गुरुवार, डिसेंबर 03, 2020
   
Text Size

अभगिनी व तिची लहान मुलगी

'काय ठरवू मी? सात तर सात; परंतु ठेवा. कुठं घेऊन जाऊ तिला मी? तुमचीच मुलगी माना.' लिलीची आई म्हणाली.

'परंतु सहा महिन्याचे पैसे?' त्याने विचारले.

'देत्ये ना ते.' ती म्हणाली.

'ठीक. ते झाडाखालचं सामान घेऊन इथं या. जाईपर्यंत इथंच राहा.' त्याने आस्थेने सांगितले.

'रात्रभर विसावा घेऊन मी उजाडताच जाईन. कुठं तरी कामधंदा पाहिला पाहिजे. इथं थांबून काय करू?' ती बोलली.

खाणावळवाल्याच्या एका खोलीत ती माता राहिली. तिने आपल्या मुलीला जणू शेवटचे पोटभर जेवू घातले. घोटभर कढत दूध पाजले. तिला कुशीत घेऊन ती पडली. तिला झोप येईना. मुलगी कुशीत झोपली होती. आईला अगदी चिकटून झोपली होती.

पहाटेची वेळ झाली. ती माता उठली. मुलीला सोडून जाणे तिला भाग होते. लिली उठल्यावर ते शक्य नव्हते. तिला झोपेतच सोडून जाण्याशिवाय मार्ग नव्हता. त्या अभागिनीने मुलीचा शेवटचा मुका घेतला. पुन:पुन्हा ती लिलीकडे बघत होती. तिची तृप्ती होईना; परंतु ती उठली. त्या खाणावळवाल्याला व त्याच्या बायकोला ती म्हणाली,     'माझी मुलगी तुमच्या पदरात मी घालीत आहे. जपा तिला. तिला पोटच्या मुलाप्रमाणं वागवा. आईची तिला आठवण होऊ देऊ नका. तिच्या डोळयांतून पाणी नका येऊ देऊ. तिला काही कमी नका करू.'

ती दोघे म्हणाली, 'काळजी नका करू. आम्ही सारं नीट करू.'

ती माता निघून गेली. लिली झोपेत हसत होती.

 

पुढे जाण्यासाठी .......