बुधवार, सप्टेंबर 22, 2021
   
Text Size

तुरुंगात

विजयला मुक्ताच्या गावाचे नाव माहीत नव्हते, परंतु ग्रामपतीने त्या गावाच्या नावाचा उल्लेख केला. बुधगाव त्या गावाचे नाव. विजय बुधगावला जायला निघाला. तिसरा प्रहर होता. तो आनंदात होता. मुक्ता चकित होईल. आपण तेथे बसू. बोलू असे मनात योजीत तो जात होता.

मुक्ताचे वडील खाटेवर पडून होते. ती तांदूळ निवडीत होती. तो दारात विजय येऊन उभा राहिला. ती एकदम उठली.

'बाबा, हे पाहा कोण आले आहे!'

'कोण?'

'मी विजय. नमस्ते.'

'बसा. तुम्ही केव्हा तरी याल असे वाटतच होते. मुक्तासुध्दा म्हणे की, तुम्ही याल.'

'परंतु तुमच्या गावाचे नाव मला माहीत नव्हते. ते कळले तेव्हा आलो. तुम्हाला मी विसरलो नव्हतो. तुमची आठवण येते.'
'आम्हालाही तुमची येते. आता जेवायला राहाल ना? राहाच.' मुक्ताच म्हणाली.

'परंतु घरी जायला मला उशीर होईल.'

'तुम्ही काही भित्रे नाही आणि आज चांदणेही आहे. मी तुम्हाला थोडया अंतरापर्यंत पोचवायला येईन. राहा हं जेवायला. मी छानशी भाजी करते. वाटेत पिठले केले होते. ते आठवते का?' तिने विचारले.

'हो. ते रानातले जेवण मी कधीही विसरणार नाही.'

'तुमची गोड लापशीही आम्ही कधी विसरणार नाही.'

मुक्ता स्वयंपाकाकडे वळली. विजय व मुक्ताचे वडील बोलत होते. मधूनमधून विजयही स्वयंपाकघरात डोकावत होता.

 

पुढे जाण्यासाठी .......