचदहा रुपयांवर थोडाच संसार चालणार ? घरात आणखी चार मुले आहेत. नवरा मरुन दोन वर्षे झाली. रमीवर सारा भार. वडील मुलगा मुंबईला गेला. फार मोठा का तो ? मोठा कुठला ? सतरा-अठरा वर्षांचा असेल. परंतु आईला म्हणालाः “जातो मी. तेवढंच एक तोंड पोसायला कमी होईल. या भावंडांना काही पाठवीन.” आणि तो खरेच पाठवी.

रमी मजुरी करी. शेतात जाई. खानदेशातील तो उन्हाळा. परंतु गरिबाला ना उन्हाळा; ना हिवाळा. थंडीत त्याने कु़डकुडावे, उन्हात त्याने करपावे. रमीची दहाबारा वर्षांची मुलगी. तीसुद्धा कामाला जात असे. गरिबाच्या मुलांना लवकर मिळवते व्हावे लागते.

घरी मुलांना भाकरतुकडा करुन ठेवून रमी कामाला जायची. ती असे कामात; परंतु लक्ष पोरांक़डे असायचे. एके दिवशी कामावरुन आली तो तिची मोठी मुलगी तापाने फणफणलेली; फाटकी घोंगडी पांघरुन पडून होती.

“बाबी काय गं होतं?” रमीने विचारले.

“ताप भरला आई. कामावरुन कशी तरी घरी आले. बस माझ्याजवळ.” ती म्हणाली.

आठ दिवस झाले. बाबीचा ताप हटेना. रमीला कामाला जाता येईना. घरात विष खायलाही दिडकी नाही. तिकडे वडील मुलाची नोकरीही सुटली होती. कोठून पाठविणार तो पैसे ? कसे दवापाणी करावे ? कोठून मोसंबे आणावे ? गरिबांची दैना आहे.

त्या भागाला पैलाड म्हणत. सारी गरिबांची वस्ती. सकाळी सातनंतर कोणी घरात नाही सापडायचे. लहान मुले, कुत्री ही असायची गावात. बाकी गेली सारी कामाला.

आज दुपारच्या वेळेला एकदम टपालवाला आला. “रमी- कोण आहे रमी?” म्हणत आला. रमी मुलीच्या डोक्यावर हात ठेवून बसली होती. डोळ्यातून पाणी घळघळत होते.

“मी रमी, भाऊ.” ती म्हणाली.

“किती शोधायचं. नीट पत्ता नाही. मनिऑर्डर आहे. पैसे आले आहेत.”

“पोरानं पाठवले, होय ना!”

 

पुढे जाण्यासाठी .......