बुधवार, एप्रिल 21, 2021
   
Text Size

मोरी गाय

एक दिवस मोरी गाय रानात गेली होती. तिला दुस-या गायी-बैलांकडून बातमी कळली की, तिचा एक भाऊ खाटकाला विकला गेला. मोरी घेरी येऊन पडली. इतर गायी-बैलांनी तिला चाटले. सा-यांना तिची पवित्रता माहीत होती. तिच्याबद्दल सा-यांना पूज्यभाव वाटे. ती थोर तांबूच्या घराण्यातील, खानदानी घराण्यातील सत्त्वनिष्ठ मोरी ! उठली. सावध होऊन ती उठली. अश्रुधारांचा वर्षाव भू-लिंगावर करु लागली. हंबरडा फोडू लागली.

एक गाय म्हणाली, “आपल्या गावातून यंदा पुष्कळ गायी-बैल खाटकाकडे जाणार. आता शेतक-यांना बी-बियाणं जमवायचं आहे. आणि जवल नाही दिडकी. सावकार कर्ज देत नाही. आपणास विकून तो बी-बीयाणं आणणार, आपली त्यांना किंमतच वाटत नाही.”

दुसरी म्हणाली, “आमची काळजी घेत नाहीत. तुम्ही तरी काय करावं? जसं करावं तसं भरावं! एकदम तरी आपण सा-या एका ठिकाणी जाऊन मरु. जगून तरी काय? रोज शिव्या ऐकायच्या; मार खायचा; आपल्या गो-जातीची बेअब्रू झालेली पाहायची. जिथं देवता म्हणून फुलांनी आपलं पूजन झालं तिथं दगड-काटे खाऊन मरण्याची पाळी आली. आपल्या कासेत शक्ती आहे? पण या माकडांना कळेल तर? भोगाल म्हणावं फळं, रडाल-रडाल! हाय हाय करील!”

मोरीला हे बोलणे पटले नाही. ती म्हणाली, “नका त्यांना शिव्याशाप देऊ. आपणाला दुःख होत आहे तेवढं पुरे. मानव सुखात राहो. दिलीप, वसिष्ठांची ती मुलं. कृष्ण भगवानाची बाळं. आज ना उद्या योग्य मार्गावर येतील. ते आंधळे झाले आहेत, म्हणून आपणही का आंधळ व्हायचं? जर असं दोहो बाजूंनी, दोहो हातांनी पाप होऊ लागलं तर उद्धाराची, मोक्षाची उषा कधीच फाकणार नाही. पापाला आपल्या पुण्याईनं आपण वाढू देता कामा नये. मानव आज भुलला आहे. आपण मुक्या प्राण्यांनी अधिक तपस्या केली पाहिजे. ज्याला कळत त्याने तरी पदच्युत होऊ नये. जे जे होईल ते ते आपण सहन करु या. ज्या हातांनी आपल्यावर प्रेम केलं त्या हातांनी काठी मारु नये का? ज्यानं प्रेम केलं त्याला मारण्याचाही अधिकार आहे, आपण त्याचं पूर्वीच गो-प्रेम विसरता कामा नये. त्यानं आपणास माता म्हटल आहे. पुत्र वेडावाकडा झाला तरी माता प्रेम विरसणार नाही. ‘कुपुत्रो जायेत क्वचिदपी कुमाता न भवति!’ जोपर्य़ंत दुधाचा टाक देता येत आहे तोपर्यंत देऊ. त्याचं मंगल चिंतू. येऊल, परमेश्वर आपल्यासाठी धावून येईल. माझी आई सांगत असे, देव भक्ताला राखतोच राखतो.”

 

पुढे जाण्यासाठी .......

मोरी गाय