मंगळवार, सप्टेंबर 21, 2021
   
Text Size

कलवान विजय

कनोज प्रांतात शिरसमणी नावाचा एक गाव होता. त्या गावात बलदेव म्हणून एक गृहस्थ होता. त्याच्या पत्नीचे नाव पार्वती. बलदेव एका व्यापार्‍याकडे नोकरीस होता. बलदेवाचा प्रपंच फार मोठा होता. मुलेबाळे कोणाला नको का असतात? परंतु त्यांना पोसायचे कसे हा प्रश्न पडला म्हणजे मात्र कशाला देतो देव ही मुले असे मनात येते.

बलदेवाला पाच मुलगे होते. एक मुलगी होती. एवढया सर्वांना पोसणे मोठे कठीण काम होते. मुलांची नावे अशोक, आनंद, सुव्रत, विजय व सुमुख अशी होती. मुलीचे नाव मंजुळा. खरेच गोड बोलणारी होती. त्या घरातील ती संगीत होती. घरात भांडणे सुरू झाली की, मंजुळा ती भांडणे मिटवायची. ती आपला खाऊ देईल, ती मिळते घेईल. ज्याची बाजू पडती असेल, त्याची ती सावरून धरावयाची. मंजुळा प्रेमळ व गुणी होती; परंतु ती पांगळी होती. तिला कुबडया घेऊन चालावे लागे. ती अशक्त होती. ती घरात एके ठिकाणी बसून प्रेमाचा प्रकाश सर्वत्र पसरवीत असे. जरूरच पडली तर कुबडया घेऊन बाहेर पडे. एखादे वेळेस लांबसुध्दा धडपडत जाई.

अशोक, आनंद, सुव्रत हे सारे धष्टपुष्ट होते. विजय जरी फार जाडजूड नसला तरी सशक्त होता. तो उंच होता. पाहणार्‍या चे मन तो ओढून घेई. त्याचे नाक तरतरीत होते. डोळे काळे व पाणीदार होते. त्याचे कान जरा लांबट होते, परंतु त्याच्या चेहर्‍या ला ते शोभून दिसत.

आणि सुमुख? त्याचे नाव सुमुख होते, परंतु तो सदैव दुर्मुखलेला असे. त्याचा स्वभाव दुष्ट होता. मत्सरी होता. विशेषतः विजयवर त्याचा फार राग असे. कारण विजयची सर्वत्र वाहवा व्हायची. सुमुखला ते खपत नसे. सुमुख बुटबैंगण होता; परंतु त्याच्या तंगडया मजबूत होत्या. त्याचे दात फार मोठे होते. त्याच्या लहानशा तोंडाला ते फारच भेसूर दिसत; परंतु ते दात बळकट होते. झाडात ते दात रोवून तो वर चढे. तो आपली नखे वाढवी. कोणी भांडायला आला तर वाघाप्रमाणे तो पंजा मारी. त्याच्या नखांची सर्वांना भीती वाटत असे. तो सरसर वाटेल तेथे चढत असे. झाडावर चढे, दोरीला धरून कडा चढे. सुमुख म्हणजे एक विलक्षण व्यक्ती होती. भेसूर व दृष्ट व्यक्ती.

पार्वती आई सर्वांना सांभाळी; परंतु दिवसेंदिवस घरात अडचण पडू लागली. एकटे बलदेव किती मिळवणार?

 

पुढे जाण्यासाठी .......