बुधवार, डिसेंबर 02, 2020
   
Text Size

अभगिनी व तिची लहान मुलगी

दुसरी : आपला हा काही पहिलाच अनुभव नाही.

पहिली : मला तरी हा पहिलाच अनुभव आहे. काय करावे, आता कोठे जावे?

तिसरी : चला परत मुंबईला जाऊ. आपली दुकाने थाटू.

पहिली : मी दुकान थाटून बसू? आयुष्याची, अब्रूची, सौंदर्याची, तारुण्याची का विक्री करू? असे कसे मी करू? माझं त्या तरुणावर प्रेम होते. मी त्याला देव मानले. मी मनाने त्याला सर्वस्व दिले. तो मला सोडून गेला तरी त्याची स्मृती माझ्याजवळ आहे. तो फसवणारा निघाला म्हणून का मीही त्याला फसवू? मी कुठेही जाईन, मोलमजुरी करीन व त्याचे चिंतन करीत राहीन. प्रेम एकदाच देता येते. ते पुन्हा कसे कोणाला देता येईल? ते कोठे आहे आता देण्यासाठी शिल्लक? सारे त्याला दिले. माझ्या लिलीच्या जन्मदात्याला सारे दिले.

तिसरी : तुम्ही वेडयासारखं काय बडबडता? असली भाषा आपणासारख्यांच्या तोंडी शोभत नाही.

पहिली : आपण का माणसं नाही?

दुसरी : आपण माणसांची करमणूक आहोत.

पहिली : मला तुमचं बोलणं समजत नाही.


दुसरी : हळुहळू समजेल.

त्या पुन्हा आपल्या खोल्यांत गेल्या. एक दिवस गेला. दोन गेले. त्यांच्या प्रियकरांचा पत्ता नाही. शेवटी हॉटेलवाल्याचे बिल देऊन त्या तिघी निघून गेल्या.

कोठे गेल्या निघून? दोघींचे माहीत नाही. एकीचे माहीत आहे. त्या लिलीच्या आईचे माहीत आहे. ती मुंबईत जेथे राहात असे तेथे परत गेली. आता त्या शहरात तिला राम वाटेना. जवळचे सारे विकून थोडेसे पैसे जमवून ती लहान मुलीला घेऊन मुंबई सोडून निघाली.

लिलीचे पुढे कसे होईल; हीच एक त्या तरुण मातेला चिंता होती. ती लिलीकडे बघे व मनात म्हणे, 'लिली न जन्मती तर मी जीव दिला असता, परंतु लिलीसाठी जगले पाहिजे. लिलीचे लग्न होईपर्यंत, तिचा संसार सुरळीत सुरू होईपर्यंत तरी मला जगले पाहिजे; परंतु लिलीला कसे वाढवू? कसे हिचे पालनपोषण करू? घर ना दार. देहाचे दुकान मांडू? छे, ती कल्पनाच असह्य वाटते. मग काय करू? आणि लिली जवळ असेल तर कोठे कामधाम तरी कसे करता येईल? हिला कोणाजवळ ठेवायची?'

 

पुढे जाण्यासाठी .......